शेतकऱ्याला पोलिसांकडून मारहाण नाही - डॉ. पाटील

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 1 एप्रिल 2017

मुंबई - औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकरी रामेश्‍वर भुसारे यांना मंत्रालयात पोलिसांकडून मारहाण झाली ही वस्तुस्थिती नाही, असे गृहराज्य मंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शुक्रवारी विधान परिषदेत एका निवेदनाद्वारे स्पष्ट केले.

भुसारे यांनी स्वखर्चातून उभारलेल्या शेडनेट आणि पॉलिहाउसचे गारपिटीमुळे नुकसान झाले; मात्र त्यांना काही तांत्रिक कारणामुळे मदत मिळाली नव्हती. त्यामुळे भुसारे मंत्रालयात आक्रमक झाले आणि त्यानंतर त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यापासून त्यांना रोखण्याचा पोलिस प्रयत्न करत असताना झटापट होऊन भुसारे जखमी झाले, असे पाटील यांनी सांगितले.

भुसारे यांचा जबाब नोंदवला आहे. याबाबत सखोल चौकशी सुरू आहे. भुसारे यांच्या नुकसानभरपाईबाबत सरकार सहानुभूतीपूर्वक विचार करेल. तसेच भुसारे यांना आलेले नैराश्‍य दूर करण्यासाठी सरकार सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही डॉ. पाटील यांनी दिली. या घटनेबाबाबत "एफआयआर' का नोंदवली नाही, अशी विचारणा विरोधकांनी या वेळी केली.