राज्यात यंदा 100 टक्के पेरण्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

कापूस, सोयबीनवर कीडरोग; 26 तालुके पावसाअभावी कोरडे
पुणे - राज्यात खरिपाची पेरणी 100 टक्के झाली असली, तरी 26 तालुक्‍यांमध्ये कमी पावसाने तेथील पिकांची स्थिती असमाधानकारक आहे. सोयबीन आणि कापूसउत्पादक जिल्ह्यांमध्ये कीडरोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. मूग, उडदाची काढणी लवकरच सुरू होण्याची चिन्हे आहेत.

कापूस, सोयबीनवर कीडरोग; 26 तालुके पावसाअभावी कोरडे
पुणे - राज्यात खरिपाची पेरणी 100 टक्के झाली असली, तरी 26 तालुक्‍यांमध्ये कमी पावसाने तेथील पिकांची स्थिती असमाधानकारक आहे. सोयबीन आणि कापूसउत्पादक जिल्ह्यांमध्ये कीडरोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. मूग, उडदाची काढणी लवकरच सुरू होण्याची चिन्हे आहेत.
राज्यात एक जून ते एक सप्टेंबरपर्यंत यवतमाळमध्ये सर्वांत कमी पाऊस झाला. जळगाव, कोल्हापूर, औरंगाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये कमी, म्हणजेच सरासरीच्या 50 ते 75 टक्के पाऊस झालाय. नाशिक, धुळे, नंदूरबार, सोलापूर, सातारा, सांगली, जालना, उस्मानाबाद, बुलडाणा आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या 75 ते 100 टक्के पाऊस झाला. फक्त ठाणे, पालघर, रायगड, नगर, पुणे, बीड आणि लातूर जिल्ह्यात 100 टक्‍क्‍यांहून जादा पाऊस झाल्याचे कृषी खात्याच्या अहवालात म्हटले आहे.

राज्यात खरिपात ऊस क्षेत्र वगळता 139 लाख हेक्‍टरपैकी आतापर्यंत 140 लाख हेक्‍टरवर पेरा झालेला आहे. नागपूर विभाग वगळता राज्यातील सर्वच भातउत्पादक पट्ट्यातील पुनर्लागवडीची कामे आटोपली आहेत. राज्यातील काही तालुक्‍यांमध्ये विविध पिकांच्या वाढीसाठी पावसाची आवश्‍यकता असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

बाजरी आता फुलोरा, कणसे लागणे, कणसे भरण्याच्या स्थितीत; तर ज्वारी आणि तूर वाढीच्या अवस्थेत आहेत. मूग आणि उडीद शेंग पक्वता ते काढणीच्या अवस्थेत आहे. सोयबीन आता फुलोरा, शेंगा भरणे ते पक्वतेच्या अवस्थेत आहे. भुईमूग पीक फुलोरा ते आऱ्या सुटण्याच्या अवस्थेत आहे. कापूस पीक फुलोरा, पाते तर काही ठिकाणी बोंडे लागण्याच्या अवस्थेत आहे.

राज्यात विविध पिकांवर कीडरोगांचा प्रादुर्भाव दिसतोय. सिंधुदुर्ग आणि नाशिक जिल्ह्यातील काही गावांमध्ये भात पिकावर पिवळा खोडकिडा दिसत आहे. नंदूरबार, जळगाव आणि धुळे भागात कपाशीवर पाने खाणारी अळी, शेंदरी बोंडअळी, अमेरिकन आणि ठिपक्‍याच्या बोंडअळीचा प्रादुर्भाव आहे. नगर, सातारा आणि नांदेड जिल्ह्यांत काही ठिकाणी सोयबीनवर उंटअळी दिसते. कृषी खात्याचे क्षेत्रीय कर्मचारी गावोगावी बैठका घेवून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पावसाळा संपत आला तरी आमच्या भागात पाऊस झालेला नाही. विहिरींना पाणी नाही. माझे सात एकर सोयबीन पावसाअभावी वाया गेले. गावात दोन आठवड्यातून एकदा नळाला पाणी येते. पावसाळ्यात हे हाल; तर उन्हाळ्यात आमच्या नशिबी काय असेल, ते सांगू शकत नाही.
- सचिन विलास पाटील, शेतकरी, मु. पो. साखरखेर्डा, ता. सिंदखेडराजा, जि. बुलडाणा

कृषी सांख्यिकी विभागाने जाहीर केलेली एक सप्टेंबरपर्यंतची पेरणी स्थिती
पीक ------ सरासरी क्षेत्र ---- गेल्या वर्षीचा पेरा ------- चालू वर्षाचा पेरा
धान 1521317 ----1514151-------1339639 (88)
ज्वारी 859979----490573-------408326 (47)
बाजरी 857477----852899--------663200(77)
नाचणी 122187---92400-------85952(70)
मका 740541----920228-------911956(123)
तूर 1219999---1528669---------1271154(104)
मुग 432719----511435----------449456(104)
उडीद 363374---453388--------473895(130)
भुईमुग 247772----211269-------210518(85)
तीळ 38202----21118-----210518(85)
कारळे 33819---16261----------17983(53)
सूर्यफुल 42200--14780----------15224(36)
सोयबीन 3192680--3966092------3818508(102)
कापूस 4129001----3804427------4202653(102)

(सर्व आकडे हेक्‍टरमध्ये असून, कंसातील आकडे एकूण सरासरी क्षेत्र दर्शवितात)
(टक्केवारीचे आकडे सरासरी क्षेत्राच्या तुलनेत झालेल्या पेरणीचे आहेत)