हायपरलूपसाठी राज्य सरकारचा "इरादा' 

हायपरलूपसाठी राज्य सरकारचा "इरादा' 

पुणे - पुणे ते मुंबई या मार्गावरील हायपरलूपच्या पूर्व व्यवहार्यता अहवालाच्या (प्री-फिझिबिलिटी रिपोर्ट) यशस्वितेनंतर राज्य सरकारने हा प्रकल्प यशस्वी करण्याच्या दृष्टीने "व्हर्जिन हायपरलूप वन' कंपनीसोबत इरादा करार केला आहे. त्यामुळे लवकरच पुणे-मुंबई हा प्रवास अवघ्या तीस मिनिटांमध्ये पूर्ण करता येणार आहे. 

सध्या पुणे-मुंबई या मार्गावरून तीन लाख प्रवासी रोज प्रवास करतात. हा मार्ग हायपरलूपसाठी जगातील सर्वांत चांगला असल्याचे पूर्व-व्यवहार्यता अहवालात नमूद करण्यात आले आहे. या दोन्ही शहरांमधील संभाव्य विकास लक्षात घेऊन हा हायपरलूप मार्ग यशस्वी ठरेल, असा विश्‍वासही कंपनीने व्यक्त केला. त्यामुळे राज्य सरकारने या प्रकल्पात आणखी एक पाऊल पुढे टाकत "व्हर्जिन हायपरलूप वन' या कंपनीबरोबर इरादा करार केला. 

पुढे काय होणार? 
पुणे ते नवी मुंबईपर्यंत हा हायपरलूप मार्ग असेल. नवी मुंबईपर्यंत नेमक्‍या कोणत्या मार्गाने हायपरलूप करायचे, त्याचा खर्च, त्याचा आराखडा, तांत्रिक बाबी, अर्थसाहाय्य, भौगोलिक रचना आदींचा अभ्यास करण्यासाठी आता कंपनीतर्फे व्यवहार्यता अहवाल तयार करण्यात येणार आहे. येत्या ऑगस्टच्या दरम्यान कंपनी हा अहवाल सादर करणार आहे. 

प्रवास 
पुणे-मुंबईदरम्यान सुरू होणाऱ्या या हायपरलूपचा फायदा प्रवासाबरोबरच माल वाहतुकीलाही होणार आहे. यामुळे महाराष्ट्रातील प्रवासी वाहतुकीचे नवे पर्व सुरू होईल. याचा अंदाजे खर्च तीन लाख 50 हजार कोटी रुपये आहे. हायपरलूपमुळे पुढील तीस वर्षांमध्ये जवळपास साडेपाच हजार कोटी रुपयांची बचत होणार असल्याचा दावा व्हर्जिन ग्रुपचे अध्यक्ष रिचर्ड ब्रेन्सन यांनी केला. पुणे-मुंबईदरम्यानची प्रवासीसंख्या लक्षात घेता एका वर्षात हायपरलूपच्या माध्यमातून सुमारे दीड कोटी प्रवाशांची वाहतूक करता येईल, असेही त्यांनी सांगितले आहे. 

हायपरलूपसाठी जगातील हा सर्वांत चांगला मार्ग असल्याचा निष्कर्ष पूर्व व्यवहार्यता अहवालातून निघाला आहे. त्यामुळे पुढील टप्प्यात याचा व्यवहार्यता अहवाल तयार होणार आहे. "पब्लिक, प्रायव्हेट पार्टनरशिप'च्या (पीपीपी) माध्यमातून हा हायपरलूप विकसित करण्यात येणार आहे. 
- किरण गित्ते, आयुक्त, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com