विठ्ठल दर्शनरांगेत पुन्हा गोंधळ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जुलै 2017

पंढरपूर  - श्री विठ्ठल दर्शनासाठी उड्डाण पुलावरून जाण्यासाठी आज सायंकाळी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. प्रक्षाळपूजेमुळे दर्शनरांग काही वेळ थांबवली होती. उड्डाण पुलाचा दरवाजा बंद होता आणि गर्दीच्या नियमनासाठी पोलिस नव्हते, त्यामुळे तिथे एकच गोंधळ उडाला. चेंगराचेंगरीसदृश स्थिती निर्माण झाली. शेवटी भाविकांनी उड्डाण पुलाचा दरवाजा तोडून पूल सुरू केला.

आषाढी व कार्तिकी यात्रेनंतर मंदिरात प्रक्षाळपूजा करण्याची प्रथा आहे. या दिवशी मंदिर स्वच्छ धुवून घेतले जाते. त्यासाठी काही वेळ दर्शनरांग थांबवण्यात आली होती. कासार घाटाजवळ उड्डाण पुलावर जाण्याचा मार्ग आहे. उड्डाण पुलावर लोक जाऊन थांबले तर त्यांची गैरसोय होते. त्यामुळे दर्शन सुरू झाल्यावर उड्डाण पुलाचा दरवाजा उघडला जातो.

तोपर्यंत हजारो भाविक उड्डाण पुलाच्या मागील बाजूस थांबलेले असतात. आज श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीने पुलाच्या दरवाजावर दर्शन केव्हा सुरू होणार आहे, याविषयी सूचनाफलक लावला होता. दुपारी चारच्या सुमारास कासार घाटाजवळ उड्डाण पुलाच्या मागे भाविकांची मोठी गर्दी झाली होती. पुलावर जाण्यासाठी ढकलाढकली होत होती.

त्यातच काही भाविकांनी पुलाचा दरवाजा तोडून पुलावर प्रवेश केल्याने गोंधळ आणखी वाढला. चेंगराचेंगरी सदृश्‍यस्थिती निर्माण झाली. या घटनेची माहिती समजताच "सकाळ'च्या प्रतिनिधीने पोलिसांना कळवले. त्यामुळे तातडीने पोलिस कासारघाटाजवळ येताच गोंधळ कमी होऊन परिस्थिती नियंत्रणात आली.