राज्य बॅंकेच्या 'एमडीं'नी राजीनामा मागे घेतला

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 21 मे 2017

मुंबई - राज्य सहकारी शिखर बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) डॉ. प्रमोद कर्नाड यांचे राजीनामानाट्य टळले आहे. बॅंकेतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत त्यांना राजीनामा मागे घेण्यास प्रवृत्त केले.

प्रशासकीय मंडळाच्या बैठकीत नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बुडीत कर्जप्रकरणावरून प्रशासकीय मंडळांचे अध्यक्ष व प्रमोद कर्नाड यांच्यात मतभेद झाले होते. या बुडीत कर्ज प्रकरणाची जबाबदारी निश्‍चित करून कर्नाड यांना नोटीस बजाविण्याचा इशारा प्रशासकीय मंडळाने दिल्याने मतभेद निर्माण झाले होते. या बैठकीतून कर्नाड तडकाफडकी निघून गेले होते. त्यांनी राजीनामादेखील टाइप केला होता. मात्र बॅंकेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी कर्नाड यांची समजूत काढली. टाइप केलेला राजीनामादेखील कर्मचाऱ्यांनी फाडून टाकला.

राज्य बॅंकेला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी अत्यंत प्रामाणिकपणे काम केल्यानंतरही अशाप्रकारे आरोप झाल्याने तात्त्विक मतभेद झाले होते. मात्र ते आता संपले असून, आपण बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर काम करणार असल्याचे कर्नाड यांनी स्पष्ट केले.