अब तेरी प्रायव्हसी का क्‍या होगा! 

अब तेरी प्रायव्हसी का क्‍या होगा! 

पुणे - गतवर्षात "प्रायव्हसी' या मुद्यावरून जगभरात प्रचंड धुमाकूळ झाल्यानंतर आता "2018 मध्ये काय होणार', हा प्रश्‍न कळीचा बनला आहे. "सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तंत्रज्ञान तुमच्याभोवती विळखा घालेल', हे काही वर्षांपूर्वीचे भाकीत आता आपण अनुभवत आहोत. इतकेच नव्हे, तर "स्मार्ट सिटी', "स्मार्ट बिल्डिंग', "स्मार्ट ट्रान्सपोर्ट' या दिशेला जाताना "त्यात आपल्या प्रायव्हसीचे काय', हा प्रश्‍न बऱ्याच प्रमाणात अनुत्तरित आहे. 

मोठ्या प्रमाणावर वापर होणाऱ्या किंवा "मास'साठी असलेल्या कुठल्याही "इनोव्हेशन'साठी कुठल्या ना कुठल्या प्रकारचा डेटा आवश्‍यक असतो. कदाचित ही माहिती थेट तुमच्याकडून गोळा केली असेल किंवा इतर मार्गाने मिळविलेली असू शकते. 

भविष्यात तुमच्या "डेटा'चा वापर कसा होऊ शकतो - 

एखादा सामान्य माणूस : 
"इंटरनेट ऑफ थिंग्ज'चा अविभाज्य भाग असलेला स्मार्टफोन प्रत्येकाकडेच आहे. "स्मार्ट सिटी'कडे वाटचाल करताना ही विविध यंत्रे जगण्याचाच भाग होतील. "ऍमेझॉन'च्या "इको स्पॉट'चे उदाहरण पाहिले, तर घरातल्या आणि बाहेरच्याही "डिव्हाईस'ला एकत्र जोडणे शक्‍य झाले आहे. बहुतांश प्रकरणात अशी यंत्रणा "व्हॉईस ऑपरेटेड' असते आणि त्यात कॅमेरा असतोच. या जोडणीतील एखादे यंत्रही "हॅक' झाले, तर आपली सर्व वैयक्तिक माहिती, सवयी क्षणार्धात इतरांच्या हाती लागू शकतात. 

एखादा कर्मचारी : 
आपल्या जीवनशैलीचा भाग बनत असलेले "वेअरेबल्स' आता फारसे नवीन नाहीत. आरोग्याशी संबंधित काही क्षेत्रांमध्ये आताही "वेअरेबल्स'चा वापर वाढत आहे. कामाचे मूल्यांकन असो वा सुरक्षाविषयक काही उद्देशांसाठी असो; काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामाच्या परिसरात "वेअरेबल्स' वापरणे बंधनकारक केले आहे. यामध्ये त्या कर्मचाऱ्याची प्रत्येक हालचाल, आरोग्यस्थिती आणि प्रसंगी वैयक्तिक गोष्टीही कंपनीला कळतात. आपल्याकडे अद्याप हा "ट्रेंड' फारसा आलेला नाही. तथापि, यासंदर्भात योग्य त्या प्रकारे नियंत्रण आणण्याचीही तयारी प्रशासकीय यंत्रणेला नजीकच्या भविष्यात करावी लागणार, याबाबत शंका नाही. 

अशी मिळवतात माहिती 
"प्रायव्हसी'ची सर्वांत मोठी समस्या म्हणजे "आपली माहिती नेमकी जमा कशी केली जाते', हा आहे. आपल्यापैकी प्रत्येक जण एक "डेटा सेट' आहे. वय, लिंग वगैरे माहिती फारशी अगत्याची राहिलेली नाही. एखाद्यानं कुठल्या दुकानातून काय खरेदी केली, त्याची झोपण्याची वेळ काय, सकाळी उठण्याची वेळ काय, या दरम्यान ती व्यक्ती काय काय करते, ही सगळी माहिती जसजशी जमा होते, तसे त्या व्यक्तीचे "प्रोफाईल' तयार होते. या "प्रोफाईल'चा वापर विविध कारणांसाठी केला जाऊ शकतो. जाहिरात क्षेत्रातील व्यक्तींना या "डेटा'ची महती आधीपासूनच ठाऊक होती; आता प्रशासनालाही त्याची जाणीव झाली आहे. त्यामुळे नजीकच्या भविष्यात अशा प्रकारचे "प्रोफाईल्स' तयार केली जातील. 

पुढचं युद्ध... "डेटा'च्या नियंत्रणासाठी! 
"एखादं युद्ध किंवा मोहीम छेडण्यासाठी इंटरनेट हेच व्यासपीठ असेल', असे जगभरातील सायबर सुरक्षा तज्ज्ञ अनेक वर्षांपासून सांगताहेत. ही सायबर युद्धे फार खर्चिक नसतात आणि त्याचा आरोप सहज दुसऱ्यावर ढकलता येऊ शकतो. 2016 मध्ये जगभरात अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रशियाच्या कथित हस्तक्षेपाचा मुद्दा गाजला. गेल्या वर्षी याहीपुढे जाऊन रॅनसमवेअर ऍटॅकपासून बिटकॉईन्सपर्यंत "डेटा सिक्‍युरिटी'समोर असलेले अनेक धोके अनुभवले. गेल्या डिसेंबरमध्ये अमेरिकी सुरक्षा तज्ज्ञांच्या अहवालानुसार, "एखाद्या राष्ट्राचा पाठिंबा असलेले हॅकर्स प्रतिस्पर्धी देशाच्या कुठल्याही "डेटा'ला किंवा यंत्रणेला हॅक करून त्या देशाला जेरीस आणू शकतात.' हे सगळे शक्‍य आहे आणि हेच (थोडे!) भीतीदायकही आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com