कर्जमाफी : SBI अध्यक्षांविरूद्ध हक्कभंगाची सूचना

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मार्च 2017

मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा अरूंधती भट्टाचार्य शेतकरी कर्जमाफीसंदर्भात प्रसारमाध्यमांकडे जाहीरपणे केलेल्या निवेदनामुळे कायदेमंडळाचा हक्कभंग झाल्याचा ठपका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विखे पाटील यांनी ठेवला आहे. भट्टाचार्य यांच्याविरूद्ध त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे हक्कभंगाची सूचना दिली आहे.

'कर्जमाफी नको; नंतर लोकांच्या आशा वाढतात' असे वक्तव्य अरुंधती भट्टाचार्य यांनी मुंबईत एका कार्यक्रमावेळी पत्रकारांशी बोलताना केले होते. सध्या राज्यभरातून शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी होत असून, सरकारने या मुद्द्याला बगल देण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप होत आहे. "विरोधकांच्या नेतृत्वाखालील बँकांमधील घोटाळे लपविण्यासाठी ते कर्जमाफीची मागणी करीत आहेत," असा प्रत्यारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना केला. 
 
विखे पाटील यासंदर्भात म्हणाले, "कर्जमाफीची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांचा, या मागणीसाठी संघर्ष करणाऱ्या लोकप्रतिनिधींचा आणि सभागृहाचा अवमान स्टेट बँकेच्या अध्यक्षांच्या विधानामुळे झाला आहे. अरूंधती भट्टाचार्य या ‘पॉलिसी मेकर’ नाहीत. त्यामुळे शेतकरी कर्जमाफी संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना नाही. हा कायदेमंडळाचा अधिकार आहे.

भट्टाचार्य यांनी केलेली विधाने घटनेच्या चौकटीबाहेरील व कायदेमंडळाच्या अधिकारांवर गदा आणणारी आहेत. यासंदर्भात त्यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी आम्ही काल केली होती. परंतु, अद्याप त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली नसल्याने हक्कभंगाची सूचना दिल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.