कर्नाटकच्या मंत्र्याने केलेल्या विधानाचा निषेध - चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

मुंबई - "जय महाराष्ट्र' म्हणणाऱ्या मराठी भाषिकांवर कारवाई करण्याच्या कर्नाटकातील मंत्र्याने केलेल्या विधानाचा आज त्या सरकारला पत्र पाठवून महाराष्ट्र सरकारने निषेध केला आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना आज याबाबत पत्र पाठविले आहे. त्यात महाराष्ट्राला विरोध करणाऱ्या विधानांबद्दल खेद आणि रोष व्यक्त करीत आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी वक्तव्ये संघराज्यविरोधी असल्याचे नमूद केल्याचे समजते.

कर्नाटकात गेलेल्या बेळगाव-कारवार-निपाणीचा वाद गेली काही वर्षे सतत धुमसतो आहे. हा वाद योग्य स्तरावर सोडवावा यासाठी महाराष्ट्र सरकार वारंवार विनंती करत असताना जबाबदार मंत्र्यांनी असे विधान करणे चीड आणणारे असल्याचे मत महाराष्ट्रात व्यक्त होत आहे. सीमावाद न्यायालयाच्या कार्यकक्षेत असताना मतांकडे डोळे ठेवून महाराष्ट्रविरोधी भूमिका घेतली जात नाही ना? असा संशयही यासंदर्भात व्यक्त करण्यात येतो आहे. सिद्धरामय्या यांचे सरकार कॉंग्रेस पक्षाचे असल्याने महाराष्ट्रातील भाजप आणि शिवसेना सदस्यांनी यासंदर्भातील भावना अधिकच तीव्रपणे व्यक्त केल्या आहेत.

कर्नाटक लवकरच विधानसभा निवडणुकांना सामोरे जात असताना असा वाद पुन्हा सुरू होणे राजकारणालाही वाव देणारे ठरेल. मात्र, त्याचवेळी सीमावर्ती भागातील मराठी बांधवांनी महाराष्ट्र सरकारने निषेधांच्या ठराव आणि पत्रांपलीकडे काहीतरी ठोस करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. चंद्रकांत दादा पाटील यांनी यासंदर्भात केंद्र सरकारशी बोलण्याची तयारीही ठेवली असल्याचे समजते.