अभिनेत्री रिमा लागू काळाच्या पडद्याआड 

अभिनेत्री रिमा लागू काळाच्या पडद्याआड 

मुंबई - रंगभूमीबरोबरच हिंदी व मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये आपल्या कसदार अभिनयाचा ठसा उमटविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू (वय 59) यांचे बुधवारी मध्यरात्री अंधेरी येथील कोकिळाबेन अंबानी रुग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. 

रिमा लागू यांना अभिनयाचा वारसा त्यांच्या आईकडूनच मिळाला. प्रसिद्ध अभिनेत्री मंदाकिनी भडभडे यांच्या त्या कन्या होत्या. त्यांचा अभिनयाचा पाया लहानपणापासूनच पक्का झाला होता. माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांच्यातील अभिनयाचे गुण दिसू लागले. रंगभूमीबरोबरच मराठी व हिंदी मालिका आणि चित्रपटसृष्टीतही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. हिंदीतील सलमान खान, शाहरूख खान, अक्षय कुमार, संजय दत्त, गोविंदा, काजोल अशा अनेक कलाकारांबरोबर त्यांनी भूमिका केल्या. त्यांनी "मैंने प्यार किया' आणि अन्य काही चित्रपटांत साकारलेल्या ग्लॅमरस आईच्या भूमिका कमालीच्या लोकप्रिय ठरल्या. हिंदीतील मोठमोठ्या बॅनर्सबरोबर त्यांनी काम केले. "कलियुग' हा त्यांचा पहिला चित्रपट होता. त्यांच्या "तू तू मैं मैं' तसेच "श्रीमान श्रीमती' या मालिका तुफान गाजल्या. सूरज बडजात्या यांच्या "मैंने प्यार किया', "हम आपके हैं कौन' व "हम साथ साथ हैं' आदी चित्रपटांत साकारलेल्या आईच्या भूमिका लक्षवेधी ठरल्या. त्याचवेळी त्यांनी "तू तू मैं मैं', "श्रीमान श्रीमती'मधील विनोदी भूमिकाही तेवढ्याच ताकदीने पेलल्या. 

बुधवारी रात्री अचानक त्यांच्या छातीत वेदना होऊ लागल्याने कुटुंबीयांनी त्यांना जवळच्या कोकिलाबेन रुग्णालयात नेले. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच हिंदीबरोबरच मराठी कलाकारांनी ओशिवरा येथील त्यांच्या घरी धाव घेतली. नीना कुलकर्णी, सचिन पिळगावकर, वैभव तत्त्ववादी, स्वाती चिटणीस, महेश मांजरेकर, भारती आचरेकर, संजय मोने, सुकन्या कुलकर्णी, हर्षदा खानविलकर, प्रशांत दामले, प्रिया बेर्डे, मोहन जोशी, क्रांती रेडकर, रेणुका शहाणे, शिल्पा तुळसकर, मेधा मांजरेकर, सुशांत शेलार, शरद पोंक्षे, विजय पाटकर, सोनाली कुलकर्णी, संजय नार्वेकर आदी मराठी कलाकारांबरोबरच हिंदीतील महेश भट, आमीर खान, किरण राव, काजोल, ऋषी कपूर, बरखा बिश्‍त यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. 

अल्प परिचय
जन्म आणि शिक्षण 
- रिमा लागू यांचा जन्म 1958 मध्ये झाला. 
- आई मंदाकिनी भडभडे यांच्याकडून त्यांना घरीच अभिनयाचे धडे मिळाले. मंदाकिनी भडभडे यांचे "लेकुरे उदंड जाहली' हे नाटक फारच लोकप्रिय ठरले होते. 
- रिमा लागू यांचे शिक्षण पुण्यातील हुजुरपागा शाळेतील एचएचपीसी हायस्कूलमध्ये झाले. शाळेत असल्यापासूनच त्यांच्यातील अभिनयाचे गुण दिसत होते. 
- माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अभिनयाचे व्यावसायिक शिक्षण घेतले. 

करिअरची सुरुवात 
- अभिनयाची सुरुवात मराठी नाटकांपासून केली. 
- बालकलाकार म्हणून नऊ चित्रपटांत काम केले. 
- 1979 मध्ये त्यांनी "सिंहासन' या मराठी चित्रपटातून चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली. 
- 1980 मध्ये कलियुग या चित्रपटात सहकलाकाराची भूमिका करून त्यांनी हिंदी चित्रपटातील कारकीर्द सुरू केली. 
- त्यानंतर त्यांनी "आक्रोश', "कयामत से कयामत तक', "हमारा खानदान', "रिहाई', "मैने प्यार किया', "आशिकी', "बलिदान', "हम आपके है कौन', "हम साथ साथ है' आदी चित्रपटातून भूमिका केल्या. 

