मुंबईत महाराष्ट्र आहे का? 

Devendra Fadnavis and Uddhav Thackeray
Devendra Fadnavis and Uddhav Thackeray

मुंबईच्या भल्यासाठी शिवसेना-भाजप हे दोन पक्ष जर एकत्र लढले असते तर कॉग्रेंस-राष्ट्रवादी काय किंवा मनसे काय यांचा पालापाचोळा झाला असता, पण दोघांनाही सत्तेची नशा चढली आहे. ही नशा प्रत्यक्ष निकाल हाती येईपर्यंत उतरणार नाही. हे खरे असले तरी मुंबईत महाराष्ट्र आहे का? हा प्रश्‍न पुन्हा एकदा विचारण्याची वेळ आली आहे. 

दिवंगत मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी काही वर्षांपूर्वी असा प्रश्‍न केला होता की मुंबईत महाराष्ट्र आहे? दादांनी हा प्रश्‍न करून किमान तीस-चाळीस वर्षे तरी झाली असेल. त्यावेळची मुंबई आणि आजची मुंबई अशी तुलना केली, तर ही मायानगरी पार बदलून गेली असे म्हणावे लागेल. कोणी काही म्हटले तरी काँग्रेसच्या अंतर्गत लाथाळ्यामुळे मुंबईची सत्ता नेहमीच शिवसेनेकडे राहिली. मुंबईत शिवसेना हवी असे बहुसंख्य काँग्रेस पुढाऱ्यांनाही वाटते. पण, कोणी उघड बोलत नसे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वेळोवेळी काँग्रेसच्या नेत्यांनी सहकार्य केले असेही बोलले जात असे. खरेखोटे त्यांनाच माहीत. मात्र मुंबई हा केवळ मराठी माणसाचाच नव्हे, तर संपूर्ण देशाचाच जिव्हाळ्याचा विषय. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने येथे पोटाची खळगी भरण्यासाठी देशभरातून दररोज होणाऱ्या स्थलांतरामुळे मुंबईवरचा बोजा वाढतोच आहे. तो कदापी कमी होणार नाही. सर्वच जातीधर्माचे लोक मुंबईत असल्याने ती बहुभाषक कधीचीच बनली. शिवसेना मराठी माणसासाठी खंबीरपणे उभी राहिली नसती, तर आज या शहरात जो काही टक्का आहे तो दिसलाच नसता. म्हणूनच मुंबईतील मराठी माणूस नेहमीच बाळासाहेब ठाकरे यांच्या मागे उभा राहिला. त्याने प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेला खंबीर साथ दिली हा इतिहास आहे.

नवीन वर्षात मुंबईसह महापाकिलांच्या निवडणुका होत आहेत. विशेषत: मुंबईसाठी शिवसेना-भाजपत कलगीतुरा होऊ लागला आहे. शिवसेनाही आक्रमकपणे भाजपवर तर भाजप शिवसेनेवर तुटून पडत आहेत. आणखी महिनाभर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत राहणार आहेत. मुंबईचे भले करूनच मी नागपूरला जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तर मोदींचे विरोधक आमचे होऊ शकत नाही असे मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हटले आहे. शिवसेनाही पंतप्रधानांनाच लक्ष्य करीत आहे. जितके भाजपला बदनाम करता येईल तितका प्रयत्न शिवसेना करीत आहे. हे चित्र पाहताना एक गोष्ट मात्र यावेळी लक्षात येत आहे की शिवसेनेत आक्रमक नेते उरले आहेत की नाही. एक उद्धव ठाकरे, दुसरे संजय राऊत आणि तिसरा सामना पेपर. ही त्रिमूर्तीच एकाएकी खिंड लढवीत आहेत. मग दुसरे नेते गेले कुणीकडे.

