वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्या - विजयकुमार देशमुख

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 जून 2017

पंढरपूर - आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या वारकऱ्यांना केंद्रबिंदू मानून जास्तीतजास्त चांगल्या सुविधा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न करावेत. वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता सर्व अधिकाऱ्यांनी घ्यावी. यात्रा सुखरूप, निर्मल व निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी केले.

आषाढी यात्रेच्या नियोजनासाठी येथील संत तुकाराम भवनमध्ये देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी आढावा बैठक घेण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते. देशमुख म्हणाले, वारकऱ्यांना स्नानासाठी चंद्रभागा नदीत पुरेसे पाणी राहील या दृष्टीने जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. शहर व परिसरात यात्रा काळात स्वच्छता राहावी, यासाठी अधिक चांगले नियोजन करावे असे सांगून त्यांनी यंदाची आषाढी मागील वर्षी पेक्षाही उत्तम व्यवस्थेत पार पडेल, असा विश्‍वास व्यक्त केला.

शेतकरी संप लवकर मिटवा - भालके
आमदार भारत भालके म्हणाले, शेतकरी संपाचा प्रश्‍न लवकर मिटला नाही तर यात्रेत अडचणी निर्माण होण्याची शक्‍यता आहे. हे लक्षात घेऊन शासनाने लवकरात लवकर संप मिटवावा. विकास आराखड्यातील तसेच नगरोत्थानच्या माध्यमातून होत असलेली रस्त्यांची कामे निकृष्ट पद्धतीने केली जात आहेत. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होत असताना पावसात डांबरीकरणाचे काम केले जात असून, त्याची चौकशी करून जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाला अहवाल पाठवावा.