राजसाहेब, आता मात्र अती झाले !

मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

नानांनाही ज्या ज्या वेळी शिवसेनेचे किंवा बाळासाहेबांचे म्हणणे पटले नाही. तेंव्हा ते गप्प बसले नाहीत. आपल्याला काय वाटते ते प्रामाणिकपणे सांगितले. दादरच्या मराठी साहित्य संमेलनात बाळासाहेब आणि वसंत बापट, पु.ल. देशपांडे असा वाद झाला. तेंव्हा नानाने साहित्यकांची बाजू घेतल्यानंतर नानाचा पानउतारा करण्यात आला. उद्धव ठाकरेंनी त्यांना "मच्छर' म्हटले होते. 

"नाना, मकरंद, एक अभिनेता असून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांसाठी आर्थिक मदतीचे उपक्रम स्वत: चालविले...तुम्ही नेता असून ते तुम्हाला जमले नाही...भान ठेवा कोणा विषयी काय बोलताय त्याच... नेहमी कार्यकर्त्यांचे डोके फुटताना पाहिली...तुमच तर कधीच नाही...'' ही प्रतिक्रिया आहे "सरकारनामा' च्या एका वाचकाची. ती खूपच बोलकी आहे असे वाटते. 

मुंबईतीलच नव्हे तर संपूर्ण देशातच फेरीवाल्यांचा प्रश्‍न गंभीर आहे. हा प्रश्‍न कसा सोडवायचा हा प्रत्येक राज्यातील सरकारसमोरील गहन प्रश्‍न आहे. असे प्रश्‍न चुटकीसरशी सुटणार आहेत का ? याचाही थोडा विचार करायला हवा. फेरीवाल्यांच्या मुद्यावर त्यांनी कॉंग्रेसचे नेते संजय निरूपम यांनाही शिव्या हासडल्या. मराठी माणसाला विरोध करणाऱ्यांचे थोबाड फोडले पाहिजे असे त्यांना वाटते. फेरीवाल्यांच्या मुद्यावर माध्यमांनीही राजसाहेबांची बाजू उचलून धरली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार फेरीवाल्यांनी विक्री करावी ही त्यांची मागणीही रास्त आहे. त्याविषयी दुमत असण्याचे कारण नाही. फेरीवाल्यांच्या मुद्यावर जो वाद सुरू आहे. त्या वादात नानानी उडी घेतल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण लागले. 

नानानी माणूसकीच्या दृष्टिकोनातून गरीब फेरीवाल्यांविषयी दोन शब्द उच्चारले तर राजसाहेबांनी इतका थयथयाट करण्याचे काही कारण नव्हते. शिवसेना आणि नाना यांचे नाते मुंबईकरांनाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा कडवा शिवसैनिक म्हणून नानांची ओळख. बाळासाहेबांवर या माणसाने जिवापाड प्रेम केले. हे नव्याने सांगण्याची गरजही नाही. एकीकडे शिवसेनेचे जाहीरपणे समर्थन करणाऱ्या नानांनी चित्रपट क्षेत्रात काम करताना मात्र कधीही पक्ष किंवा संघटना आणली नाही. जेंव्हा जेंव्हा मराठी माणसाचा मुद्दा आला तेंव्हा तेव्हा नाना भक्कमपणे मराठीच्या मुद्यावर सर्वात पुढे आला. हे ही कसे विसरून चालेल. 

नानांनाही ज्या ज्या वेळी शिवसेनेचे किंवा बाळासाहेबांचे म्हणणे पटले नाही. तेंव्हा ते गप्प बसले नाहीत. आपल्याला काय वाटते ते प्रामाणिकपणे सांगितले. दादरच्या मराठी साहित्य संमेलनात बाळासाहेब आणि वसंत बापट, पु.ल. देशपांडे असा वाद झाला. तेंव्हा नानाने साहित्यकांची बाजू घेतल्यानंतर नानाचा पानउतारा करण्यात आला. उद्धव ठाकरेंनी त्यांना "मच्छर' म्हटले होते. 

शेतकऱ्यांच्या आत्महत्या असो की देशासाठी लढणारा जवान. अशा माणसासाठी नानांसारख्या अभिनेत्यांने नेहमीच पुढाकार घेतला. इतक्‍यावरच न थांबता पदरमोडही केली. लोकांनाही मदतीसाठी प्रोत्साहन दिले. नाना हे केवळ अभिनेते नव्हे तर समाजासाठी आपण काही तरी देणे लागतो या भावनेतून लोकांसाठी भरीव काम करता आहेत. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पोराबाळांचे अश्रू पुसतात हे नाकारून कसे चालेल ? सर्वजण नानांच्या या आदर्शवादी कार्याचा गौरव करीत असताना राजसाहेब त्यांची टिंगलटवाळकी करतात हे बरं नव्हे. त्यांनी एखाद्यावर अशापद्धतीने तुटून पडणे हे काही नवे नाही. यापूर्वी त्यांनी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, अमिताभ बच्चन यांच्यासारख्यांचाही ठाकरी शैलीत समाचार घेतला आहे. मात्र हे सभेत असणाऱ्यांना आवडते. त्यांचे समर्थक टाळ्या वाजवितात. मनोरंजन होते. मात्र सुसंस्कृत मराठी माणसाच्या हे पचनी पडतेच असे नाही. 

नाना पाटेकर यांचे वय लक्षात घेऊन तरी टीका करायची होती. नाना आणि ठाकरे कुटुंबाचे नाते खूप जुने तर आहेच. शिवाय जिव्हाळाही आहे. याचे विस्मरण खरे तर व्हायला नको होते. नानांना चोमडेपणा करू नका असे सांगतानाच जी अरेतुरेची भाषा वापरली त्याचे समर्थन करताच येणार नाही. एकीकडे परप्रांतियांवर तुटून पडता आणि आपल्याच मराठी माणसाला पंच मारता. नानांचे निरूपम यांनी अभिनंदन केले त्यात नानांचा काय दोष ? आज मुंबईत मराठी मुलंही फेरीवाले आहेतच की? शिवाजी मंदीर, प्लाझाभागात पालघर, वसई किंवा डहाणूपासून येणारी मराठी मंडळी आहेत. ती वर्षापुवर्षे तेथे बसून भाजी विक्री करतात. दादरकर मुद्दाम मराठी माणसाकडील भाजी घ्यायला जातात हे कसे विसरून चालेल. ही मराठी माणस काही मुंबईतील गटाराची भाजी विकत नाही हे ही लक्षात घ्यायला हवे. 

"नाना, तू मराठी कलावंत आहेस. तू मला आवडतो. तू महाराष्ट्रावर बोल. तो निरूपम तुझे अभिनंदन करतो. यायचे नसेल आमच्याबरोबर येऊ नको. मात्र मध्ये चोमडेपणा कशासाठी करता. काय वस्तुस्थिती आहे. हे कळत नाही. फेरीवाल्याच्या मुद्यावर सरकारशी बोललो. हे माहीती न घेता पाटेकर आमच्यावर टीका करतो आहे. त्याने हे उद्योग प्रथम बंद करावे असा राजसाहेबांनी नानाला दिलेला इशारा आवडला नाही हेच सभ्य भाषेत किंवा नानांशी प्रत्यक्ष बोलून त्यांना पटवून देता आले नसते का ? राजसाहेब !