गणेश विसर्जनादरम्यान राज्यात 16 जणांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

पुणे - गणेश विसर्जनादरम्यान राज्यात विविध ठिकाणी 16 जणांचा मृत्यू झाला. पुणे, औरंगाबाद, नाशिक, पिंपरी, चिंचवड, बीड, जळगाव आणि बुलडाणा येथे या घटना घडल्या.

पुणे - गणेश विसर्जनादरम्यान राज्यात विविध ठिकाणी 16 जणांचा मृत्यू झाला. पुणे, औरंगाबाद, नाशिक, पिंपरी, चिंचवड, बीड, जळगाव आणि बुलडाणा येथे या घटना घडल्या.

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्‍यातील बिडकीन येथे शिवनाई तलावात घरगुती गणपती विसर्जनासाठी गेलेल्या 3 मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत्यू झालेले तिघेही जण 8 ते 10 वर्षांचे आहेत. आदर्श कीर्तीशाई, सागर तेलभाते, राजेश गायकवाड अशी मृत मुलांची नावे आहेत. विसर्जनावेळी दौलताबादच्या तलावात गाळात पाय रुतल्याने एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. जळगाव जिल्ह्यात जामनेरच्या शेंदुर्णी येथे विसर्जनावेळी दोन तरुणांचा धरणात बुडून मृत्यू झाला.

सेल्फीच्या नादापाई मृत्यू
नाशिकमध्ये गणपती विसर्जनादरम्यान एका 23 वर्षीय तरुणाचा सेल्फीच्या नादापायी नदीत बुडून मृत्यू झाला आहे. नाशिकमधील चेहेडी परिसरातील किशोर सोनार हा तरुण आईवडिलांसोबत विसर्जनासाठी दारणा नदीपात्रात गेला होता. या वेळी सेल्फी घेण्याच्या नादात त्याचा तोल गेला आणि तो नदीत बुडाला. ही घटना काल दुपारी दोनच्या सुमारास घडली.

पुण्यात एकाचा मृत्यू
पुण्यातील मरकळ (ता. खेड) येथे इंद्रायणी नदीत गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या 18 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. आकाश सुनील वरपे (रा. मरकळ, ता. खेड) असे तरुणाचे नाव आहे. मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे. पुण्यात जगताप डेअरी येथे कस्पटे वस्ती या ठिकाणी दोन युवक नदीत वाहून गेले. अग्निशामक दलाचे जवान त्यांचा शोध घेत आहेत. सोनाजी शेळके (वय 15, रा. गुरुदास बालवडकर चाळ, बालेवाडी) व रखमाजी सुधाकर वारकड (वय 18, रा. रोहिदास चाळ, बालेवाडी) अशी वाहून गेलेल्यांची नावे आहेत.

बीड जिल्ह्यात गणपती विसर्जन करताना मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. माजलगाव तालुक्‍यातील उमरी येथे ही घटना घडली. पांडुरंग महादेव धायतिडक (वय 15) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. त्याला सहा बहिणी आहेत.