विठ्ठलाचा लाडू प्रसाद महागणार

भारत नागणे
सोमवार, 10 जुलै 2017

मंदिर समिती व्यवस्थापनाचा दुजोरा; सर्वांनाच बसणार झळ
पंढरपूर - वस्तू व सेवाकर (जीएसटी) आता विठुरायाचा प्रसादावरही लागू होण्याची शक्‍यता आहे. अगदी अत्यल्प दरात मिळणारा लाडू प्रसादाची किंमत यापुढे दुप्पट होणार असून, त्याचा भार भाविकांवर पडणार असल्याच्या वृत्ताला मंदिर समिती व्यवस्थापनाने आज दुजोरा दिला.

मंदिर समिती व्यवस्थापनाचा दुजोरा; सर्वांनाच बसणार झळ
पंढरपूर - वस्तू व सेवाकर (जीएसटी) आता विठुरायाचा प्रसादावरही लागू होण्याची शक्‍यता आहे. अगदी अत्यल्प दरात मिळणारा लाडू प्रसादाची किंमत यापुढे दुप्पट होणार असून, त्याचा भार भाविकांवर पडणार असल्याच्या वृत्ताला मंदिर समिती व्यवस्थापनाने आज दुजोरा दिला.

भारताची दक्षिण काशी अशी ओळख असलेल्या पंढरीत विठ्ठल दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येतात. वर्षभरात आषाढी, कार्तिकी, चैत्री आणि माघी या प्रमुख चार यात्राकाळात लाखो भाविकांची मांदियाळी असते. याच दरम्यान विठ्ठल प्रसाद खरेदीसाठी भाविकांची मोठी गर्दी होते. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना किमान अत्यल्प दरात प्रसाद मिळावा म्हणून पाच रुपयांमध्ये ना नफा ना तोटा या तत्तवार लाडू प्रसाद देण्याचा मंदिर समितीचा उपक्रम सुरू आहे. यामध्ये मंदिर समितीला प्रतीलाडू 2 ते 3 रुपये आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. तरीही मंदिर समितीने तोटा सहन करत लाडू प्रसाद देण्याचा उपक्रम सुरूच ठेवला आहे.

आता "जीएसटी'मुळे तेल, हरभरा डाळ, तूप, साखर आदी वस्तूंवर पाच टक्‍क्‍यांच्यापुढे कर आकारण्यात आला आहे. त्यामुळे वाढीव करामुळे विठुरायाला प्रसाद महागणार अशीच चिन्हे आहेत. वर्षभर मंदिर समितीकडून अत्यल्प दरात विक्रीसाठी सुमारे 90 लाख लाडू तयार केले जातात, तर आषाढी यात्रेच्या काळात 10 ते 11 लाख लाडू विक्रीसाठी तयार केले जातात. मात्र, अत्यल्प दरात मिळणारा विठ्ठलाचा लाडू प्रसाद "जीएसटी'मुळे महागणार असल्याचे सूतोवाच विठ्ठल मंदिर समितीच्या व्यवस्थापनाकडून करण्यात आले. मात्र, किती दरवाढ करावयाची याबाबत चर्चा सुरू आहे.

विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मंदिर समितीतून पाच रुपयांमध्ये लाडू प्रसाद दिला जातो. सध्या मंदिर समितीला एका लाडूमागे अडीच ते तीन रुपयांचे तोटा होत आहे. "जीएसटी'मुळे साखर, तेल आणि हरभरा डाळीवर पाच टक्के कर लावण्यात आला आहे. त्यामुळे "ना नफा ना तोटा' या तत्त्वावर देण्यात येणारा लाडू प्रसादाच्या किमतीत वाढ करावी लागणार आहे. या संदर्भात मंदिर समितीच्या बैठकीत दरवाढीचा निर्णय अपेक्षित आहे.
- डॉ. विजय देशमुख, कार्यकारी अधिकारी मंदिर समिती, पंढरपूर