विदर्भातील धरणांत 50 टक्के पाणीसाठा ! 

विदर्भातील धरणांत 50 टक्के पाणीसाठा ! 

पुणे - परतीच्या मॉन्सूननंतर देखील राज्यातील विदर्भातील धरणांत केवळ पन्नास टक्के पाणीसाठा आहे. काही धरणे वगळता अन्य कोरडीच आहेत. पुणे विभागातील धरणांनी पाण्याची सरासरी ओलांडली असून, कोकण आणि नाशिकमध्ये समाधानकारक स्थिती आहे. मराठवाड्यामध्ये गेल्या वर्षीपेक्षा धरणांतील पाणीसाठा कमी असला, तरी विदर्भाच्या तुलनेत स्थिती चांगली असल्याने पाणीटंचाई टळली आहे. 

राज्याच्या जलसिंचन विभागाच्या माहितीनुसार, राज्यात सर्वांत कमी पाणीसाठा अमरावती विभागातील धरणांमध्ये सुमारे 39 टक्केच झाला आहे. गेल्यावर्षी हे प्रमाण सुमारे 78 टक्के होते. सर्वांत जास्त पाणीसाठा दरवर्षीप्रमाणे कोकणात आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच सुमारे 95 टक्के पाणीसाठा झाला आहे. राज्यातील अन्य विभागांच्या तुलनेत पुणे विभागात पावसाने सरासरी ओलांडली. गेल्यावर्षी आतापर्यंत 89.18 टक्के पाणीसाठा होता. या वर्षी तो 89.81 टक्के झाला आहे. नाशिकमध्ये 82.51 टक्के, मराठवाड्यात 66.85 टक्के पाणीसाठा आहे. 

नाशिकची धरणे काठोकाठ 
नाशिकमध्ये संततधारेमुळे धरणे काठोकाठ भरली आहेत. 15 धरणांपैकी गिरणा हे धरण 67 टक्के, चणकापूर हे 84 टक्के आणि मुकणे हे 89 टक्के भरले आहे. अन्य 12 धरणे शंभर टक्के भरली आहेत. कोकणातील कवडास, धामणी, तिल्लारी, भातसा, उर्ध्व घाटघर ही सर्वच धरणे तुडुंब भरली आहेत. ठाण्यातील निम्न चोंडे हे धरण अवघे 56 टक्‍क्‍यांपर्यंत पोचले आहे. अन्य सर्व ठिकाणी परिस्थिती चांगली आहे. 

नागपूरमध्ये दिलासादायक स्थिती 
नागपूरमध्ये अमरावतीच्या तुलनेत परिस्थिती दिलासादायक असली, तरी पाणीसाठा हा 50 टक्केच आहे. नांद आणि वडगाव ही धरणे शंभर टक्के भरली असून, अन्य धरणांतील पाणीसाठा जेमतेम झाला आहे. भंडाऱ्यातील गोसीखुर्द, गडचिरोलीतील दिना, गोंदियातील सिरपूर ही धरणे 30 टक्‍क्‍यांपेक्षा कमी पाणीसाठा असलेली आहेत. अन्य धरणांची पाणीपातळी सुमारे 40 ते 50 टक्के झाली आहे. बोर धरण हे 63 टक्‍क्‍यांवर पोचले आहे. 

नागपूर विभागातील धरणांमध्ये 46.27 टक्के पाणी आहे. गेल्यावर्षी आतापर्यंत सुमारे 62 टक्के पाणीसाठा होता. अमरावती विभागातील उर्ध्व वर्धा हे एकच धरण शंभर टक्के भरले आहे; तसेच वाण धरणाची पातळी सुमारे 89 टक्के आहे. ही धरणे वगळता अन्य सर्व धरणे कोरडीच आहेत. बुलडाणा येथील खडकपूर्णा हे धरण अवघे 11 टक्के भरले आहे. अकोल्यातील काटेपूर्णा 20 टक्के, यवतमाळमधील इसापूर हे 13 टक्के, बेंबळा 30 टक्के, अरुणावती 24 टक्के भरले आहे. 

कोयना धरणात 99 टक्‍के साठा 
पुणे जिल्ह्यातील घोड, चासकमान, डिंभे, निरा देवघर, पवना, पानशेत, भाटघर, भामा आसखेड, वडज आणि वरसगाव ही दहा धरणे पूर्ण भरली आहेत. अन्य धरणांचीही स्थिती समाधानकारक आहे. सांगलीतील वारणा धरण हे शंभर टक्के भरले आहे. साताऱ्यातील कोयना धरणात सुमारे 99 टक्के पाणीसाठा आहे. तसेच, साताऱ्यातील धोम बलकवडी, वीर ही धरणे शंभर टक्के भरली असून, अन्य सर्व धरणे ही 90 टक्‍क्‍यांहून अधिक प्रमाणात भरली आहेत. तर कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी, तुळशी आणि दूधगंगा या तिन्ही धरणांमध्ये शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे. तिल्लारी धामणे हे धरण 92 टक्के भरले आहे. नगरमधील निळवंडे, भंडारदरा आणि मुळा ही धरणे शंभर टक्के भरली असल्याने या भागातील पाणीप्रश्न सुटला आहे. 

पाणीसाठा निम्न, पण मराठवाडा सुखावला ! 
सोलापूर जिल्ह्याच्यादृष्टीने महत्त्वाचे असलेल्या उजनी धरणात शंभर टक्के साठा झाला आहे. मराठवाडा विभागातील उस्मानाबाद जिल्ह्यातील निम्न तेरणा, सिना कोळेगाव, औरंगाबादमधील पैठण, बीडमधील मांजरा ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. नांदेडमधील निम्न मनार धरणात 22 टक्केच साठा झाला आहे. हिंगोलीतील येलदरी धरण हे 12 टक्के भरले आहे. अन्य धरण परिसरांत समाधानकारक परिस्थिती आहे, त्यामुळे या परिसरातील शेतकरी सुखावला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com