स्वबळाची धुळपेरणी

political parties flag
political parties flag

गेल्या विधानसभा निवडणुकीपासून राज्यात एक चांगली प्रथा सुरू झाली ती म्हणजे स्वबळाची. स्वबळावर निवडणुका लढवून बहुमत मिळविण्याचा किंवा सत्तेच्या सिंहासनावर बसण्याचे स्वप्न प्रत्येक पक्षाला पडत आहे. अर्थात स्वबळाची खुमखुमी सर्वच पक्षांना असल्याचे पुन्हा एकदा दिसून येत आहे. 

नगरपालिका निवडणुकांपाठोपाठ आता महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेचीही निवडणूक लवकरच होत आहे. नगरपालिका निवडणुकीत भाजप एक नंबरवर राहिल्याने ते आगामी निवडणुकीत शिवसेनेबरोबर युती करण्याची शक्‍यता दिसत नाही. नोटाबंदीचा आणि मराठा मूक मोर्चाचा निवडणुकीवर किंचितही परिणाम झाला नसल्याने भाजपचा विशेषत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास दुणावला आहे. त्यामुळे मुंबई हे प्रमुख लक्ष्य असले तरी इतर सर्व मोठ्या महापालिका आणि बहुसंख्य जिल्हा परिषदा भाजपच्या ताब्यात कशा येतील याचेच आखाडे बांधले जात आहे. 

नगरपालिकेची पुर्नरावृत्ती झाल्यास मुख्यमंत्र्यांचे स्थान अधिक बळकट होणार आहे. नोटांबंदीमुळे मोदी इफेक्‍ट आहेच. विरोधकही गोंधळलेले आहेत. शिवाय त्यांच्यात एकजूटही नाही याचा नेमका फायदा उचलण्याची संधी भाजप कदापी सोडणार नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या छुप्या समझोत्याने शिवसेनेला जितके अडचणीत आणता येईल तितका प्रयत्न भाजप करणार. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसही भाजपची अशीच मदत घेऊन कॉंग्रेसला कमीत कमी यश कसे मिळेल याचे आखाडे बांधील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे एकीकडे आघाडी करण्याची भाषा करतात आणि दुसरीकडे पृथ्वीराज चव्हाण किंवा कॉंग्रेसवर टीकास्त्र सोडण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यामुळे आघाडीसाठी जे एकमत होण्याची गरज आहे ते होणारच नाही. चव्हाणही राष्ट्रवादीला अडचणीत आणण्याचा या ना त्या कारणाने प्रयत्न करताना दिसून येतात. पंधरा वर्षे मांडीला मांडी लावून सत्तेत बसलेले हे दोन्ही पक्ष सत्ता जाताच एकमेकांना पाण्यात पाहत आहेत. दोघांनाही स्वबळाचीच खुमखुमी आहे.

त्यासाठी राजकीय नुकसान सहन करण्याची दोघांनीही तयारी केल्याचे दिसून येते. नगरपालिका निवडणुकीत कॉंग्रेसकडे खंबीर नेतृत्व नसतानाही या पक्षावर मतदारांनी विश्वास दाखवून त्यांच्या झोळीत मताचा जोगवा टाकला. भाजपनंतर कॉंग्रेस दुसऱ्या क्रमांकावर होता हे विसरून चालणार नाही. त्या तुलनेत राष्ट्रवादी आणि शिवसेनाही मागे पडल्याचेच दिसून येते.जर हे दोन पक्ष एकत्र आले तर राज्यात नक्कीच वेगळे चित्र दिसून येईल पण या दोन्ही पक्षांच्या नेत्यांना सांगणार कोण ? हाच खरा प्रश्‍न आहे. 

युतीतही बेबनाव 
जे दोन्ही कॉंग्रेसचे तेच शिवसेना आणि भाजपचेही. राज्यात भाजपचा मुख्यमंत्री असून शिवसेनेकडे काही मंत्रिपदे आहेत. स्वबळावर निवडणूक लढल्याने भाजपला यश मिळाल्याने हा पक्ष यापुढेही शिवसेनेबरोबर युती करेल असे वाटत नाही. भाजपला इतर महापालिकेत सत्ता मिळो किंवा न मिळो त्यांना त्याची खूप चिंता आहे असे दिसत नाही. मात्र मुंबई हेच त्यांचे लक्ष्य आहे. यापूर्वी मुंबईत भाजपला कधीच बहुमत मिळाले नाही. आजपर्यंत शिवसेनेबरोबरच राहून उपमहापौरपद मिळाले आहे. यावेळची परिस्थिती मात्र बदललेली दिसते. मुबंईबाबत भाजपला अतिआत्मविश्वास आहे. मोदी आणि गुजराती समाज आपणास नक्की तारेल असे त्यांना वाटते. देशात आता भाजपची हवा आहे. ही हवा मुंबईत खेळती आहे. त्यामुळे केवळ मराठी मतांवर शिवसेना निवडून येणार नाही असे या पक्षाला वाटते. त्यामुळे सर्व जातीजमातींची गोळाबेरीज करून भाजप यश पदरात पाडून घेण्याची तयारी करीत आहे. पण, मतदार तसा चमत्कार करून दाखवतील का ? हाच प्रश्‍न आहे. 

शिवसेना सावध 
शिवसेनेही भाजपला पूर्णपणे ओळखले आहे. विधानसभा निवडणुकीतील अनुभव पाठीशी असल्याने ते ही कोणताही धोका पत्करणार नाहीत असे दिसून येते. शिवसेनाही पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार असल्याचे उद्धव ठाकरेंच्या भाषणावरून लक्षात येते. शिवसेनेची फौज गल्लीबोळात उतरलेली दिसेल. गेल्या काही वर्षापासून मुंबईवर शिवसेनेची सत्ता आहे. या पक्षाचे नेटवर्कही चांगले आहे. त्यामुळे भाजपला अगदी सहज सत्ता मिळेल असे वाटत नाही. संघर्ष तर सर्वांनाच करावा लागणार आहे. नाही म्हटले तरी कॉंग्रेसचीही मुंबईत ताकद आहे तीही नाकारता येणार नाही. 

जे मुंबईत तेच महाराष्ट्रात होणार आहे. असे म्हटले जायचे शहरीभागात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे ग्रामीण भागातील युवकांचे हिरो म्हणून ओळखले जातात. ग्रामीण भागात कॉंग्रेसप्रमाणेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचीही ताकद नाकारता येणार नाही. सर्वच जण स्वबळावर लढणार असल्याने मतदारराजा कोणाच्या झोळीत अधिक दान टाकणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. येथे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की स्वबळावर निवडणूक लढल्यास कार्यकर्त्यांना न्याय देता येतो. ते पक्षासाठी सक्रिय होतात. विरोधकांशी लढण्याचे त्यांच्यामध्ये बळ येते. आघाडी किंवा युती केल्यास जागा वाटपात आपल्याच कार्यकर्त्यांवर अन्याय होतो. स्वबळामुळे पक्षाचाही तळागाळापर्यंत प्रचार आणि प्रसार होतो. त्याचा उपयोग निश्‍चितपणे विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीवेळी होतो. म्हणूनच प्रत्येक पक्ष धुळपेरणी करीत असतात आताही ती सुरू आहे असे म्हणावे लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com