खासगी आयुष्य 
- रिमा लागू यांनी विवेक लागू यांच्याशी विवाह केला. नयन भडभडे हे नाव बदलून त्यांनी रिमा लागू हे नाव लावायला सुरुवात केली. 
- काही वर्षांतच विवेक लागूंबरोबर घटस्फोट झाला. 
- रिमा लागू यांची मुलगी मृण्मयी लागूही याच क्षेत्रात आहे. 

गाजलेले चित्रपट 
- त्यांनी अनेक चित्रपटांतून सहकलाकाराच्या भूमिका केल्या. 
- अनेक चित्रपटांत त्या आईच्या भूमिकेत दिसल्या. सलमान खान, काजोल, शाहरूख खान, अक्षय कुमार, जुही चावला, ऊर्मिला मातोंडकर, माधुरी दीक्षित या दिग्गज कलाकारांबरोबर त्यांनी आईची भूमिका साकारली. "मैंने प्यार किया', "हम साथ साथ हैं', "जुडवा', "कुछ कुछ होता है', "यस बॉस', "कल हो ना हो', "हम आपके है कौन' आदी चित्रपटांत त्यांनी साकारलेली ग्लॅमरस आईची भूमिका खूप गाजली. "वास्तव' या चित्रपटात संजय दत्तच्या कणखर आईची भूमिका त्यांनी अविस्मरणीय केली. 

गाजलेल्या मालिका 
- "तू तू मैं मैं' आणि "श्रीमान श्रीमती' या त्यांच्या विनोदी मालिका लोकप्रिय ठरल्या. 
- "आसमान से आगे', "दो और दो पांच', "धडकन', "कडवी खट्टी', "मिठी', "लाखों में एक', "नामकरण' या हिंदी मालिका तसेच "तुझं माझं जमेना' ही मराठी मालिका गाजली. 

गाजलेली नाटके 
- "घर तिघांचं हवं', "चल आटप लवकर', "झाले मोकळे आकाश', "तो एक क्षण', "पुरुष बुलंद', "सविता दामोदर परांजपे', "विठो रखुमाय', "छापा काटा', "के दिल अभी भरा नहीं', "आसू आणि हसू', "गोड गुलाबी', "सासू माझी ढासू', "आम्ही दोघं राजा राणी', "नाती गोती', "एकदा पहावा नं करून', "अशा ह्या दोघी' अशी त्यांची अनेक नाटके गाजली होती. 

मिळालेले पुरस्कार 
- रिमा लागू यांना "मैने प्यार किया', "आशिकी', "हम आपके हैं कौन', "वास्तव' या चित्रपटांसाठी फिल्मफेअरचे सर्वोत्कृष्ट सहकलाकारासाठीचे नामांकन. 
- "रेशीमगाठ' चित्रपटासाठी महाराष्ट्र राज्याचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार. 
- "तू तू मैं मैं' या मालिकेसाठी इंडियन टेली ऍवॉर्डस्‌चा सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्रीचा पुरस्कार. 

चतुरस्र अभिनेत्री गमावली - मुख्यमंत्री 
चित्रपट, रंगभूमी आणि दूरचित्रवाणी या तीनही माध्यमांत आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या रिमा लागू यांच्या निधनाने एक चतुरस्र अभिनेत्री गमावली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. 

रुपेरी पडद्यावरची लोकप्रिय आई गमावली - विनोद तावडे 
मराठी आणि हिंदी सिनेमा आणि नाट्यसृष्टीत स्वतःच्या अभिनयाचा एक वेगळा ठसा रिमा लागू यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारून उमटवला होता. वेगवेगळ्या सिनेमांमध्ये आई आणि सासू या भूमिका साकारल्यामुळे रुपेरी पडद्यावरच्या सर्वांत लोकप्रिय आई अशीच त्यांची ओळख होती. आज रिमा लागू यांच्या आकस्मिक निधनामुळे या लोकप्रिय आईला आपण कायमचे गमावले आहे. 

चित्रपटसृष्टी दिग्गज अभिनेत्रीस मुकली : खासदार अशोक चव्हाण 
ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांच्या निधनाने चित्रपटसृष्टी व महाराष्ट्रातील तमाम रसिक एका दिग्गज अभिनेत्रीस मुकले आहेत, अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी शोक व्यक्त केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com