निवडणूक लढविल्यास माझी अनामत जप्त होईल - अण्णा हजारे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 जुलै 2017

राळेगणसिद्धी - 'केंद्रीय मंत्र्यालाही एकट्याने मागणी करून एखादा कायदा करणे शक्‍य नसते. मात्र, कोणत्याही पदावर नसताना मी सामान्य जनतेच्या पाठबळावर आतापर्यंत सरकारला आठ कायदे करायला भाग पाडले. त्यामुळे जनतेच्या कामांसाठी राजकारणातच असले पाहिजे हा समज चुकीचा आहे. मात्र, मी राजकारणात आलो आणि निवडणूक लढवली, तर माझी अनामत रक्कम जप्त होईल,'' असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज (ता. 10) व्यक्त केले.
महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, जम्मू-काश्‍मीर व नेपाळमध्ये विविध ठिकाणी कार्यरत असलेले लष्करी अधिकारी व जवानांनी सहकुटुंब येथे येऊन हजारे यांची सदिच्छा भेट घेतली. त्या वेळी ते बोलत होते. कर्नल स्मिता मिश्रा, बागपतचे राजन ढाका, कॅप्टन सी. डी. थॉमस, प्रभाकर थेऊर, मेजर गिरी प्रसाद, पुणे सैनिक बोर्डाचे अध्यक्ष बी. जी. पाचारणे आदी उपस्थित होते.

हजारे म्हणाले, 'देशात चांगल्या कामांसाठी राजकारणापेक्षा जनसंघटन महत्त्वाचे आहे. तेच मी करत आहे. त्यामुळे मला जनतेचे विविध प्रश्न सोडविण्यात यश आले आहे. आपल्या देशातील मतदार अद्याप जागृत झाले नाहीत. काही मतदार राजकीय पक्षांच्या भूलथापा व आमिषांना बळी पडतात. आपल्या निवडणुका पक्ष व चिन्हांच्या आधारे होतात. त्यामुळे बहुमतात येणाऱ्या पक्षाचीच चलती राहते. इतरांना फारशी किंमत दिली जात नाही. पक्ष व चिन्हविरहित निवडणुका होतील त्याच वेळी देशात खरी लोकशाही अस्तित्वात येईल.''

'केजरीवाल यांना पंतप्रधान होण्याचे स्वप्न पडू लागले आहेत. ते स्वप्न माझ्याबरोबर राहून त्यांना पूर्ण करायचे होते; मात्र आता ते शक्‍य नाही. त्यांच्या कारभारातील भ्रष्टाचाराच्या फायलींचा ढीग माझ्याकडे आला आहे,'' असेही हजारे यांनी या वेळी सांगितले.