जात चोरण्याचा धंदा!

जात चोरण्याचा धंदा!

मुंबई - सातपुडा पर्वतरांगांच्या पल्याड, कडेकपारीतून आणि डोंगराच्या एखाद्या घळीत राहणाऱ्या आदिवासींपर्यंत विकासाची गंगा अडखळत पोचण्याच्या अनेक कारणांमध्ये खऱ्या आदिवासींच्या ऐवजी बोगस आदिवासीच वर्षानुवर्षे विकासाच्या लोण्यावर कसे डल्ला मारतात हे दाखवून देणारे धक्‍कादायक प्रकरण बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्‍यात उघडकीस आले आहे. 

देश स्वतंत्र झाला तेव्हाच १९४७ मध्ये बुलडाण्यातील मोताळा तालुक्‍यातील तरोडा या जिल्हा परिषद शाळेची स्थापना झाली. शिक्षणाची प्रदीर्घ परंपरा सांगणाऱ्या या शाळेतील विद्यार्थ्यांची माहिती असणाऱ्या नोंदणी पुस्तकात तब्बल १३०० मुलांची मूळ बंजारा असलेली जात बदलून आदिवासींमधील ‘नायकडा’ या जमातीची नोंद आतापर्यंत करण्यात आली आहे. आजही या शाळेत २५० नायकडा जातीचा दाखला असणारी मुले शिक्षण घेतात. मात्र याच गावात काय आजूबाजूच्या गावांतही एकही आदिवासी कुटुंब राहत नसल्याचे वास्तव आहे.

शाळेच्या नोंदणी पुस्तकात खाडाखोड करून मूळ बंजारा असलेली जात बदलून तिथे नायकडा करण्यात आल्याचे मुख्याध्यापक प्रकाश किनगे यांनी ‘सकाळ’शी बोलताना मान्य केले. खाडाखोड करून नोंदी बदलल्याची मूळ कागदपत्रेही ‘सकाळ’च्या ताब्यात आहेत. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या रजिस्टर्ड पुस्तकानुसार जवळपास १३०० मुलांच्या नोंदीसमोर त्यांच्या जाती बदलल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच जात बदलण्याचा हा धंदा केवळ एकदोन वर्षातला नाही तर, वर्षानुवर्षे आदिवासींना असलेले आरक्षण आणि इतर फायदे लाटण्याचा हा प्रकार सुरू असल्याचे समोर आले आहे. नातवांच्या शैक्षणिक प्रवेशासाठी आजोबा, वडिलांच्या जातीत खाडाखोड केल्याचे, खोटी प्रतिज्ञापत्र दिल्याचे या कागदपत्रांमधून स्पष्ट होत आहे. त्यामुळेच अगदी १९४७ च्या नोंदणी पुस्तकातही ही बनवाबनवी केलेली दिसून येत आहे. 

विद्यार्थ्यांच्या प्रवेश करताना करण्यात आलेली मूळ नोंदणी आणि प्रतिज्ञापत्रात ताळमेळ नसणे, मूळ रजिस्टर्डमध्ये नव्याने नोंदणी करून जुने ब्लेडने अलगद खोडून टाकलेले आहे, प्रतिज्ञालेख रजिस्टर व विद्यार्थी प्रवेश व मुलांचे शाळेतील प्रवेश, शाळा सोडण्याच्या दाखल्यांवरील जातीच्या माहितीमध्ये फेरफार करण्यात आली आहे. जातीच्या दाखल्यासाठी शाळेमध्ये अर्ज केलेल्या रक्‍तसंबंधीच्या नोंदी मूळ असल्याचे स्पष्ट होत नाही.

या गावात लेवा पाटील, मराठा, माळी बंजारा समाजातील लोक राहतात. एकही आदिवासी कुटुंब नसल्याचे आदिवासी विभागाच्या पाहणीत स्पष्ट झाले आहे. बुलडाणा जिल्ह्यात संग्रामपूरमध्ये तुरळक आदिवासी राहतात, मात्र तरोडामध्ये आदिवासी असल्याची कुठलीही माहिती राज्य सरकारच्या आदिवासी विभागाच्या अहवालात नाही. याबाबत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती देताना सांगितले की, आदिवासींचा निवास असेल तर आदिवासी विभागाचा निधी त्याठिकाणी खर्च केला जातो. आदिवासींच्या योजना राबविल्या जातात. पंचायतीच्या निवडणुकांमध्ये तिथे आरक्षणही लागते. तरोडाबाबतीत असे काहीच होताना आढळत नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. 


या शाळेमध्ये गेल्या महिन्यातच माझी नियुक्‍ती झाली आहे. त्यापूर्वी १९८५ मध्ये या गावात शिक्षक म्हणून मी काम केलेले आहे. तरोडा गावामध्ये एकही आदिवासी नाही. मात्र या शाळेत नियमित २०० ते २५० आदिवासी विद्यार्थी असतात. बंजारा जातीचे लोक शाळा प्रवेशा वेळी जातीची नोंद नायकडा अशी करत असल्याचे निदर्शनास आले आहे.
-प्रकाश किनगे, तरोडा जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com