शिवसेनेचा एक काळ असा होता, की शिवसेनाप्रमुखांनंतर दत्ताजी साळवी, वामनराव महाडीक, प्रमोद नवलकर, मनोहर जोशी, छगन भुजबळ, सुधीर जोशी, लीलाधर डाके आदी जे नेते होते त्यांच्या सभांनाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असे. तसे चित्र आज पक्षात पाहण्यास मिळत नाही. भाजप शिवसेनेला ज्या पद्धतीने लक्ष्य करीत आहे तसे जर त्यावेळी झाले असते शिवसेनेच्या या वाघांनी डरकाळी फोडली असती. वातावरण ढवळून निघाले असते. आव्हान स्वीकारले असते. मात्र तसे चित्र आज दिसत नाही. आव्हान स्वीकारण्याची हिम्मत आज पक्षात आहे का? असा प्रश्‍न पडतो. सामनातून दिले जाणारे आव्हान मिळमिळीत वाटते. म्हणूनच नेता कोणताही असो जो मैदानात उतरून लढण्याची भाषा करतो किंवा जो लढतो तोच हिरो असतो. बाळासाहेब म्हणूनच मराठी माणसाला हिरो वाटायचे. पूर्वीची परिस्थिती वेगळी होती. यावेळचा सामना वेगळा आहे. कारण परममित्रच एकमेकांचे वैरी बनले आहेत. 

येथे आणखी एक मुद्दा लक्षात घ्यावा लागेल, की आजपर्यंत महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री होऊन गेले ते मूळचे मुंबईकर किती होते. एक मनोहर जोशी आणि नारायण राणे (दोघेही कोकणातले पण कर्मभूमी मुंबई) ही नावे सोडली तर सगळे मुख्यमंत्री बाहेरचेच (मुंबईबाहेरचे) होऊन गेले. यशवंतराव चव्हाण (सातारा), वसंत नाईक (विदर्भ), वसंतदादा पाटील (सांगली), ए.आर.अंतुले (रायगड), शरद पवार (बारामती), शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण (मराठवाडा) पृथ्वीराज चव्हाण (सातारा) आणि आता देवेंद्र फडणवीस (नागपूर). शिवसेनेचे राज्य आल्यानंतर मुख्यमंत्री या शहरातला झाला. याचा अर्थ उर्वरित सर्व मुख्यमंत्र्यांचे या शहराकडे लक्ष्य नव्हते असे नाही. सर्वच मुख्यमंत्र्यांनी मुंबईसाठी काही ना नाही योगदान दिले आहे. त्यामुळे फडणवीस हे जरी नागपूरचे असले तरी तेही मुंबईचे भले करू शकतात. मुंबईची सत्ता नाही आली तरी ते तिला पोरकी करणार नाही असे वाटते. नाहीतरी जे मुंबईकर होते त्यांनी तरी मुंबईसाठी किती योगदान दिले हा प्रश्‍न आहेच ना? 

जर मुंबईच्या भल्यासाठी हे दोन्ही पक्ष जर एकत्र लढले असते तर काँग्रेंस-राष्ट्रवादी काय किंवा मनसे काय यांचा पालापाचोळा झाला असता पण दोघांनाही सत्तेची नशा चढली आहे. ही नशा प्रत्यक्ष निकाल हाती येईपर्यंत उतरणार नाही. गुजरातीसह इतर समाजाची मते कोणाकडे वळतात यावरच या दोन्ही पक्षाचे यशापयश असेल. कोणी काही म्हटले तरी भाजपचा विजय मोदी यांच्यावरच अवलंबून आहे. जर मोदी कार्ड नसेल भाजपचे नाणे चालणार नाही. तसेच शिवसेना मराठी मुद्याबरोबरच हिंदुत्वाचे कार्ड वापरल्याशिवाय राहणार नाही. शहरात पोस्टर्सवॉर सुरू झाले आहे. विरोधकांना जोरदार पंच देऊन घायाळ करण्याची शिवसेनेची पद्धत जुनी आहे. भाजप शिवसेनेला कसे उत्तर देते याची प्रतीक्षा करावी लागणार असली तरी मुंबईत महाराष्ट्र आहे का? हा प्रश्‍न उरतोच. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com