लाल दिवा असलेल्यांचा उपयोग शून्यच- शिवसेना

टीम ई सकाळ
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

उदाहरणार्थ बाळासाहेब
लाल दिव्याचा हव्यास न धरण्याबाबत शिवसेनेने बाळासाहेब ठाकरेंचा दाखल दिला आहे. शिवसेनाप्रमुखांसारख्या नेत्यांच्या गाडीवर कधीच लाल दिवा नव्हता, पण त्यांचे कर्तृत्व, लोकप्रियता महान होती. लाल दिवा हीच कर्तबगारी असे समजणाऱयांना पंतप्रधानांच्या निर्णयाने नक्कीच धक्का बसला असेल, असे सामनामध्ये म्हटले आहे.

मुंबई : 'माणूस हा गाडीवरील लाल दिव्याने मोठा ठरत नाही तर कर्तृत्वाने मोठा ठरतो,' असे सांगत 'अनेक बडय़ा पदांवर बसलेल्या व्यक्तीच्या डोक्यावर लाल दिवा आहे. पण देशाला व लोकांना त्यांचा उपयोग शून्यच आहे,' असा टोमणा मारत सरकारमधील घटकपक्ष असलेल्या शिवसेनेने सत्ताधारी भाजपला घरचा आहेर दिला आहे. 

हा निर्णय ऐतिहासिक किंवा क्रांतिकारक वगैरे असल्याचे बँडबाजे वाजायला सुरवात झाली असली तरी पंतप्रधानांनी लोकांच्या मनातील भावनेचीच एक प्रकारे अंमलबजावणी केल्याचे दिसत आहे. पंतप्रधानांच्या मनात आले व त्यांनी लाल दिवे विझविण्याचा निर्णय घेऊन टाकला. राजकारणी व नोकरशाहीने लाल दिव्यांच्या बाबतीत एकप्रकारे अतिरेकच चालवला होता. तसेच, वेगवेगळ्या स्तरांतील अधिकाऱ्यांची विविध रंगांच्या दिव्यांची रंगपंचमीच रस्त्यावर दिसत असे, असा चिमटा शिवसेनेने 'सामना' या मुखपत्रातून काढला आहे. 

महामंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांना फक्त लाल दिव्यासाठीच राज्यमंत्रिपदाचा दर्जा हवा असतो, असे निरीक्षण नोंदविण्यात आले असून, पंतप्रधान मोदींनी नोटाबंदीप्रमाणेच हा धाडसी निर्णय घेतला आहे. तसेच, ज्यांचा देशाला उपयोग नाही अशा लोकांसाठी सत्ता आणि लाल दिवा वांझ ठरतो, मिरवायचे साधन ठरते.

दरम्यान, नागपूरमध्ये हॉल तिकीट परत देण्याच्या बदल्यात शिक्षकाने संबंधित विद्यार्थिनीकडे थेट शरीरसुखाची मागणी केल्याच्या घटनेचा तीव्र निषेध सेनेने नोंदविला आहे. या घटनेने शिक्षकी पेशाच्या उच्च परंपरेला काळिमा फासला गेला आहे, असे 'सामना'त म्हटले आहे.