bhaiyyaji joshi
bhaiyyaji joshi

शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर संवेदनशील व्हा - भय्याजी जोशी

नागपूर - देशभरात शेतकऱ्यांच्या प्रश्‍न अत्यंत गंभीर आहे. या प्रश्‍नावर वारंवार संघाने आपले स्पष्टीकरण दिले आहे. सरकारने त्यांच्या प्रश्‍नावर संवेदनशील होत, निर्णय घ्यावे असे हितोपदेश संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी सरकारला दिले. 
महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी लॉंग मार्च काढला आहे. यापूर्वीही दिल्लीमध्ये जंतरमंतर येथे शेतकऱ्यांनी बरेच दिवस आंदोलन केले आहे. त्याकडे बराच काळ सरकारचे दुर्लक्ष झाले. संघाने त्यामध्ये पुढाकार घेत, भाजपाला शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाकडे लक्ष देण्याची सूचना केल्यानंतर अर्थसंकल्पात शेतकऱ्यांबद्दल योजनांचा समावेश करण्यात आला. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांपर्यत शासन पोहचत नसल्याची सर्व सामान्यांची प्रतिक्रिया आहे. त्यातूनच संघाने सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर संवेदनशील होण्याचा उपदेश भय्याजींनी केला. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनाही देशाच्या कृषीनितीची माहिती घेत, त्या अनुषंगाने परिवर्तन करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. कृषी धोरण बदलून शेतमालाला चांगला भाव मिळेल, असा विश्‍वास सरकारने शेतकऱ्यांना द्यावा असेही त्यांनी सांगितले.

आर्थिक घोटाळे देशासाठी धोका
नीरव मोदी आणि मेहूल चौकसी आणि विजय माल्यासारख्यांनी हजारो कोटींचे कर्ज घेऊन देशातून पळ काढला आहे. या आर्थिक घोटाळ्यावर संघाने आपली भूमिका स्पष्ट केली. जोशी यांनी या विषयावर बोलताना सांगीतले की, देशभरात बॅंकामध्ये होत असलेले आर्थिक घोटाळे हे देशाच्या आर्थिक व्यवस्थेला मारक ठरणारे आहे. या गोष्टी देशातील आर्थिक व्यवस्थेतील कमतरता दाखविणाऱ्या आहे. त्यामुळे या व्यवस्थेत बदल करण्याची गरज असून त्याच्या रचनेत बदल घडवून आणण्याची आवश्‍यकता आहे. सरकारसमोर हे मोठे आव्हान आहे. शासनाने त्याकडे गंभीरतेने लक्ष द्यावे. तसेच वित्त संस्थानीही "फुल प्रुफ' यंत्रणा निर्माण करावी असा सल्ला त्यांनी दिला.

पुतळ्यांचे राजकारण संघर्ष निर्माण करण्यासाठी 
त्रिपुरातील पुतळा पाडण्याहून बऱ्याच प्रमाणात संघ आणि भाजपावर टिका करण्यात आली. मात्र, केरळमध्ये होणाऱ्या हत्येबद्दल कुठेच बोलल्या जात नाही. एका वनवासी युवकाचा मृत्यू होतो. मात्र, एका मुस्लीम युवकाला झोडपून मारल्याचे दाखविल्या जाते. यामागे काही विशिष्ट विचार कार्य करीत आहे. त्रिपुरातील पुतळा पाडल्याचा कृतीचा संघाकडून निषेधच आहे. हा चिंतेचा विषय आहे. मात्र, असहिष्णू तत्व समाजात संभ्रम निर्माण करुन पुतळ्यांच्या राजकारण करीत संघर्षाची परिस्थिती निर्माण करीत असल्याचे चित्र सध्या समाजात दिसत असल्याचे जोशी म्हणाले. 

राम मंदिराच्या जागेवर दुसरे काहीच नाही 

अयोध्येतील जागेवर राम मंदिरच होईल, दुसरे काहीही होणार नाही हे निश्‍चित आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसारच पुढील कार्य होईल. पण सर्वसमंतीने राम मंदिर व्हावे हीच संघाची भूमिका आहे. पण ही बाब सोपी नसल्याचे जोशी यांनी स्पष्ट केले. 

जोशी यांनी श्री श्री रविशंकर यांच्या राम मंदिर निर्माणासंदर्भात सुरू असलेल्या प्रयत्नांना समर्थन दर्शविले. जे जे राममंदिर संदर्भात प्रयत्नरत आहेत, त्यांचेसोबत चर्चा करुन राममंदिर उभारणीसंदर्भात पुढे जाऊ. योग्य प्रक्रियेने हा विषय मार्गी लागावा. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. न्यायालयाच्या प्रक्रियेवर संपूर्ण विश्‍वास असून त्यातून आलेल्या निर्णयानंतर मंदिर उभारणीची प्रक्रिया सुरू होईल. मंदिर निर्माणाच्या कार्यात प्रत्येकाचा हातभार लागावा हाच संघाचा मानस आहे. त्याचे स्वागत करायला हवे. त्यासाठी प्रत्येकाशी चर्चा करावयाची असल्यास ती चर्चा करण्याची तयारी आहे. मात्र, या मुद्‌द्‌यावर सर्व समंती होईलच असे आज सांगता येत नाही. सध्या राम मंदिराच्या निर्माणासाठी सकारात्मक वातावरण असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. पत्रकार परिषदेला अखिल भारतीय प्रचार प्रमुख मनमोहन वैद्य आणि सहप्रचार प्रमुख नरेंद्र कुमार ठाकूर उपस्थित होते. 

