धरणे भरली तरी गावे दुष्काळातच

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

पुणे विभागात 239 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा; सर्वाधिक 139 टॅंकर सांगलीत

पुणे विभागात 239 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा; सर्वाधिक 139 टॅंकर सांगलीत
पुणे - राज्यात पावसाच्या संततधारेमुळे धरणे ओसंडून वाहत असतानाच पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमधील दुष्काळसदृश गावांना अद्याप 239 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. सांगलीत सर्वाधिक 139 टॅंकर, पुण्यातील गावांमध्ये 49, तर साताऱ्यामधील गावांमध्ये 47 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

विभागीय आयुक्तालयाच्या माहितीनुसार, पुणे विभागातील कोल्हापूर वगळता सांगली, सातारा, सोलापूर आणि पुण्यात अजूनही टॅंकरची मागणी सुरू आहे. या चार जिल्ह्यांमधील 242 गावे आणि 1 हजार 534 वाड्यांमध्ये आजही 239 टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. राज्यभरात पावसाचा जोर कायम असला तरी सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यातील काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष आहे.

सांगलीमधील जत तालुक्‍यात 55, खानापूरमध्ये 15, तासगाव 28, कवठे महांकाळ 28, आटपाडी 10 तर मिरजमध्ये 3 असे एकूण 139 टॅंकर पुरविले जात आहेत. तर पुण्यातील पुरंदर तालुक्‍यात 26, बारामतीत 20, दौंड 2, शिरूर 1 आणि इंदापूरमध्ये 1 असे एकूण 49 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. त्या खालोखाल सातारा जिल्ह्यातील माणमध्ये 19, कोरेगाव 11, फलटण 10, खटावमध्ये 7 असे एकूण 47 पाणी टॅंकर जात आहेत. सोलापूर जिल्ह्यात माळशिरसमध्ये एक तर सांगोलामध्ये 3 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

टॅंकरने पाणीपुरवठा सुरू असलेल्या गावांची संख्या
सांगली जिल्हा - 131 गावे 889 वाड्या
पुणे - 34 गावे 347 वाड्या
सातारा - 73 गावे 283 वाड्या
सोलापूर - 4 गावे 15 वाड्या