राज्यात पावसाचा जोर ओसरला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

पुणे - राज्यात गेल्या दोन दिवसांपासून सर्वदूर सुरू असलेल्या पावसाने विश्रांती घेतली आहे. मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश ठिकाणी पावसाने उसंत घेतली असून, कोकणात मात्र त्याचा जोर कायम आहे.

पुणे - राज्यात गेल्या दोन दिवसांपासून सर्वदूर सुरू असलेल्या पावसाने विश्रांती घेतली आहे. मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश ठिकाणी पावसाने उसंत घेतली असून, कोकणात मात्र त्याचा जोर कायम आहे.

राज्यातील बहुतांश भागात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. कोकणात काही ठिकाणी बुधवारी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी ढगाळ, तर अनेक ठिकाणी ऊन पडल्याचे चित्र होते. मुंबईसह राज्यभरात सध्या पावसाचा जोर ओसरला आहे. काही भागात हवेचा दाब वाढल्याने पावसाचा जोर ओसरला असल्याचे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले.

हलक्‍या सरींचा अंदाज
राज्यात येत्या रविवारपर्यंत (ता. 3) हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. कोकण, गोव्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी हलक्‍या सरी पडतील. कोकणात गुरुवारी (ता. 31) तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा इशाराही हवामान खात्याने दिला आहे.

शहरात संध्याकाळी पावसाच्या सरी
शहरात शतकोत्तर रौप्य महोत्सवी गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. पुढील दोन दिवस पावसाचा जोर कमी होण्याची शक्‍यता असल्याने गणेशभक्त देखावे पाहण्यासाठी रस्त्यांवर गर्दी करतील, असा विश्‍वासही व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, शहरात दिवसभर ढगाळ वातावरण होते. दुपारी काही वेळ सूर्यदर्शन झाले; पण संध्याकाळी पुन्हा शहराच्या काही भागात पावसाच्या सरींनी हजेरी लावली. पुढील दोन दिवसांमध्येही पावसाच्या तुरळक सरी पडतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.