या मंत्र्यांची हकालपट्टी करा- विखे पाटील

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 एप्रिल 2017

स्वाभिमानी संघटना ही स्वाभिमानी राहिली नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. त्याच्यावर काही बोलत नाहीत, शेतकऱ्यांच्या जिवावर राजकारण करून मंत्रिपद घेतले, पण शेतकरी यांना माफ करणार नाही.

- राधाकृष्ण विखे पाटील

सांगली : "लाखो क्विंटल तूर पडून आहे. हे राज्य सरकार आणि कृषी मंडळाचे अपयश आहे. हे अपयश स्वीकारून या मंत्र्यांची हकालपट्टी केली पाहिजे," असे प्रतिपादन विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.    

संघर्षयात्रेदरम्यान विखे पाटील यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, "शिवसेनेमध्ये जरा तरी काही उरले असेल तर त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सत्तेतून बाहेर पडायला पाहिजे. स्वाभिमानी संघटना ही स्वाभिमानी राहिली नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. त्याच्यावर काही बोलत नाहीत, शेतकऱ्यांच्या जिवावर राजकारण करून मंत्रिपद घेतले, पण शेतकरी यांना माफ करणार नाही."

"उद्धव ठाकरे यांची 'चला, हवा येऊ द्या' अशी परिस्थिती झाली आहे. राजीनामे कुठे गेले काही माहीत नाही. कपड्यांबरोबर गेले असतील, अशी नौटंकी त्यांची चालू आहे," असा टोला उद्धव यांना विखे पाटील यांनी लगावला. 'प्रत्येक गोष्टीमध्ये वेळकाढूपणा ही या सरकारची नीती आहे,' अशी टीका विखे पाटील यांनी केली. 

आर.आर. आबांची आठवण

विखे-पाटील, अजित पवार यांनी पत्रकार परिषदेवेळी आर. आर. पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. संघर्ष यात्रेवेळी त्यांची उणीव आम्हाला वारंवार भासत आहे. विरोधात असताना सरकारला सळो की पळो करून सोडणारे आबा आज असते, तर राज्यातील सरकारची त्यांनी कोंडी केली असती, असे मत त्यांनी मांडले.