पवारांना चांगलंच माहितेय सरकार पडणार नाही ते ..! 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

मुंबई - ""राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना चांगलेच माहितेय की फडणवीस सरकार पडणार नाही ते..! माझे सरकार पाच वर्षे पूर्ण करणारच,'' असा ठाम दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज "सकाळ'शी बोलताना केला. "वर्षा' या निवासस्थानी प्रचाराचा समारोप झाल्यानंतर ते बोलत होते. 

मुंबई - ""राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना चांगलेच माहितेय की फडणवीस सरकार पडणार नाही ते..! माझे सरकार पाच वर्षे पूर्ण करणारच,'' असा ठाम दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज "सकाळ'शी बोलताना केला. "वर्षा' या निवासस्थानी प्रचाराचा समारोप झाल्यानंतर ते बोलत होते. 

""शरद पवार हे राजकारणातले उत्तम जाणकार आहेत. राजकारणात कधी काय होईल, हे त्यांच्याइतके कोणीही जाणू शकत नाही,'' अशी पुस्तीही फडणवीस यांनी जोडली. शिवसेनेने पाठिंबा काढल्यास सरकार कसे राहील? यावर उत्तर देताना ते म्हणाले, ""शिवसेना काय करेल ते माहीत नाही. मात्र, सरकार कायम राहणार. सध्या शिवसेना सरकारमध्ये आहे. आगे आगे देखो होता है क्‍या...'' 

""शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री म्हणून मला प्रचारात लक्ष्य केले होते. मी राज्याचा प्रमुख असल्याने माझ्यावर टीका करणे साहजिक आहे. माझ्यावर आरोप करणे शक्‍य नसल्याने विरोधकांनी माझ्यावर व्यक्तिगत टीका केली. पण, मी कोणावरही व्यक्तिगत पातळीवर जाऊन टीका केली नाही. महाराष्ट्राच्या राजकारणाची एक सभ्य संस्कृती आहे. मी मुख्यमंत्री असल्याने ही संस्कृती पाळणे कर्तव्य आहे,'' असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, ""प्रचाराच्या रणधुमाळीत परस्परांवर कितीही कठोर टीका केली तरी त्यातून मनभेद होणार नाहीत. व्यक्तिगत जीवनातले संबध कधी तुटणार नाहीत. आरोप प्रत्यारोपातून व्यक्तिद्वेष निर्माण होणार नाही.'' 

या वेळीच्या प्रचारात नेत्यांची भाषणे व त्यामधील भाषा टोकाची होती. त्यामुळे मतभेदाची जागा मनभेद घेतील याची भीती वाटत नव्हती का, असा प्रश्‍न केला असता ते म्हणाले, ""नक्‍कीच, या वेळी शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी व माझ्यावर आक्रमक टीका केली. पण, लोकांना ती रुचणार नाही. भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीत बहुमत मिळेल. मुंबई महापालिकेत या वेळी परिवर्तन झालेले दिसेल.'' शिवसेनेला पारदर्शी कारभार नको होता. त्यामुळे युती तोडली, असा आरोपही फडणवीस यांनी या वेळी केला.