एकच धडपड... दुर्घटनेतील कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याची! 

Raigad Bus Accident Death Persons Name
Raigad Bus Accident Death Persons Name

महाबळेश्वर : आंबेनळी घाटात आज दिवसभर धडपड सुरू होती ती बसमधील प्रवाशांना सुरक्षित बाहेर आणण्यासाठीच. प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीशी सामना करत प्रत्येक जण आपल्या परीने मदतकार्यात हातभार लावत होता. अंधार पडेपर्यंत ही शोधमोहीम सुरूच होती. 

येथून सुमारे 26 किलोमीटर अंतरावर येथील पोलादपूरला जाणाऱ्या घाटात आज सकाळी झालेल्या अपघातामध्ये मिनी बसमधील 32 प्रवाशी ठार झाले. अपघाताची माहिती येथे समजताच येथील पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांच्यासह सह्याद्री ट्रेकर्सचे जवान, महाबळेश्वर ट्रेकर्सचे जवान त्वरित घटनास्थळी दाखल झाले. तहसीलदार रमेश शेंडगेही घटनास्थळी पोचले. 

प्रतापगडच्या पायथ्याला असलेले वाडा कुंभरोशीचे ग्रामस्थही घटनास्थळी पोचले होते. अधून- मधून सुरू असलेल्या पावसामुळे व दाट धुक्‍यामुळे अनेक वेळा मदतकार्यात अडथळा आला. पोलादपूर व महाबळेश्वरहून घाटातील रस्त्यांमध्ये मोठी रांग लागलेली होती, तसेच बघ्य्यांची गर्दीही वाढल्याने मदतकार्यात अडथळे येत होते. काही प्रमाणात पोलिस निरीक्षकांनी गर्दी कमी करण्यासाठी बघ्य्यांना हटवले. नंतर महाबळेश्वर व पोलादपूर येथेच वाहने अडविण्यात येत होती. कड्याच्या खालील दाभिल गावातूनही ग्रामस्थ मदतीसाठी प्रयत्न करत होते; परंतु खालून घटनास्थळी त्यांना जाता आले नाही. खासगी बस सुमारे 600 ते 650 फूट खोल दरीत पडल्याने मोठ्या प्रमाणात मदतीसाठी कार्यकर्त्यांची गरज भासत होती; तरीही पहिल्या टप्प्यातील सहा ते सात मृतदेह कड्याच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात असल्याने ते काढण्यात यश आले; परंतु खाली असलेले मृतदेह काढताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.

महाबळेश्वर, तापोळा, केळघर, महाड, पोलादपूर, खेड, दापोली, तसेच बेल एअर, महाबळेश्वर पालिकेसह विविध संस्थांच्या रुग्णवाहिला घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. महाबळेश्वर पालिकेचा अग्निशामक बंबही मदतकार्यासाठी दाखल झाला होता. अत्यंत उतार व कडा असल्याने दोर लावून धोकादायक स्थितीत मृतदेह ओढण्यात येत होते. या परिसरात मोबाईल रेंज नसल्याने संपर्कात अडचणी निर्माण होत होत्या. अपघाताली माहिती सर्वत्र समजल्याने अनेकांचे नातेवाइक पोलादपूर येथे दाखल झाले होते. त्यांना तेथेच थांबविण्यात येत होते. त्यामुळे पोलादपूर येथील ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी झाली होती. एनडीआरएफची टीम पुण्याहून सहा वाजून 40 मिनिटांनी येथे दाखल झाली. तोपर्यंत 13 ते 14 मृतदेह बाहेर काढण्यात यश आले होते. रात्री उशिरापर्यंत मदतकार्य सुरूच होते. शेवटच्या टप्प्यात सुमारे 600 फूट खोल दरीत वाहनांच्या टपाखाली मृतदेह अडकल्याने या मदत कार्यासाठी मोठ्या फौजफाट्याची व गिर्यारोहकांची गरज आहे. 