संघटनात्मक मतभेद नाही मतभिन्नता 
देशातील मोदी सरकार हे शेतकरी, कामगार यांच्या विरोधी धोरण राबवित असल्याची टिका भारतीय मजदूर संघ आणि स्वदेशी जागरण मंचकडून करण्यात आली. दूसरीकडे विश्‍व हिंदू परिषदेकडूनही मोदींच्या कार्यप्रणालीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण करण्यात आले आहे. या संदर्भातील प्रश्‍नावर उत्तर देताना जोशी म्हणाले की, प्रत्येक संघटनेला त्यांचे विचार घेऊन पुढे जाण्याचा अधिकार आहे. त्यावर काम करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे भामसं, स्वदेशी जागरण मंचसारख्या संघटना आपले कार्य करीत आहेत. अनेकदा भाजपा सरकारला अपेक्षित काम करता येणे शक्‍य होत नाही. त्यामुळे संघटनांमध्ये मतभेद नसून केवळ मतभिन्नता असल्याचे स्पष्टीकरण जोशी यांनी दिले. 

स्वयंसेवकांच्या कार्यामुळेच संघ वाढला 

केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा विस्तार झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, गेल्या 90 वर्षात 60 हजार गाव आणि 80 हजार युनिटद्वारे स्वयंसेवक संघ काम करीत असून प्रत्येक कार्यकर्ता परिश्रम घेत आहे. त्याच या सर्व कार्याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रुपाने केलेल्या कार्याचा परिणाम म्हणूनच संघाचा विस्तार झाला, त्यात सरकारचे योगदान नाही असे प्रतिपादन जोशी यांनी केले. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तीन दिवसीय अखिल भारतीय प्रतिनिधी सभा रेशीमबाग येथील स्मृती मंदिर परिसरात पार पडली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदी चौथ्यांदा निवड झाल्यानंतर रविवारी जोशी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. संघाने केलेल्या कामामुळे संघ वाढला आहे. सामान्य लोकही आता संघाला स्वीकारत आहे. विशेष म्हणजे संघावरील बंदी उठविण्यात आल्यावर दुपटीने वाढ झाली. आज समाजातील प्रबुद्ध वर्गही सरसंघचालकांना भेटून जुळण्याचा प्रयत्न करतात. मात्र, त्याला बऱ्याच मर्यादा आहेत. याचा अर्थ असा नव्हे की, संघामुळेच देशात भारतीय जनता पक्षाचे सरकार आले आहे असा नाही. त्यावेळी परिस्थिती तशी होती आता केंद्र सरकारने केलेल्या कामामुळे आणि योजनांमुळे जनता सरकारच्या पाठिशी राहील, असे चित्र दिसत असल्याचे जोशी यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात नमूद केले संघामुळे भाजपाची सत्ता आली आणि सत्तेमुळे संघ वाढला, यावर संघाचा विश्वास नाही जो वाढतो तो आपल्या बळावर वाढतो आणि जो संपतो तो आपल्या चुकांमुळे संपतो असा टोला मारत जोशी यांनी सरकार लगावून सावध केले . 

लिगायत समाजाच्या मागणीला संघाचा विरोध
लिंगायत समाजाने वेगळया धर्माची मागणी केली आहे याकडे लक्ष वेधले असता जोशी म्हणाले, देशात संप्रदाय वेगवेगळे असू शकतात. मात्र, वेगळ्या धर्माची मागणी कुणी केली असेल तर त्याला संघातर्फे कसा काय पाठिंबा देता येणार नाही. प्रत्येक समाजाचे आचार विचार, संस्कृती वेगळ्या असतील पण मुलभूत गोष्टीत समानता आहे. त्यामुळे वेगळा धर्म निर्माण करणे त्यावर उपाय आहे काय ? असा सवाल करीत जोशी यांनी अप्रत्यक्षरित्या वेगळ्या धर्माच्या मागणीला विरोधच दर्शविला.

बोलीभाषेचे संवर्धन झालेच पाहिजे
देशात अनेक बोली आणि भाषा आहेत्न त्यांचे संवर्धन करण्याची गरज आहे कोणत्याही भाषांचा व्देष नाही मात्र, भारतीय भाषा आणि बोली सुरक्षित ठेवाव्या लागतील लोकांनी दैनंदिन जीवनात मातृभाषेचा अधिक वापर करायला हवा, असे आवाहन भय्याजी जोशी यांनी केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com