कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात आज पाऊस!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 नोव्हेंबर 2017

पुणे - कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात गुरुवारी (ता. 23) तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान हवामान खात्याने व्यक्त केला आहे. अरबी समुद्रात मालदीव ते कर्नाटक किनारपट्टी या दरम्यान निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुन्हा पावसाळा आल्यासारखे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात बुधवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणच्या काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या, तर सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक या भागांत दमदार हजेरी लावली.

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव पुढील चोवीस तास कायम राहण्याची शक्‍यता असल्याने दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी पाऊस पडेल. उत्तर भारतात जम्मू आणि काश्‍मीर वेस्टर्न डिस्टर्बन्स उत्तरेकडे सरकत आहे. त्याच वेळी हवेची नवीन द्रोणिय स्थिती तयार होईल, असे बदल वातावरणात घडत असल्याचेही सांगण्यात आले. या दरम्यान, बंगालच्या उपसागरात अंदमान बेटाच्या परिसरात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. त्याच्या प्रभावामुळे पूर्व किनारपट्टीवर पावसाची शक्‍यता असल्याचे सांगितले. दक्षिण मध्य महाराष्ट्रात पुढील दोन अरबी समुद्रावरील कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव कायम राहील. त्यानंतर हवामान कोरडे राहील, असेही विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

पुण्यातही पावसाची शक्‍यता
शहर आणि परिसरात काही भागात गुरुवारी (ता. 22) पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बुधवारी सकाळपासून आकाश ढगाळ होतो. दुपारनंतर शहराच्या मध्य वस्तीसह उपनगरांमध्ये पावसाच्या सरींनी हजेरी लावली. लोहगाव येथे पावसाचा जोर सर्वाधिक असल्याने तेथे 14 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. ढगाळ वातावरणामुळे हवेतील थंडी पळाली आहे. शहरात 11.4 अंश सेल्सिअसपर्यंत कमी झालेला किमान तापमानाचा पारा 19.5 अंश सेल्सिअसपर्यंत वाढला आहे. त्यात सरासरीपेक्षा 6.1 अंश सेल्सिअसने वाढ झाल्याचे निरीक्षण हवामान खात्यातर्फे नोंदविण्यात आले.

Web Title: pune maharashtra news rain