सहपालकमंत्र्यांसह आमदारांची धावपळ 
जिल्ह्याचे सहपालकमंत्री सदाभाऊ खोत, आमदार भरत गोगावले, आमदार संजय कदम, आमदार मकरंद पाटील, उपाध्यक्ष सिद्धेश शेठसह महाबळेश्वर, पोलादपूर, महाड, खेड येथील राजकीय व शासकीय अधिकारी येथे मदतकार्यासाठी व पाहणीत व्यस्त दिसत होते.

पाऊस अन्‌ धुक्‍याचा मदतकार्यात अडथळा
सातारा  : अपघातग्रस्त स्थळावर सुमारे 500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढण्याचे काम जिकिरीचे ठरत होते. झाडे, तसेच दगडांवर साठलेले शेवाळे, वरून पावसाची मारा, बोचरा वारा आणि धुकं हेच मदतकार्यात सहभागी झालेल्या टीमपुढील सर्वात मोठे संकट होते, तरीही मदतकार्यात सहभागी जवान दरीमध्ये पाय रोवून कार्यरत होते. दुर्घटनाग्रस्त बसमधील अखेरचा मृतदेह दरीतून बाहेर काढेपर्यंत हटणार नाही, अशा निर्धाराने ते काम करत होते.

आमच्या प्रतिनिधीने घटनास्थळी दिसलेले दृष्य आणि सांगितलेला अनुभव अंगावर शहारे आणणारा होता. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर महाबळेश्‍वर ट्रेकर्स, सह्याद्री ट्रेकर्सचे कार्यकर्ते अपघातस्थळी पोचले. त्याशिवाय रायगड जिल्ह्यातून काही ट्रेकर्स, स्थानिक संस्था- संघटनांचे कार्यकर्तेही मदतीसाठी धावले. अपघाताची घटना सोशल मीडियावरून व्हायरल झाली. अपघाताची तीव्रता लक्षात घेऊन पोलादपूर, तसेच महाबळेश्‍वर येथून मदतीचा ओघ सुरू झाला. तथापि, निसर्गाच्या मनात काही औरच होते. सायंकाळी "एनडीआरएफ'ची तुकडी ट्रेकर्सच्या मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाली. मात्र, पावसामुळे मदतकार्यात व्यत्यय येत होता. अपघात घडून दहा तासांहून अधिक काळ लोटला, तरी 32 पैकी 15 मृतदेह दरीतून काढण्यात यश आले होते.
गेल्या महिनाभरापासूनच्या सततच्या पावसामुळे दगड, तसेच झाडांवर शेवाळे तयार झाले होते. निसरड्या वाटांवर पाय घसरत होते. आकाशातून पावसाचा मारा दिवसभर सुरूच होता. अधूनमधून उघडीप मिळत असली तरी गारठवणारा वारा वाहत होता. घाटातील रस्त्यावर फारसे धुकं नसले तरी दरीमध्ये दाट धुके असल्याचे मदतकार्यात सहभागी कार्यकर्ते सांगत होते.

आठ तासांपेक्षा अधिक काळ ट्रेकर्सचे जवान बचाव कार्यात काम करत होते. त्यांच्याकरिता काही सामाजिक संस्था व संघटनांनी फूड पॅकेट व पाण्याच्या बाटल्यांची व्यवस्था केली होती. दरीतील अपघातग्रस्त बसमधील अखेरचा मृतदेह बाहेर काढेपर्यंत येथून हटणार नाही, असा मदतकार्यात सहभागी झालेल्या प्रत्येक जवानाचा निर्धार होता. हा निर्धार त्यांच्या कामातून प्रतीत होत होता.

बसच्या टपाखाली काही मृतदेह
घाटातील दरीमध्ये एके ठिकाणी बसचा टप तुटून पडला होता. त्याच्याखाली काही मृतदेह आडकून पडले असल्याची शक्‍यता आहे. मात्र, दरीत पडलेला हा टप काढणे अवघड होते. त्यासाठी क्रेनची मदत घेण्यात येत होती. मात्र, सायंकाळी लवकर अंधार पडल्याने प्रकाश योजनेची काही व्यवस्था करणे गरजेचे होते. यंत्रणा सर्वोतोपरी प्रयत्न करत होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com