पुणे शहर मुंबईपेक्षा मोठे होण्याची शक्‍यता 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मे 2017

मुंबई - पुणे जिल्ह्यातील 34 गावांना पुणे महापालिकेत समाविष्ट करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक विचार करत आहे, असे राज्य सरकारच्या वतीने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात सांगण्यात आले. हा निर्णय 12 जूनपर्यंत घेण्याचे निर्देश न्यायालयाने सरकारला दिले. हा निर्णय झाल्यानंतर पुणे शहर मुंबईपेक्षा मोठे होण्याची शक्‍यता आहे. 

पुण्यातील 34 गावांना महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट करण्याचा निर्णय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. निवडणुकांच्या वेळीही राज्य सरकारने हा निर्णय घेतला नव्हता. याविषयी हवेली नागरी कृती समितीने केलेल्या याचिकेवर न्या. नरेश पाटील यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. राज्य सरकार या गावांचा पालिकेच्या हद्दीत समावेश करण्याबाबत विचार करत आहे. याविषयीची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती सरकारी वकिलांनी खंडपीठाला दिली. सरकारने याबाबत लवकर निर्णय घ्यायला हवा; अन्यथा गावांच्या निवडणुका झाल्या की त्याचा खर्च सरकारवर येतो आणि प्रकरणे न्यायालयात येतात. अन्य काही गावांबाबतही हा प्रश्‍न निर्माण होत आहे. त्यामुळे सरकारने 12 जूनपर्यंत निर्णय घेतल्यास निवडणुकीचा खर्च वाचेल, असे खंडपीठाने सांगितले. 

पुणे जिल्ह्यातील म्हाळुंगे, सूस, बावधन, किरकटवाडी, पिसोळी, लोहगाव, कोंढवे, धावडे, खडकवासला, उरुळी देवाची, काळेवाडी, वाघोली, जांभूळवाडी, लोहकरवाडी, वडाचीवाडी आदी गावांचा महापालिका हद्दीत समावेश झाल्यास पुणे शहराचे क्षेत्रफळ सुमारे 453 चौरस किलोमीटर होईल. मुंबईचे क्षेत्रफळ 450 चौरस किलोमीटर आहे. त्यामुळे गावांच्या समावेशाचा निर्णय झाल्यास पुणे हे मुंबईपेक्षा मोठे शहर होण्याची शक्‍यता आहे.