भाड्यापोटी जुन्या नोटा स्वीकारण्याचा नाट्यगृहांना आदेश 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

मुंबई - मराठी नाटकांसाठी भाडेतत्त्वावर नाट्यगृह उपलब्ध करून देताना त्या नाट्यगृहाचे भाडे हजार आणि पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारण्याची परवानगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी दिली. 

मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाचे अध्यक्ष प्रसाद कांबळी व सचिव संतोष काणेकर यांनी आज सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे आणि मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मराठी नाटकांसाठी नाट्यगृहाचे बुकिंग करताना या नाट्यगृहाचे भाडे जुन्या चलनात स्वीकारण्यात अनेक नाटयगृहांनी असमर्थता व्यक्त केली. यामुळे मराठी नाटकांना याचा फटका बसत होता. ज्या प्रमाणे महापालिका व नगरपालिकांना कर रकमेची देयके स्वीकारण्यासाठी जुन्या नोटांची सवलत दिली आहे, तशाच प्रकारची सवलत नाट्यनिर्मात्यांना दिल्यास मराठी नाटकांना दिलासा मिळू शकेल, अशी विनंती प्रसाद कांबळी यांनी आज फडणवीस आणि तावडे यांच्याकडे केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत नाट्यगृहांनी नाट्यनिर्मात्यांच्या नाटकाच्या भाड्यासाठी जुन्या नोटा स्वीकारण्याची अनुमती देण्यात आल्याची माहिती तावडे यांनी दिली.