मित्रपक्षाने रडीचा डाव खेळू नये - शरद पवार

sharadpawar
sharadpawar

पुणे - " पोटनिवडणुका आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत मित्रपक्षाबरोबरच आमची समन्वयाची भूमिका आहे. मित्रपक्षानेही त्याचा गांभीर्याने विचार करावा,' असा सल्ला देतानाच "मित्रपक्षाने रडीचा डाव खेळू नये,' असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज कॉंग्रेसचे नाव न घेता लगावला. ज्या जागा आमच्या आहेत, त्या जागांवर आम्ही हक्क सांगणारच, त्यामध्ये कोणताही पर्याय असू शकत नाही,' असेही पवार यांनी ठणकावून सांगितले. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांची निवड झाली. या वेळी बोलताना शरद पवार यांनी देशातील सद्यःस्थिती आणि सरकारच्या भूमिकेवर जोरदार हल्लाबोल केला. तर मित्रपक्ष कॉंग्रेसला कानपिचक्‍या दिल्या. मित्रपक्षांनाही एकत्रित आल्यास सरकारला सत्तेबाहेर ठेवणे अश्‍यक नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. 

उत्तर प्रदेश येथील पोटनिवडणुकांच्या निकालावरून लोकांचे मन आणि मत कोणत्या दिशेने जात आहे हे लक्षात येते, असे सूचित करून पवार म्हणाले, ""पालघर, भंडारा-गोंदिया, सांगलीतील विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने मित्रपक्षांशी विचारविनिमय कराव लागणार आहे. यामध्ये समन्वयाची भूमिका घेऊन मार्ग काढावा, अशी आमची भूमिका आहे. आम्ही रास्त कारण असल्याशिवाय भूमिका घेणार नाही. आम्ही लढवलेली जागा आम्हीच लढवणार.'' 

केंद्र आणि राज्यातील सरकारांच्या कारभारावर हल्लाबोल करताना पवार म्हणाले, ""देशात बेरोजगारी वाढल्याची आकडेवारी जाणकार सांगत आहेत. तरुण पिढी अस्वस्थ आहे. रोज एका तरुणाची आत्महत्या अशा बातम्या झळकत आहेत. सामान्य माणसाला विश्‍वास येईल, अशी यंत्रणा उभारण्यात सरकार अपयशी ठरले आहे. अत्याचार केलेल्या अन्यायग्रस्तावरही अत्याचार करायचा इतके नादान राज्यकर्ते पाहिले नव्हते.'' 

""निवडणुका जवळ आल्या आहेत. समाजातील विविध घटकांशी सुसंवाद साधण्यासाठी कार्यकर्त्यांचा संच लागेल. लोकांच्या मनात ईव्हीएम मशिनबाबत शंका आहे. याकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे. मावळते प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकत्र बसून रणनीती तयार करावी. दलित, अल्पसंख्याक, आदिवासी, महिलांना न्याय व संधी मिळेल यासाठी प्रयत्न करावेत,'' असे आवाहन पवार यांनी केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com