'चित्रपटातील आई' हरवली - अभिनेत्री रिमा लागू यांचे निधन

टीम ई सकाळ
गुरुवार, 18 मे 2017

ज्येष्ठ आणि लोकप्रिय अभिनेत्री रिमा लागू (वय 59) यांचे आज (गुरुवार) पहाटे हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.

मुंबई : ज्येष्ठ आणि लोकप्रिय अभिनेत्री रिमा लागू (वय 59) यांचे आज (गुरुवार) पहाटे हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.

बुधवारी रात्री उशिरा त्यांना छातीत दुखू लागल्याने अंधेरी येथील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचे आज (गुरुवार) पहाटे निधन झाले. मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत त्यांनी अभिनयाच्या बळावर मोठा नावलौकिक मिळविला होता. चित्रपटातील आई म्हणून त्यांची ओळख होती. विशेषत: अभिनेता सलमान खानची आई म्हणून त्यांनी अनेक चित्रपट केले. अभिनेते विक्रम गोखले यांच्यासोबतचे "के दिल अभी भरा नही' हे त्यांचे अखेरचे नाटक ठरले. 'मैने प्यार किया', 'हम आपके है कौन', 'जिस देस मे गंगा रहती है' यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी महत्वाच्या भूमिका बजावल्या.

आज दुपारी दोन वाजता मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

रीमा लागू यांचा जन्म 1958 मध्ये झाला. घरातूनच त्यांना अभिनयाचे धडे मिळाले. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मराठी रंगभूमीपासून सुरुवात करणा-या रिमा लागू यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केले होते.

■ ​​गाजलेले सिनेमे​​
मैंने प्यार किया, हम आपके हैं कौन, हम साथ साथ हैं, वास्तव, साजन, कुछ कुछ होता है, आशिकी

​​■ हिंदी दूरदर्शन मालिका​​
श्रीमान श्रीमती, तू तू मैं मैं

​​■ मराठी नाटक​​
घर तिघांचं हवं, चल आटप लवकर, झाले मोकळे आकाश, तो एक क्षण, पुरुष बुलंद, सविता दामोदर परांजपे, विठो रखुमाय