पंढरपुरात भिंत पडून परभणी जिल्ह्यातील वारकरी ठार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जुलै 2017

पंढरपूर - येथील नवीन कराड नाका भागात वारकऱ्यांच्या पालावर लगतची भिंत कोसळून परभणी जिल्ह्यातील एक वारकरी जागीच ठार झाला. तर दोन वारकरी महिला किरकोळ जखमी झाल्या. ही घटना आज दुपारी साडे तीनच्या सुमारास घडली. या घटनेची समजलेली माहिती अशी की, परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील दिंडी सोहळ्यातील वारकरी येथील नवीन कराड नाक्‍याजवळ रमेश सदाशिव गेंड यांच्या गेट लगत मुक्कामास थांबले होते. तेथील जुनी भिंत आज दुपारी कोसळली. या घटनेत रामकिसन माधवराव कल्हाळे (वय 70, रा. पिंगळी, ता. परभणी) या वारकऱ्याच्या डोक्‍यास गंभीर जखम होऊन त्याचा मृत्यू झाला, तर सुमनताई तुकाराम कुदळे (वय 65), मंजुळाबाई दत्तात्रय कुदळे (वय 60, रा. दोघीही जिंतूर, जि. परभणी) या किरकोळ जखमी झाल्या.