शुल्कवाढीचा फुगा अखेर फुटला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मार्च 2017

राज्यातील दोन हजार संस्थांचे शुल्क 25 टक्‍क्‍यांनी कमी

राज्यातील दोन हजार संस्थांचे शुल्क 25 टक्‍क्‍यांनी कमी
पुणे - खासगी विनाअनुदानित शिक्षण संस्थांनी खोटी माहिती आणि कागदपत्रांच्या आधारे वाढविलेल्या शुल्काचा फुगा नव्या शुल्क नियामक प्राधिकरणाने फोडला. यामुळे राज्यातील दोन हजार संस्थांचे शुल्क साधारणपणे 25 टक्‍क्‍यांनी कमी झाले आहे. यात पुण्यात सुमारे शंभरहून अधिक महाविद्यालये आहेत. तसेच, पहिल्या वर्षी निश्‍चित झालेले शुल्क आता पुढे कायम राहणार आहे.

नव्या सरकारने स्थापन केलेल्या या प्राधिकरणाची स्थापना झाल्यानंतर त्यातील सदस्यांनी प्रथमच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांना भेटी देऊन शुल्काशी संबंधित बाबींचा आढावा घेतला. या दरम्यान शुल्कवाढीसाठी संस्थांच्या क्‍लृप्त्या समोर आल्या. प्राध्यापकांबाबत खोटी माहिती देणे, खर्चाचे आकडे फुगविण्यासारखे प्रकार संस्थांनी केले आहेत. समितीतील सदस्यांनी हे खर्च नाकारले आणि विद्यार्थ्यांना द्याव्या लागणाऱ्या शुल्कामध्ये लक्षणीय घट झाली.

खासगी विनाअनुदानित महाविद्यालयांत चालविले जाणारे एमबीबीएस, एमडी यांसह सर्व आरोग्यविज्ञानविषयक अभ्यासक्रम, सर्व अभियांत्रिकी शाखा, एमसीए, तंत्रनिकेतन, वास्तुकला, औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शुल्कामध्येही घट झाल्याची माहिती प्राधिकरणाच्या एका सदस्याने माध्यमांना दिली. नव्या प्राधिकरणाने शुल्कनिश्‍चितीची बैठक झाल्यानंतर तत्काळ शुल्काची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नंतर कोणत्याही स्थितीत शुल्काच्या रकमेत बदल होणार नाही.

प्राधिकरणाच्या स्थापनेची प्रक्रिया सुरू असल्याने 2016-17 या शैक्षणिक वर्षाचे शुल्क वाढविण्यात आले नव्हते. शुल्कामध्ये 20 टक्‍क्‍यांची वाढ प्राधिकरणाने गृहीत धरली होती. म्हणजे एखाद्या महाविद्यालयाचे शुल्क एक लाख असल्यास 2017-18 मध्ये त्याचे शुल्क एक लाख 20 हजार रुपये गृहीत धरण्यात आले. परंतु, खर्चाचे आकडे आणि त्यांची सत्यता तपासल्यानंतर संस्थांनी केलेला आकड्यांचा घोळ समोर आला. प्राधिकरणाने चुकीचे खर्च हिशेबातून वगळल्याने अनेक महाविद्यालयांचे शुल्क हे तब्बल 40 टक्‍क्‍यांनी कमी झाले आहे, असे या सदस्याने सांगितले.

शुल्क परत मिळणार
शैक्षणिक वर्ष 2016-17 मध्ये शुल्कनिश्‍चिती झाली नसल्याने या वर्षाचे प्रवेश देताना महाविद्यालयांनी शुल्कामध्ये पाच टक्‍क्‍यांनी वाढ केली. आता 2017-18 चे शुल्क हे मागील वर्षीपेक्षा कमी होणार आहे, त्यामुळे संस्थांनी विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क घेतलेले असल्यास ते त्यांना परत करावे लागेल. संस्था वा विद्यार्थ्यांना नव्याने निश्‍चित झालेले शुल्क मान्य नसल्यास त्यांना प्राधिकरणाकडे अपील करता येणार आहे. विद्यार्थ्यांना 2017-18 या वर्षाचे शुल्क प्राधिकरणाच्या (पूर्वीची शिक्षण शुल्क समिती) संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे प्राधिकरणाकडून सांगण्यात आले.

शुल्काचा फुगवटा यामुळे...
- संस्थेतील अभ्यासक्रमांसाठी प्रमाणापेक्षा जास्त शिक्षक दाखविणे.
- कर्मचाऱ्यांना रोखीने पगार दिल्याचे दाखवून खर्चाचे आकडे फुगविणे.
- ओळखपत्र, स्नेहसंमेलन, प्रयोगशाळा, स्टेशनरी, बसचार्जचा खर्च दाखविणे.
- खर्चाचे आकडे वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांची संख्या कमी दाखविणे.
- प्रत्येक अभ्यासक्रमासाठी एकच लाइटबिलाचा खर्च सादर करणे.
- वीजबिल, देखभाल- दुरुस्ती, सुरक्षा यांसाठी अवाजवी खर्च दाखविणे.

शिक्षण संस्था आणि शुल्क कपात
संस्था अभ्यासक्रम 2015-18 2017-18

सिंहगड इन्स्टि. मॅनेजमेंट, वडगाव एमबीए 151150 112000
सिंहगड इन्स्टि. मॅनेजमेंट, वडगाव एमसीए 94380 57000
युनिव्हर्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अभियांत्रिकी 94380 57000
शरच्चंद्र पवार फार्मसी कॉलेज एमफार्म 87000 50000
भारती विद्यापीठाचे नेहरू इन्स्टिट्यूट तंत्रनिकेतन 63700 30000
भारती कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अभियांत्रिकी 81870 61000
डी. वाय. पाटील तंत्रनिकेतन तंत्रनिकेतन 62900 47700
डी. वाय. पाटील वास्तुकला वास्तुकला 100000 76000
डी. वाय. पाटील व्यवस्थापन एमबीए 91380 70500
एमआयटी स्कूल ऑफ मॅनेजमेंट एमबीए 143000 125500

Web Title: private college fees decrease 25 percentage