मुंबईत शिवरायांचे स्मारक व्हायलाच हवे !

shivsmarak
shivsmarak

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने प्रत्येक पक्ष राजकारण करतो. त्या महाराजांचे मुंबईच्या अरबी समुद्रात जर स्मारक होत असेल तर बिघडले कोठे? महाराजांसाठी पैशाचे कारण सांगण्यात काहीच अर्थ नाही. 

अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक व्हायलाच पाहिजे यात शंका घेण्याचे काहीच कारण नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित या स्मारकाचे भूमिपूजन झाले. आता स्मारक केव्हा आणि कधी पूर्ण होणार हे काळच ठरवील. इतके खरे की शिवसेनेचा मराठीचा मुद्दा हायजॅक करण्याचा किंवा मराठी मते स्वत:कडे वळविण्याचा पुन्हा एक प्रयोग भाजपने मुंबईत केला असे म्हणावे लागेल. 

मुंबईत शिवाजी महाराजांचे स्मारक झाल्यास त्याचे सर्व क्रेडिट अर्थात भाजपच घेणार यात शंका घेण्याचे कारणच नाही. शिवाजीराजांचे स्मारक उभारल्यास जे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला जमले नाही ते आम्ही करून दाखविले हे ही भाजप छातीवर हात ठेवून सांगू शकतो. शिवाय शिवाजीमहाराजांविषयी भाजपला किती प्रेम आहे हे ही सांगण्याची संधी ते सोडणार नाहीत. मुंबई कोणाची हा प्रश्‍न नेहमीच शिवसेनेकडून केला जातो. अर्थात ती मराठी माणसाची हे शिवसेना आणि त्यांचे कार्यकर्ते अभिमानाने सांगतात. आज मुंबईत मराठी टक्का किती हा दुय्यम प्रश्‍न असला तरी मुंबईत मराठीत माणूस ताठ मानेने उभा राहिला तो शिवसेनेमुळे. हे वास्तवही नाकारता येणार नाही.

यापूर्वीही कॉंग्रेसने मुंबईतील शिवसेनेची सत्ता उखडून टाकण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला. पण डाळ शिजली नाही. जे कॉंग्रेसने केले आता तेच भाजप करीत आहे. मुंबईतील गुजराती समाजाची व्होट बॅंक तसेच मराठी टक्का आपल्याकडे वळल्यास भाजपला मुंबईची सत्ता मिळेल असे गणित या पक्षाचे नेते मांडत असले तरी ते तितके सोपे नाही. मुंबई महापालिकेच्या तोंडावर इतक्‍या घाईगडबडीत स्मारकाचे भूमिपूजन करण्याची गरज होती का ? हा ही प्रश्‍न येतोच. वास्तविक शिवाजी महाराजांचे इतके भव्य स्मारक देशाच्या आर्थिक राजधानीत होत असेल त्याच्या इतकी अभिमानाची दुसरी गोष्ट नाही. आता या स्मारकावरून राजकारण सुरू आहे. राज ठाकरे, राजू शेट्टी यांच्यासह अन्य काही नेत्यांनीही भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. उद्धवना भूमिपूजनाचा बोलाविल्याने ते आता गप्प आहेत. 

मुंबईतच इतके भव्य स्मारक का झाले पाहिजे. तर मुंबई तोडण्याची भाषा अनेक मंडळी करतात. जया बच्चनसारख्या अभिनेत्रीने संपूर्ण आयुष्य या शहरात घालविले. मुंबईनेच त्यांना घडविले. मात्र, जयाबाईंना मुंबईतील मराठीपण डोळ्यात खुपत. जयाबाईंच्या पंक्तीत अनेक मराठीद्वेष्ठे बसलेले आहेत. पण जोपर्यंत शिवसेना आहे तोपर्यंत कोणीच मुंबईला तोडू शकत नाही. कोणी काही म्हणो मुंबईतील मराठीपण शिवसेनेमुळे टिकले हे कदापी नाकारून चालणार नाही. मग भाजपला कितीही मराठीपणाचा पुळका येऊ दे. आज भाजपकडे सत्ता आहे. त्यामुळे त्यांना दररोज भूमिपूजन, उद्‌घाटन करण्याचा अधिकार आहे. खरेतर शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी सर्वच पक्षांना बरोबर घेऊन सर्वांचे एकमत होऊन जर स्मारकाचे काम मार्गी लागले असते तर वादविवाद झालेच नसते. पण,भाजपला स्मारकापेक्षाही मुंबईची सत्ताही महत्त्वाची वाटते. एकदा का मुंबईची सत्ता ताब्यात आली की संपूर्ण महाराष्ट्रात भाजपचा जयजयकार झाल्याचे दिल्लीश्‍वरांना सांगण्यास मुख्यमंत्री मोकळे होतील. 

स्मारकाऐवजी किल्ल्यांच्या दुरुस्तीवर खर्च करायला हवा असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मत आहे. पण, शेवटी ज्या शिवाजी महाराजांच्या नावाने प्रत्येक पक्ष राजकारण करतो त्या महाराजांचे मुंबईच्या अरबी समुद्रात जर स्मारक होत असेल तर बिघडले कोठे ? मुंबईत स्मारक व्हायलाच पाहिजे. जर किल्ल्यासाठी पैसे मिळायला हवेत असे जर राज यांना वाटत असेल तर त्यांनी किंवा त्यांच्या पक्षांने याकामी पुढाकार घेण्यास काय हरकत आहे."फूल ना फुलाची पाकळी' का होईना ती जमा करण्यास राज यांनी पुढाकार घेतल्यास प्रत्येक मराठी माणूस त्यांच्या झोळीत दान टाकेल की नाही ? येथे एक उदाहरण द्यावेसे वाटते. ज्या कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयतची स्थापना केली. असंख्य गोरगरीब मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. उच्चशिक्षित केले. अशा काही माजी विद्यार्थ्यांनी रयतसाठी खूप मदत केली. स्वत: शरद पवार हे तर नेहमीच रयतच्या विकासासाठी पुढाकार घेतात. त्यांनी रयतसाठी शब्द टाकला की भलेभले मदतीसाठी पुढे येतात. हा आदर्श राज ठाकरेंनी डोळ्यांसमोर ठेवायला हवा. किल्ल्यांचे संवर्धन व्हायलाच हवे त्याविषयी दुमत असण्याचे कारणच नाही. पण सर्व सरकारच करेल ही अपेक्षा ठेवण्याबरोबरच स्वत:ही पुढाकार घ्यायला हवा असे वाटते. 

छत्रपती शिवाजी महाराजांसाठी कोणत्याही राज्यकर्त्यांनी पैशाचे कारण सांगण्यात काहीच अर्थ नाही. गुजरातमधील वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्यासाठी प्रत्येक भारतीयांकडून भाजपने मदत मागितली. लोकांनीही उदार अंतःकरणाने मदत केलीच ना? हे ही या स्मारकानिमित्ताने लक्षात घेण्याची गरज आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com