‘कोयना’त २१.३६ टीएमसी जादा पाणीसाठा

Koyana-Dam-Water
Koyana-Dam-Water

पाटण - महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना जलाशयात एकूण ७०.७४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत २१.३६ टीएमसी जादा पाणीसाठा आहे. कोयना धरण यावर्षी काटकसर न करता सिंचन व वीजनिर्मिती या ध्येयात यशस्वी होणार आहे. कोयना धरण व्यवस्थापणाने केलेले काटेकोर नियोजन यास कारणीभूत असून, वर्षाखेरपर्यंत वीजनिर्मिती पूर्ण क्षमतेने व सिंचनात कोणतीही अडचण येणार नाही. त्यामुळे उद्योजक व शेतकरी यांच्या दृष्टीने समाधानाची बाब आहे.

गेल्या वर्षी मॉन्सूनचे उशिरा आगमन झाले होते. कर्नाटकाला दुष्काळासाठी जादा पाणी द्यावे लागले होते. त्यामुळे धरणाची पाणी पातळी एक जून रोजी फक्त १९.०८ टीएमसी होती. उशिरा पाऊस सुरू झाला व त्यात सातत्य राहिल्याने ऑगस्टमध्येच धरण भरले होते. नोहेंबरपर्यंत पाऊस सुरू राहिल्याने पाणीपातळी संतुलित राहिली. १०५.२५ टीएमसी एकूण पाणीसाठा क्षमता असणाऱ्या कोयना जलाशयात गेल्या वर्षीच्या तुलनेत या दिवसाचा विचार केला तर २१.३६ टीएमसी जादा पाणीसाठा आहे. पाणीपातळीही २४ फूट जादा असलेली पाहावयास मिळते.

गेल्या वर्षी पायथा वीज गृहातून वीजनिर्मिती व सिंचनासाठी ९.९ टीएमसी पाण्याचा वापर झाला होता. आज तो १७.५६ टीएमसी झाला असून, तुलनेत ७.६६ टीएमसी जादा झालेला आहे. वीजनिर्मितीसाठी गेल्या वर्षी ५३.७० टीएमसी पाणी वापर झाला होता. मात्र, यावर्षी फक्त ४०.२२ टीएमसी म्हणजेच तुलनेने १३.४८ टीएमसी कमी झालेला आहे. गेल्या वर्षी १४५.३१ टीएमसी पाण्याची वर्षभरात आवक झाली होती. यावर्षी आवक १२६.१७ टीएमसी झाली असून, काटेकोर नियोजनामुळे १९.१४ टीएमसी आवक कमी असतानाही जादा पाणीसाठा शिल्लक आहे. 

अतिवृष्टी काळात गेल्या वर्षी पायथा वीजगृहातून ४.२१ टीएमसी व सहा वक्र दरवाजातून २५.६८ टीएमसी असे एकूण २९.८९ टीएमसी पाणी कोयना नदीपात्रात सोडले होते. या वर्षी पायथा वीजगृहातून २.४८ टीएमसी व सहा वक्र दरवाजातून ७.०७ टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. उन्हामुळे शिवसागर जलाशयातील ६.१० टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन झाले होते.

यावर्षी ६.७४ टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे. सिंचन, वीजनिर्मिती व बाष्पीभवन होऊनही धरणामध्ये सध्या ७०.७४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असल्याने शेतकरी, उद्योजक, जनता व शासनासह धरण व्यवस्थापनाला कोणतीही काळजी करावी लागणार नाही, असे चित्र असल्याने धरण या वर्षी सर्वांसाठी समाधानाची बाब आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com