ग्रामीण भागाला प्राधान्य हवे - फडणवीस

ग्रामीण भागाला प्राधान्य हवे
ग्रामीण भागाला प्राधान्य हवे

मुंबई - राज्यातील 30 हजार "आपले सरकार केंद्रां'वर डिजिटल बॅंकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, ग्रामपंचायत स्तरावर ही केंद्रे व्यावसायिक प्रतिनिधी म्हणून काम पाहतील. त्यामुळे ग्रामीण भागात शेतकरी, व्यापारी व वाहतूकदारांना सुविधा निर्माण होणार आहे. पंतप्रधानांनी केलेल्या कॅशलेस अर्थव्यवस्था अंगीकारण्याच्या आवाहनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वांनी नियोजन करून ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

पाचशे आणि हजार रुपयांच्या चलन निश्‍चलनीकरणाच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आज राज्यस्तरीय बॅंक समितीची तातडीची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर बोलविली होती. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी वरील मत व्यक्त केले. सहकारमंत्री सुभाष देशमुख, राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षेत्रीय, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डी. के. जैन, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, विविध विभागांचे प्रधान सचिव, सचिव, तसेच राष्ट्रीयीकृत बॅंकांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील व्यवहार सुरळीत झाले पाहिजेत, असे आवाहन करून मुख्यमंत्री म्हणाले, की रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी बी-बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी करण्यासाठी ग्रामीण भागातील बॅंकांच्या शाखांमध्ये रोकड उपलब्ध करून देण्यात यावी. खरीप हंगामातील पीक शेतकऱ्यांना बाजारात विक्री करता यावे, यासाठी व्यापारी, वाहतूकदार आणि शेतकऱ्यांचे व्यवहार सुरळीत होण्यासाठी बॅंकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
बैठकीस रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया, स्टेट बॅंक, बॅंक ऑफ महाराष्ट्र, बॅंक ऑफ बडोदा, नाबार्ड, तसेच मोबाइल वॅलेट कंपन्यांचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते.

शेतकऱ्यांसाठी बॅंकांचा पुढाकार
मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत शेतकऱ्यांना बियाणे, खते खरेदी करणे सोपे व्हावे, यासाठी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावरून एका अर्जावरून अधिकृत विक्रेत्याच्या खात्यात पैसे जमा करण्याची सुविधा निर्माण करण्यासाठी बॅंकांनी तयारी दर्शविली. नोटा निश्‍चलनीकरणानंतर बॅंकांमध्ये गर्दी होत आहे. गेल्या काही दिवसांपासून बॅंकांमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अतिरिक्त वेळ देत परिस्थिती उत्तम प्रकारे हाताळली आहे, त्याबद्दल त्यांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com