बहाद्दर शेतकऱ्यांचा होणार गौरव 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

प्रस्ताव पाठविण्याचा पत्ता : 
ऍग्रोवन स्मार्ट ऍवॉर्डस, 
ऍग्रोवन, द्वारा सकाळ पेपर्स प्रा. लि., 595, बुधवार पेठ, पुणे - 411002 
ई - मेल : agrowon@esakal.com 

पुणे - प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश मिळवणाऱ्या कर्तृत्ववान शेतकऱ्यांना ऍग्रोवनतर्फे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही स्मार्ट शेतकरी पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. राज्यस्तरीय सहा व विभागीय पाच अशा एकूण 11 गटांमध्ये हे पुरस्कार दिले जाणार आहेत. पुरस्कारांसाठी प्रस्ताव पाठविण्याची अंतिम तारीख 25 ऑक्‍टोबर 2017 आहे. 

प्रतिकूल परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांनी कल्पकता, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर आपला वेगळा ठसा उमटवला आहे. आव्हानांवर मात करण्यासाठी धडपडणाऱ्या या शेतकऱ्यांच्या कर्तृत्वाची दखल घेतली जावी आणि इतर शेतकऱ्यांना त्यांच्यापासून प्रेरणा मिळावी, या हेतूने गेल्या वर्षीपासून हे पुरस्कार सुरू करण्यात आले आहेत. 

यंदा राज्य पातळीवरील महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी या पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे असेल. तसेच ऍग्रोवन प्रेरणा पुरस्कार आणि ऍग्रोवन स्मार्ट महिला शेतकरी या पुरस्कार विजेत्यांना प्रत्येकी 25 हजार रुपये देण्यात येणार आहेत. ऍग्रोवन प्रेरणा पुरस्कार हा आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला आपल्या धडपडीतून पुन्हा उभं करणाऱ्या कर्तृत्ववान महिला शेतकऱ्यासाठी आहे. तसेच ऍग्रोवन स्मार्ट सेंद्रिय शेती पुरस्कार, ऍग्रोवन स्मार्ट कृषिपूरक व्यवसाय, ऍग्रोवन स्मार्ट कृषी उद्योजक आणि विभागीय पातळीवरील स्मार्ट शेतकरी पुरस्कार (मराठवाडा, विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र व कोकण) विजेत्यांना प्रत्येकी 10 हजार रुपये दिले जाणार आहेत. 

तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश असलेली त्रयस्थ निवड समिती पुरस्कारांसाठी प्राप्त प्रस्तावांची छाननी करून अंतिम विजेत्यांची निवड करणार आहे. हा निर्णय अंतिम आणि सर्वांसाठी बंधनकारक असेल. पुणे येथे विशेष समारंभात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण केले जाईल. 

प्रस्ताव पाठविण्यासंबंधी माहिती... 
- राज्यातील कोणीही व्यक्ती स्वतःचा किंवा परिचितांचा प्रस्ताव पाठवू शकते. 
- प्रस्ताव पाठविण्याची अंतिम मुदत 25 ऑक्‍टोबर, 2017 आहे. 
- प्रस्ताव फक्त दोन पानी असावा. त्यात संबंधिताचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, छायाचित्र, कार्याची माहिती, वेगळेपण व इतर तपशील नमूद करावेत. याआधी मिळालेल्या पुरस्कारांचीही माहिती द्यावी. 
- प्रस्तावावर तो कोणत्या गटातील पुरस्कारासाठी आहे, याचा स्पष्ट उल्लेख करावा. 
- अतिरिक्त माहिती, अन्य तपशील, छायाचित्रे प्रस्तावासोबत जोडता येईल 
- एका व्यक्तीला एकाच पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविता येईल. अधिकचे प्रस्ताव बाद करण्यात येतील.