राजकीय हाडवैर संपले; गावांना "स्वातंत्र्य' लाभले

राजकीय हाडवैर संपले; गावांना "स्वातंत्र्य' लाभले

मुंबई - "गाव तसं चांगलं..पण वेशीवर टांगलं..‘, " एक गाव, बारा भानगडी‘ असे गावचे चित्र चित्रपटात रंगविले गेले. राजकारणामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत उद्‌ध्वस्त होणाऱ्या गावगाड्याला एका आमदाराने "मूठमाती‘ देण्यात यश मिळवले. प्रत्येक ग्रामपंचायत निवडणुकीत कोट्यवधींचा चुराडा, खून, मारामाऱ्यांमुळे असंतोषात जळणाऱ्या गावांना एकत्र आणून निवडणूक बिनविरोध करण्यात ते यशस्वी झाले. 

गावागावांतल्या संघर्षाला खतपाणी घालून स्वत:ची राजकीय पोळी भाजणाऱ्या राज्यातल्या आमदारांसाठी "बदलापूर- बिनविरोध ग्रामपंचायत‘चा आदर्श पॅटर्न डोळ्यांत अंजन घालणारा आहे. 

मुरबाड-बदलापूर विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायत निवडणुकांत गावात एक तरी खून पडायचा, गुन्हे दाखल व्हायचे, युवा कार्यकर्त्यांचे निम्मे आयुष्य कोर्टकचेरीत जायचे; तर काही जणांना गावातून हद्दपार होण्याची वेळ आली. या गावांना सध्या राजकीय दुष्मनीतून "स्वातंत्र्य‘ मिळाल्याचे समाधान वाटत आहे. 

उद्याचा स्वातंत्र्य दिन या गावांसाठी केवळ राजकीय महत्त्वाकांक्षा व पक्षीय राजकारण यापुरताच मर्यादित राहिला नसून, एकमेकांची सावली न ओलांडणारी दुष्मनी या गावांनी मोडीत काढली आहे. आमदार किसन कथोरे यांच्या प्रयत्नांतून सव्वाशेहून अधिक गावांत ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध पार पडल्याने पोलिस व महसूल प्रशासनाने सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे. त्यामुळेच स्वातंत्र्यदिनी परंपरागत वैर विसरून या गावांतली सर्वपक्षीय नेतेमंडळी एकत्र येऊन गावाचा विकास आराखडा तयार करून तो राज्य व केंद्र सरकारला सादर करणार आहेत. 

या मतदारसंघात 127 पैकी 100 गावांच्या निवडणुका पार पाडण्यात आमदार कथोरे यांना यश आले आहे. या गावांत आपुलकी व बंधुभावाची विसकटलेली नाती पुन्हा जोडली आहेत. 

उशिंद, फळेगाव, दहिवली, मामणोली, केळणी, कोळीव यासारख्या अनेक ग्रामपंचायतींची निवडणूक असली की सामान्य मतदारांची झोप उडायची. गुंठा सम्राटांचे वर्चस्व असलेल्या या ग्रामपंचायती. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून ग्रामपंचायत जिंकायचीच अशी इथल्या नेत्यांची भीष्म प्रतिज्ञा. या प्रत्येक गावात निवडणुकीत किमान दोन-तीन तरी खून पडायचे. शंभर-दीडशे युवकांना अटक व्हायची अन्‌ वर्षानुवर्षे कोर्टकचेरीत संघर्ष सुरू असायचा. 

या सर्व घडामोडींचे साक्षीदार असलेले आमदार किसन कथोरे यांनी या सर्व गावांना पत्र पाठवून आवाहन केले. बैठका घेतल्या. गावगाड्याची परंपरा समजावून सांगितली. त्यांची भूमिका गावकऱ्यांना पटली. त्यातूनच मग गावांनी मिळून बिनविरोध निवडणुकीचा निर्णय घेतला. या निर्णयाला गावकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. आज ज्या गावात दोन नेत्यांमध्ये दैनंदिन संघर्ष होता, ते खांद्याला खांदा लावून गावाच्या विकासाचा अजेंडा तयार करत आहेत. पक्षीय राजकारण या गावांतून हद्दपार झाले. "आमदार अप्पां‘चा बिनविरोध ग्रामपंचायतींचा "पॅटर्न‘ या मतदारसंघातल्या गावांनी प्रामाणिकपणे स्वीकारला. त्यामुळे पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व ग्रामपंचायतींच्या विकास आराखड्याला प्राधान्य देत विकासाची ग्वाही दिली. 

"गाव करी ते राव काय करी‘ या उक्‍तीनुसार सर्वपक्षीयांना सोबत घेऊन "बिनविरोध ग्रामपंचायत‘ हा पॅटर्न राबविला. त्याला गावांनी साथ दिली. आता विकास होणार तो गावांचाच. सर्वच्या सर्व ग्रामपंचायती बिनविरोध होऊन हा पॅटर्न राज्यभरात अमलात यावा. 

किसन कथोरे, आमदार 

आदर्श मतदारसंघ 

: मुरबाड राज्यात आदर्श विधानसभा मतदारसंघ 

: सव्वाशे ग्रामपंचायती बिनविरोध 

: राजकीय वैर संपुष्टात 

: महसूल व पोलिस प्रशासनाची पाठीवर थाप 

: खून, मारामाऱ्या, कोर्टकचेरीतून युवा पिढीची सुटका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com