विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समिती बरखास्तीची मागणी

अभय जोशी
शुक्रवार, 7 जुलै 2017

उद्या महाद्वारात आंदोलन; वारकरी-महाराज मंडळींच्या बैठकीतील निर्णय

उद्या महाद्वारात आंदोलन; वारकरी-महाराज मंडळींच्या बैठकीतील निर्णय
पंढरपूर - शासनाने नुकत्याच नियुक्त केलेल्या श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीवर राजकीय व्यक्तींचा भरणा करण्यात आला आहे. ही समिती बरखास्त करून समितीवर वारकरी प्रतिनिधीच घ्यावेत, या मागणीसाठी शनिवारी (ता. 8) दुपारी पुन्हा महाद्वार येथे ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय आज दुपारी येथे झालेल्या वारकरी व महाराज मंडळींच्या बैठकीत घेण्यात आला. ठिय्या आंदोलनाची दखल न घेतल्यास श्रावण एकादशीला श्री विठ्ठल मंदिरासमोर पुन्हा आंदोलन आणि त्यानंतर वेळ पडली तर मंत्रालयावर वारकऱ्यांचा मोर्चा नेण्याचाही निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.

11 पैकी नऊ जणांची ही समिती गठित करण्यात आली असून, दोन सदस्यांची पदे शासनाने रिक्त ठेवलेली आहेत. मंदिर समितीवर केवळ दोन वारकरी प्रतिनिधींना स्थान दिले आणि बाकी राजकीय कार्यकर्त्यांना संधी देण्यात आल्याने संतापलेल्या काही महाराज मंडळींनी आषाढी दशमीदिवशी माउलींचा सोहळा पंढरपुरात प्रवेश करत असताना हा सोहळा थांबवून सुमारे दीड तास ठिय्या आंदोलन केले होते.

तेव्हा मुख्यमंत्र्यांची भेट घालून दिली जाईल; परंतु सोहळा पुढे जाऊ द्या, असे आश्‍वासन अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी दिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आंदोलनाची दखल घेऊन रिक्त असलेल्या जागांवर सदस्य निवडताना वारकरी मंडळींशी चर्चा करून नियुक्ती केली जाईल, असे आश्‍वासन दिले होते.

औसेकर, किसनगिरी बाबांनी राजीनामा द्यावा
पंढरपूर येथील या समितीवर वारकरी प्रतिनिधींना घेण्याऐवजी काही मासाहारी व दारू पिणाऱ्या मंडळींचा समावेश करण्यात आला आहे, असा आरोप बंडातात्या कराडकर यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना केला, तर नियुक्त केलेल्या सध्याच्या समितीमध्ये वारकरी प्रतिनिधी म्हणून स्थान देण्यात आलेले गहिनीनाथ महाराज औसेकर आणि भास्करगिरी गुरू किसनगिरी बाबा या दोन सन्माननीय व्यक्तींना स्थान देण्यात आले आहे; परंतु आमच्या मागणीला पाठिंबा म्हणून या दोन्ही सन्माननीय व्यक्तींनी त्यांच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला पाहिजे. समितीमधील विधानसभा सदस्य, अनुसूचित जाती व जमातीचे सदस्य नेमताना तेदेखील वारकरी संप्रदायातीलच घ्यावेत, अशी मागणी बैठकीत काही जणांनी केली.