आंदोलन सुरूच

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 जून 2017

राज्यात ठिकठिकाणी सरकारी कार्यालयांना कुलपे ठोकली
पुणे - संपूर्ण कर्जमुक्ती आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीसह विविध मागण्यांसाठी राज्यात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची तीव्रता सहाव्या दिवशीही कायम राहिली.

राज्यात ठिकठिकाणी सरकारी कार्यालयांना कुलपे ठोकली
पुणे - संपूर्ण कर्जमुक्ती आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीसह विविध मागण्यांसाठी राज्यात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची तीव्रता सहाव्या दिवशीही कायम राहिली.

मराठवाडा, विदर्भ, सांगली, नाशिक, सोलापूर, पुणे, नगर भागांतील अनेक सरकारी कार्यालयांना शेतकऱ्यांनी कुलपे ठोकली. कोल्हापूर जिल्ह्यात मात्र संपाचा जोर आज कमी राहिला. गोकूळ, वारणा, स्वाभिमानी या दूध संघांचे संकलन सुरळीत सुरू झाले. कोकणात काही ठिकाणी आंदोलनामुळे भाज्यांच्या दरात दुपटीने वाढ झाल्याचे चित्र राहिले.

शेतकरी आंदोलनाच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून राज्यात आज सरकारी कार्यालयांना कुलपे ठोकण्याचे आंदोलन राबविण्यात आले. त्यामुळे बहुतांशी सरकारी कार्यालयांना पोलिस संरक्षण देण्यात आले होते.

मराठवाड्यात नांदेड परभणी, हिंगोली, बीड, लातूर जिल्ह्यातील आंदोलकांनी ग्रामपंचायत, पंचायत समिती कार्यालय आणि तहसील कार्यालयांना कुलपे ठोकली. काही ठिकाणी पोलिसांनी शेतकऱ्यांना ताब्यात घेतले आणि नंतर सोडून देण्यात आले. यावेळी सरकारविरोधी घोषणा देत निदर्शने केली. या आंदोलनाचा परिणाम म्हणून अनाळा (ता. लोहारा) येथे गेल्या पाच दशकांत प्रथमच आठवडे बाजार भरला नाही. औरंगाबाद शहरात मात्र मोंढ्यातील व्यवहार सुरळीत होते.

विदर्भात शेतकरी आंदोलनाची धार कायम राहिली. चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा या ठिकाणी शेतकऱ्यांनी रास्ता रोको, भाजीपाला फेको आंदोलन, कुलूप ठोकणे आंदोलन करून सरकारविरोधी नाराजी व्यक्त केली. गडचिरोलीत मात्र शिवसेनेने अचानक रास्ता रोको केल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. शिवसैनिकांनी गनिमी काव्याने केलेल्या आंदोलनामुळे पोलिसांना परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी सीआरपीएफ जवानांची मदत घ्यावी लागली. गडचिरोलीत कोरची तालुका वगळता कोठेही आंदोलन झाले नाही. नाशिकमध्ये संपाच्या सहाव्या दिवशी शहर आणि जिल्ह्यात कुलूप ठोको आंदोलनाने जोर पकडला. तरुण शेतकऱ्यांनी निफाड, नैताळे, अंबासन, वाईबोथी, नगरसूल, वाखारी आदी ठिकाणी तलाठी, तहसील आणि ग्रामपंचायत कार्यालयांना कुलपे ठोकली. येवला तालुक्‍यात कांदे रस्त्यावर टाकून सरकारविरोधी घोषणा देत अंत्ययात्रा काढली. यादरम्यान नवनाथ भालेराव (रा. पिंपळी फाटा, ता. येवला) या आंदोलक शेतकऱ्याने सोमवारी रात्री अकराच्या सुमारास कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. या घटनेने राज्यात खळबळ उडाली.

सोलापूर जिल्ह्यात मोहोळ, बार्शी तालुक्‍यात रास्ता रोको आंदोलन झाले, तर सरकारी कार्यालयांना पोलिसांनी संरक्षण दिले. बार्शी तालुक्‍यात नारी आणि भातंबरेतील आठवडे बाजार बंद राहिला. पुणे जिल्ह्यातही अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे संप सुरूच राहिले. अनेक बाजार समित्यांत शुकशुकाट होता. बारामती, घोडेगाव (ता.आंबेगाव) आदी ठिकाणी आंदोलन झाले. नगर जिल्ह्यात विविध सरकारी कार्यालयांना कार्यकर्त्यांनी कुलपे लावली. अनेक गावांचे आठवडे बाजार बंद राहिले. धुळे जिल्ह्यात साक्री येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसने आंदोलन केले. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बाहेर काढत तहसील कार्यालय व पंचायत समितीला कुलूप ठोकून शेतकऱ्यांनी आंदोलन केले.