उपचारांअभावी लाखो रुग्णांचे हाल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मार्च 2017

निवासी डॉक्‍टरांच्या सामूहिक रजेमुळे राज्यभरातील चित्र
मुंबई - लोकमान्य टिळक रुग्णालयात ड्युटीवर असलेल्या निवासी डॉक्‍टरला झालेल्या मारहाणीनंतर आज मुंबईसह राज्यातील सर्व पालिका आणि सरकारी रुग्णालयांतील निवासी डॉक्‍टरांनी सामूहिक रजा (मास बंक) घेतली. त्यामुळे राज्यभरात लाखो रुग्णांना उपचार न मिळाल्याने त्यांचे चांगलेच हाल झाले.

निवासी डॉक्‍टरांच्या सामूहिक रजेमुळे राज्यभरातील चित्र
मुंबई - लोकमान्य टिळक रुग्णालयात ड्युटीवर असलेल्या निवासी डॉक्‍टरला झालेल्या मारहाणीनंतर आज मुंबईसह राज्यातील सर्व पालिका आणि सरकारी रुग्णालयांतील निवासी डॉक्‍टरांनी सामूहिक रजा (मास बंक) घेतली. त्यामुळे राज्यभरात लाखो रुग्णांना उपचार न मिळाल्याने त्यांचे चांगलेच हाल झाले.

न्यायालयाचा मनाई आदेश असल्याने "मार्ड'ने अधिकृतपणे संप पुकारला नाही, तरीही निवासी डॉक्‍टरांनी काम बंद केल्यामुळे राज्यभरात लाखो रुग्णांना उपचारांविना रुग्णालयाच्या आवारात रात्र काढावी लागली, तर काहींना खासगी रुग्णालयाची वाट धरावी लागली. त्यातही आजारी लहान मुले घेऊन आलेल्या मातांना तसेच परत जातानाचे केविलवाणे दृश्‍य अनेक ठिकाणी पाहायला मिळाले.

डॉक्‍टरांवर झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ राज्यातील निवासी डॉक्‍टरांनी स्वयंप्रेरणेने कामावर न जाण्याचा निर्णय घेतला. सेंट्रल मार्डने संप पुकारला नसला तरी राज्यभरातील निवासी डॉक्‍टर मोठ्या संख्येने मास बंकमध्ये सहभागी झाल्याचे आढळले. मुंबईतील जे.जे., के.ई.एम., शीव, नायर या मोठ्या रुग्णालयांसह जी.टी., सेंट जॉर्ज, कामा आणि अन्य उपनगरीय रुग्णालयांतील डॉक्‍टर या मास बंकमध्ये सहभागी झाले होते. मुंबईसह पुणे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद आदी मोठ्या शहरांमध्येही अशीच अवस्था होती, त्यामुळे राज्यभरातील अत्यवस्थ रुग्णांना जादा पैसे मोजून खासगी रुग्णालयांचा आसरा घ्यावा लागला. एवढे पैसे न देऊ शकणाऱ्यांना दिवसभर तळमळत दुखणे अंगावर काढण्याखेरीज इलाज उरला नाही.

नायर रुग्णालयात आपत्कालीन व्यवस्था सुरू ठेवण्यात आली होती, तर के.ई.एम. रुग्णालयात बाह्य रुग्ण विभाग पूर्णपणे बंद करण्यात आला होता. के.ई.एम., शीव, जे.जे. आणि सेंट जॉर्ज रुग्णालयात एकूण 266 शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यापैकी जी.टी. रुग्णालयात एकूण 16 शस्त्रक्रिया पार पडल्या, त्यात 12 मोठ्या शस्त्रक्रिया होत्या. यात 10 जनरल सर्जरी, तर 4 प्लास्टिक सर्जरी होत्या, अशी माहिती रुग्णालयाचे सुप्रिटेंड डॉ. मुकुंद तायडे यांनी दिली. नायर रुग्णालयाचे सुप्रिटेंड डॉ. रमेश भारमल यांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णालयात बाह्यरुग्ण विभाग पूर्णतः बंद ठेवण्यात आला होता. तरी देखील रुग्णांच्या सोयीसाठी आपत्कालीन विभागात रुग्ण तपासणी सुरू होती.

रुग्णालयातील सुमारे 75 निवासी डॉक्‍टरांनी कामावर येणार नसल्याचे लेखी दिल्याचे डॉ. भारमल यांनी सांगितले. तर, के.ई.एम. रुग्णालयात सकाळी साडेसात वाजल्यासून बाह्यरुग्ण विभागात केस पेपर देण्याचे काम बंद झाल्यामुळे शेकडो रुग्णांचे हाल झाले.

राज्यात शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयांमधील डॉक्‍टरांवरील वाढत्या हल्ल्यांमुळे त्यांच्या सुरक्षिततेसाठी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक होऊन सुमारे अकराशे सुरक्षारक्षक लवकरच नेमले जाणार आहेत.
- गिरीश महाजन, आरोग्यमंत्री

डॉक्‍टरांविरोधात अवमान याचिका दाखल
रुग्णांचे हाल करून संप पुकारणार नाही, अशी हमी न्यायालयाला देऊनही राज्यभरातील डॉक्‍टरांनी घेतलेल्या सामूहिक रजेच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी अवमान याचिका दाखल करण्यात आली. मंगळवारी (ता. 21) याचिकेवर सुनावणी होणार आहे.