प्लॅस्टिकमुक्तीचा आषाढी वारीत जागर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जुलै 2017

नातेपुते, भंडी शेगावमध्ये ब्रुक बॉन्ड रेड लेबल, सकाळ, चोपदार फाउंडेशनचा उपक्रम

नातेपुते, भंडी शेगावमध्ये ब्रुक बॉन्ड रेड लेबल, सकाळ, चोपदार फाउंडेशनचा उपक्रम
पंढरपूर - ब्रुक बॉन्ड रेड लेबल, सकाळ आणि चोपदार फाउंडेशन यांनी यंदा नातेपुते आणि भंडीशेगाव येथे राबविलेल्या स्वच्छता मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळाला. मातीत विघटन होणाऱ्या चहाच्या कपाचे मोठ्या प्रमाणात मोफत वितरण केल्याने पालखी मार्गावर प्लॅस्टिक कपाचे प्रदूषण रोखण्यात यश आले. एक लाख इको फ्रेंडली चहाच्या कपाद्वारे तुळशीचे बीजारोपणही करण्यात आले आहे.

तीन वर्षांपासून आळंदीतील चोपदार फाउंडेशन, सकाळ सोशल फाउंडेशन आणि दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने वारीत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. दिंड्यांना डिस्पोजल बॅग देऊन परिसरात साठणारा कचरा त्या पिशवीत टाकण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. यंदाही या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळाला असून, दिंड्यांनी तळावर डिस्पोजल बॅगमध्ये कचरा, उरलेले अन्न ठेवल्याने स्थानिक प्रशासनाला ते संकलित करणे सोईचे झाले. त्यांच्यावर 70 टक्के ताण कमी करण्यास यश मिळाले आहे.

त्याचाच पुढचा भाग म्हणून ब्रुक बॉन्ड रेड लेबल या चहाच्या कंपनीच्या वतीने सकाळ आणि चोपदार फाउंडेशनच्या सहकार्याने नातेपुते आणि भंडीशेगाव येथे इको फ्रेंडली चहाचे कप वितरित केले. लाखो प्लॅस्टिकच्या कपाचे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी या कंपनीने पुढाकार घेतला. मातीत विघटन होणाऱ्या कपांची निर्मिती केली.

कपाद्वारे वृक्षारोपण व्हावे, म्हणून कागदाच्या लगद्यात तुळशीचे बी टाकून कागदी कपांची निर्मिती केली, यंदाच्या वारीत प्रायोगिक तत्त्वावर हा कपवाटपाचा उपक्रम नातेपुते आणि भंडीशेगावमध्ये राबविण्यात आला. नातेपुतेमध्ये चोपदार फाउंडेशनचे अध्यक्ष रामभाऊ चोपदार, राजाभाऊ चोपदार, नातेपुतेचे सरपंच भानुदास राऊत, बाबाराजे देशमुख, शरद मोरे, "सकाळ'चे विपणन व्यवस्थापक किरण पाटील यांच्या उपस्थितीत या उपक्रमाला प्रारंभ झाला. या वेळी चहा विक्री करणाऱ्या शंभर हातगाडीचालकांना या कपाचे वाटप करण्यात आले.

त्यांनी वारकऱ्यांमध्ये कशी जनजागृती करायची, याची माहिती देण्यात आली. त्यानंतर भंडी शेगाव तळाजवळ शंभर हातगाडीचालकांना कपाचे वाटप करण्यात आले. बार्शीतील श्री भगवंत हौशी वारकरी सेवा मंडळाच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. चोपदार फाउंडेशनचे अध्यक्ष रामभाऊ चोपदार, राजाभाऊ चोपदार, बाळासाहेब चोपदार यांच्या मार्गशनाखाली राबविण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन किरण पाटील, शंकर टेमघरे, प्रवीण ठुबे, अर्जुन लांडे, काका लोकरे यांनी केले.