पुण्यात 'सकाळ'च नंबर वन

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 1 जानेवारी 2017

"रजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर्स फॉर इंडिया'च्या (आरएनआय) "प्रेस इन इंडिया'च्या 2015-16 वर्षाच्या ताज्या अहवालानुसार "सकाळ'च्या पुणे आवृत्तीचा रोजच्या खपाचा आकडा 6 लाख 29 हजार 750वर पोचला आहे.

"आरएनआय'च्या "प्रेस इन इंडिया' अहवालात शिक्कामोर्तब

नवी दिल्ली - समाजमनाला ग्रासणाऱ्या समस्यांवर उत्तरे शोधत; उद्याच्या जगाचा वेध घेणाऱ्या "सकाळ'ने देशातील प्रादेशिक वृत्तपत्रांतील एकाच आवृत्तीचा सर्वाधिक खप असणाऱ्या वृत्तपत्रांच्या यादीतील आपले अग्रस्थान यंदाही कायम राखले आहे.

"रजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर्स फॉर इंडिया'च्या (आरएनआय) "प्रेस इन इंडिया'च्या 2015-16 वर्षाच्या ताज्या अहवालानुसार "सकाळ'च्या पुणे आवृत्तीचा रोजच्या खपाचा आकडा 6 लाख 29 हजार 750वर पोचला आहे.

देशातील वृत्तपत्रांच्या नोंदणीचे सर्वाधिकार असलेल्या "आरएनआय'चा हा अधिकृत अहवाल लवकरच "आरएनआय'च्या संकेतस्थळावर प्रकाशित केला जाईल, असे माहिती-प्रसारण मंत्रालयाच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

भारतातील नोंदणीकृत वृत्तपत्रे व नियतकांलिकांची कुंडली मांडणारा हा तब्बल 1363 पानांच्या या अहवालात "आरएनआय'ने देशातील वृत्तपत्रे, अन्य नियतकालिके व अनियतकालिके यांचे 31 मार्च 2016 पर्यंतचे खपाचे समग्र चित्र मांडले आहे.
बंगाली भाषेतील "आनंद बाजार पत्रिके'च्या एकमेव कोलकता आवृत्तीचा दैनंदिन खप देशात सर्वाधिक 11.50 लाख प्रतींवर आहे, तर हिंदुस्तान टाइम्स या इंग्रजी दैनिकाची दिल्ली आवृत्ती (9,92,239 प्रती) दुसऱ्या क्रमांकावर आहे.

या अहवालानुसार देशातील दैनिकांची संख्या गेल्या एका वर्षात 7 हजार 871 वरून 8 हजार 905वर पोचली आहे. नोंदणी झालेल्या वृत्तपत्रांच्या संख्येत एकूण 5.13 टक्‍क्‍यांनी भर पडली आहे तर नोंदणीकृत अनियतकालिके व अन्य नियतकालिकांच्या संख्येत गेल्या वर्षभरात 84.07 टक्‍क्‍यांची वाढ नोंदविली गेली आहे.

सर्वाधिक नियतकालिके हिंदी भाषेत प्रकाशित होतात. या यादीत मराठीचा क्रमांक तिसरा आहे. नियतकालिकांच्या खपाच्या बाबतीत उत्तर प्रदेशाच्या (सुमारे 15 कोटी) पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र (6.83 लाख प्रती) आहे.

पुणे आवृत्तीबरोबरच "सकाळ'च्या कोल्हापूर, औरंगाबाद, मुंबई आणि नाशिक आवृत्त्यांचाही वितरणात "लखपती' असणाऱ्या आवृत्त्यांचा समावेश आहे
सकारात्मक परिवर्तनाचे व्यासपीठ बनलेल्या "सकाळ माध्यम समूहा'च्या शिरपेचात या अहवालाने वाचकमान्यतेचा आणखी एक तुरा खोवला आहे.

वृत्तपत्रांच्या क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटविणाऱ्या "सकाळ'ने साडेआठ दशकांच्या वाटचालीत सामाजिक बांधिलकी केवळ जोपासलीच नाही, तर गेल्या काही वर्षांत राज्यभरातील नागरिकांच्या सहभागाने या बांधिलकीच्या जाणीवेला व्यापक स्वरूप दिले आहे. "सकाळ सोशल फाउंडेशन', "सकाळ रिलीफ फंड', डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन' या माध्यमांतून वाहतुकीच्या समस्येवर उत्तर शोधणारा "पुणे बस डे', महिलांना सशक्त व्यासपीठ देणारे, "तनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान', तरुणाईला नेतृत्वगुणांची ओळख करून देणारे "यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क', महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याच्या दिशेने जाणारी "पाणी परिषद', ग्रामविकासाच्या स्वप्नांना विचारविनिमयातून प्रत्यक्षात उतरविण्याचे प्रयत्न करणारी "सरपंच परिषद' असा हा प्रवास आहे. लोकभावनेशी जोडले जाणे, हे "सकाळ'च्या सर्व उपक्रमांचे अंगभूत वैशिष्ट्य ठरले आहे.

Web Title: sakal newspaper number one in circulation