पुणे - राज्यातील वाढलेला उन्हाचा चटका येत्या सोमवारपर्यंत (ता. 2) कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने आज वर्तविली. मराठवाड्यात पुढील चोवीस तासांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यातर्फे व्यक्त करण्यात आला आहे.
राज्याच्या कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात हवामान उष्ण व कोरडे राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद परभणी येथे 42.6 अंश सेल्सिअस इतकी झाली. पुण्यात 38.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.
राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. विदर्भ, मराठवाड्यात जवळपास सर्वच ठिकाणी तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या वर गेला आहे, तर उत्तर महाराष्ट्रातही उन्हाचा ताप वाढला आहे. तर, राज्याच्या सर्वच भागांत दिवस- रात्रीच्या तापमानात तफावत टिकून आहे. सोमवारपर्यंत राज्यातील उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे, तर मध्य महाराष्ट्रापासून कोमोरीन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने येत्या शनिवारी (ता. 31) मराठवाड्यात ढगाळ हवामान होऊन तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
|