राम गणेश गडकरींचा पुतळा फोडलाः काय घडले दिवसभरात?

Ram Ganesh Gadkari statue vandalized in Pune by Sambhaji Brigade
Ram Ganesh Gadkari statue vandalized in Pune by Sambhaji Brigade

पुण्यातील छत्रपती संभाजी उद्यानातील ज्येष्ठ नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा मंगळवारी फोडण्यात आला. याप्रकरणी डेक्‍कन पोलिसांनी चौघांना सायंकाळी अटक केली. त्यांना सिम्बायोसिस महाविद्यालयाजवळ हनुमान टेकडी परिसरातून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्‍त सुधीर हिरेमठ यांनी दिली. 

या संदर्भात महापालिकेचे उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे यांनी तक्रार दिली. सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण आणि चोरी केल्याप्रकरणी डेक्‍कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुतळ्याचा अद्याप शोध लागलेला नाही. 

प्रदीप भानुदास कणसे (वय 25, रा. नऱ्हे आंबेगाव), हर्षवर्धन महादेव मगदूम (वय 23, रा. बालाजीनगर), स्वप्नील सूर्यकांत काळे (वय 24, रा. वडमुखवाडी, चऱ्होली, आळंदी) आणि गणेश देविदास कारले (वय 26, रा. चांदूस रौंदळ वस्ती, ता. खेड) अशी संशयितांची नावे आहेत. त्यापैकी दोघेजण संभाजी ब्रिगेडचे आणि अन्य दोघे स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते असल्याचा दावा करण्यात येत आहे. कणसे याचा पंप विक्रीचा आणि कारले याचा ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. मगदूम आणि काळे हे दोघे खासगी कंपनीत नोकरीस आहेत. 

घटनाक्रम

  • प्रदीप कणसे, हर्षवर्धन मगदूम, स्वप्नील काळे व गणेश कारले मंगळवारी पहाटे एक वाजून 52 मिनिटांनी राम गडकरी यांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याजवळ आले 
  • हातोड्याने पुतळा फोडला. पुतळा पाण्यात पडला. पुतळा काढून चौघेजण मुठा नदीच्या कडेने जात असल्याचे सीसीटीव्हीत कैद
  • सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पोलिसांना घटना कळली
  • संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचे कृत्य असल्याची सुरूवातीची माहिती
  • दुपारनंतर नाट्य परिषद, मनसेतर्फ उद्यानाच्या दारात निषेध सभा
  • संध्याकाळपर्यंत पुतळ्याचा शोध लागला नव्हता
  • संध्याकाळी संशयितांना डेक्कन पोलिस ठाण्यात आणले

कोण काय म्हणाले?

संभाजी उद्यानातील नाटककार राम गणेश गडकरींचा पुतळा हटवण्याचे काम ज्या मर्द मराठ्यांनी केले आहे त्यांना सलाम!
- नितेश राणे, काँग्रेस आमदार 

पुतळा हटवण्याची घटना निंदनीय आहे. असे प्रकार होणे चुकीचे आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. 
- गिरीष बापट, पालकमंत्री, पुणे

शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराजांच्या नावाने पुतळा फोडण्यासारखे कृत्य करणे, हे त्यांचे थोरपण कमी केल्यासारखे आहे.
- विनायक मेटे, आमदार, शिवसंग्राम संघटना

पुण्यात जातीय तेढ निर्माण करण्यासाठी असा प्रयत्न होत आहे. पण मतांचे राजकारण करू देणार नाही. पुणे महापालिकेकडून हा पुतळा पुन्हा उभारण्यात येईल. 
- प्रशांत जगताप, महापौर, पुणे

ज्या माणसाने 'महाराष्ट्र गीत' लिहिले, त्याच्याबद्दल आपण हे असे वागणार? महाराष्ट्रातील कोणताही सुसंस्कृत मनुष्य हे कृत्य मान्य करूच शकणार नाही.
- जब्बार पटेल, ज्येष्ठ दिग्दर्शक 

आद्यप्रवर्तक नाटककाराचा पुतळा काढणे म्हणजे घृणास्पदच प्रकार आहे. हा एका व्यक्तीचा नव्हे तर रंगभूमीचाच अपमान आहे.
- प्रसाद ओक, अभिनेते 

गडकरींच्या लेखनाचा विरोध करायचाच असेल तर घटनेच्या चौकटीत राहून करता येऊ शकतो; पण आज घडलेला विकृत प्रकार निषेधार्हच आहे.'
- डॉ. श्रीपाल सबनीस, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

'राजसंन्यास' नाटक छत्रपती संभाजीराजांची स्तुती करणारे आहे. जे विरोध करत आहेत, त्यांनी हे नाटक पाहिले किंवा किमान वाचले तरी आहे का? 
- जयंत सावरकर, नियोजित नाट्य संमेलनाध्यक्ष 

काय आहे पुतळ्याचा इतिहास?

  • शिल्पकार ए. वा. केळकर यांनी हा पुतळा साकारला होता. 
  • गडकरी यांच्या 43 व्या पुण्यतिथीनिमित्त पुणे महापालिकेने संभाजी उद्यानात हा पुतळा बसवला. 
  • आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या हस्ते 23 जानेवारी 1962 रोजी या पुतळ्याचे अनावरण झाले. 
  • पुतळ्याच्या कोनशिलेवर 'राजसंन्यास' या नाटकाबरोबरच 'एकच प्याला', 'भावबंधन', 'पुण्यप्रभाव', 'प्रेमसंन्यास' या नाटकांची नावे आणि एक कविता कोरली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com