राज्यात पावसाचा जोर ओसरणार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

पुणे  - नैर्ऋत्य मोसमी पावसासाठी (मॉन्सून) पोषक स्थिती नसल्याने येत्या पुढील दोन आठवडे म्हणजे 10 ऑगस्टपर्यंत राज्यात जोरदार पावसाची शक्‍यता नसल्याचा अंदाज हवामान खात्याने गुरुवारी वर्तविला. कोकणातील काही भाग वगळता राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाने दडी मारल्याचे चित्र आज दिसले. 

पुणे  - नैर्ऋत्य मोसमी पावसासाठी (मॉन्सून) पोषक स्थिती नसल्याने येत्या पुढील दोन आठवडे म्हणजे 10 ऑगस्टपर्यंत राज्यात जोरदार पावसाची शक्‍यता नसल्याचा अंदाज हवामान खात्याने गुरुवारी वर्तविला. कोकणातील काही भाग वगळता राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाने दडी मारल्याचे चित्र आज दिसले. 

हवामान खात्याने जाहीर केलेल्या पुढील दोन आठवड्यांचा अंदाज आज जारी केला. सध्या असलेल्या कमी दाबाच्या प्रभावामुळे ईशान्य मध्य प्रदेश आणि परिसरात उद्या दिवसभरात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसेच कमी दाबाचे क्षेत्र राजस्थानमध्येही असल्याने तेथे जोरदार पाऊस पडेल. सध्या उत्तर भारतात कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे उत्तर भारतातील पश्‍चिम हिमालयाच्या रांगांमध्ये, पश्‍चिम बंगालचा काही भाग, सिक्कीमसह ईशान्य भारतात येत्या बुधवारपर्यंत (ता. 2) चांगला पाऊस पडेल. या दरम्यान महाराष्ट्रासह देशाच्या इतर भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद होईल. देशात 3 ते 10 ऑगस्ट या दुसऱ्या आठवड्यात ईशान्य भारत आणि दक्षिणेतील राज्य वगळता इतर ठिकाणी पावसाची शक्‍यता नाही. 

मध्य प्रदेश आणि राजस्थान या कमी दाबाच्या क्षेत्रात तसेच, कमी दाबाचा पट्टा असलेल्या जैसलमेरपासून ते बंगालच्या उपसागरापर्यंत या भागात पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकण या हवामान उपविभागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, अशी माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. 

घाटमाथ्यावर पावसाच्या हलक्‍या सरी 
घाटमाथ्यावर पावसाच्या सरी गुरुवारी पडल्या. मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर, नाशिक, सातारा जिल्ह्याच्या काही भागांत हलक्‍या सरींनी हजेरी लावली. सध्या कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांत हवेचा दाब जास्त असल्याने पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. हीच परिस्थिती येत्या काही दिवस राहणार आहे. त्यामुळे काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे.