साध्वी प्रज्ञासिंहला दोषमुक्त करण्यास विरोध नाही

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 मे 2017

मुंबई - मालेगावमध्ये नऊ वर्षांपूर्वी झालेल्या बॉंबस्फोटाच्या खटल्यातून साध्वी प्रज्ञासिंहला दोषमुक्त करण्यास आमचा विरोध नाही, असे राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) शुक्रवारी विशेष न्यायालयात स्पष्ट केले.

मुंबई - मालेगावमध्ये नऊ वर्षांपूर्वी झालेल्या बॉंबस्फोटाच्या खटल्यातून साध्वी प्रज्ञासिंहला दोषमुक्त करण्यास आमचा विरोध नाही, असे राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) शुक्रवारी विशेष न्यायालयात स्पष्ट केले.

साध्वी प्रज्ञासिंहला काही दिवसांपूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तिच्याविरोधात पुरेसे पुरावे सरकारी पक्षाकडे नसल्याचे मत न्यायालयाने त्या वेळी व्यक्त केले होते. या पार्श्‍वभूमीवर साध्वी प्रज्ञासिंह न्यायालयात दोषमुक्ततेसाठी अर्ज केला होता. त्यावर म्हणणे मांडण्याचे निर्देश विशेष न्यायालयाने दिले होते. "एनआयए'च्या वतीने शुक्रवारी विशेष सरकारी वकील अविनाश रसाळ यांनी न्यायालयात लेखी उत्तर दाखल केले.

"साध्वी प्रज्ञासिंहला दोषमुक्त करण्यास "एनआयए'चा विरोध नाही. आम्ही यापूर्वी दाखल केलेल्या आरोपपत्रातही तिच्याविरोधात सबळ पुरावे नसल्याचे स्पष्ट केले होते,' असे रसाळ यांनी सांगितले. साध्वी प्रज्ञासिंहच्या अर्जावर 29 मे रोजी सुनावणी होणार आहे.

"एनआयए'ने गेल्या वर्षी या खटल्यात नव्याने आरोपपत्र दाखल केले होते. यात साध्वी प्रज्ञासिंहच्याविरोधात पुरावे नसल्याचा दावा करण्यात आला होता; मात्र, यापूर्वी दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) साध्वी प्रज्ञासिंहच्या विरोधात आरोपपत्र दाखल केल्याने विशेष न्यायालयाने तिला जामीन मंजूर केला नव्हता.

सप्टेंबर 2008 मध्ये रमजानच्या महिन्यात मालेगावमध्ये बॉंबस्फोट झाला होता. त्यात सहा जण ठार, तर शंभरहून अधिक जखमी झाले होते. याप्रकरणी 12 आरोपींना अटक करण्यात आली होती.