पंढरपूरसाठी जादा निधी मिळवून देऊ - पाटील

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

पंढरपूर - 'महाराष्ट्रातील साडेअकरा कोटी जनता सुखी आणि सुरक्षित राहू दे, असे साकडे मी श्री विठ्ठलाला घातले आहे. शेगावच्या धर्तीवर पंढरपूरचा विकास झाला पाहिजे. विठ्ठल दर्शनानंतर जसे समाधान मिळते तसे येथे आल्यानंतर येथील व्यवस्थांमुळे देखील समाधान मिळाले पाहिजे. आगामी काळात पंढरपूरला येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी जादा निधी आपण मिळवून देऊ,'' असे आश्‍वासन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी दिले.

कार्तिकीतील प्रबोधिनी एकादशीनिमित्त श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा महसूलमंत्री पाटील व त्यांच्या पत्नी अंजली यांच्या हस्ते पहाटे अडीच वाजता करण्यात आली. या पूजेनंतर मंदिरातील सभामंडपामध्ये आयोजित केलेल्या सत्कार समारंभाप्रसंगी बोलताना पाटील म्हणाले, ""मी पंढरपूरमधील अनेक मठांना भेटी दिल्या. वारकऱ्यांशी संवाद साधला. तेव्हा अनेकांनी शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, पुरेशी प्रकाशव्यवस्था नसल्याचे सांगितले. आगामी काळात पंढरपूरला येणाऱ्या वारकऱ्यांना उत्तम सुविधा मिळाव्यात, यासाठी आपण आवश्‍यक तो निधी मिळवून देऊ.'' या वेळी दर्शनासाठीच्या टोकन पास वितरणाचा प्रारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. समितीच्या कर्मचाऱ्यांसाठी गणवेशाचे वितरणही करण्यात आले.

कर्नाटकातील दांपत्यास महापूजेचा मान
महापूजेच्या वेळी वारकरी प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहण्याचा मान यंदा कर्नाटकातील विजापूर तालुक्‍यातील हडगल्ली येथील कर्नाटक राज्य परिवहन मंडळातील वाहक वारकरी बळीराम शेवू चव्हाण (वय 40) व त्यांच्या पत्नी शीनाबाई चव्हाण (वय 35) यांना मिळाला. महापूजेनंतर चव्हाण दांपत्याचा मंदिर समितीच्या वतीने सत्कार करून एसटीचा मोफत प्रवासाचा पास देण्यात आला.