कालावधीनुसार अभ्यासाचे गणित ठरवावे..! 

education
education

स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाची तयारी करीत असलेल्या उमेदवारांनी सामान्य अध्ययनाच्या तयारीची रणनीती आखली पाहिजे. त्यामध्ये प्रश्‍नपत्रिकांचे विश्‍लेषण करावे, पूर्वपरीक्षेच्या तयारीसाठी किती कालावधी आहे, याची आखणी करून कालावधीनुसार अभ्यासाचे गणित ठरवावे. 

सामान्य अध्ययन (जनरल स्टडीज) हा अनेक अर्थांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (M.P.S.C) पूर्वपरीक्षेतील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. एकूण 400 गुणांच्या पूर्वपरीक्षेत सामान्य अध्ययन पेपर- 1 मध्ये 100 प्रश्‍नांसाठी 200 गुण निर्धारित केले आहेत. सामान्य अध्ययनात नकारात्मक गुणदान पद्धती असल्यामुळे सामान्य अध्ययनाची काळजीपूर्वक तयारी करणे आवश्‍यक आहे. सामान्य अध्ययनाच्या पेपरची तयारी करताना पुढील तीन बाबी आवश्‍यक आहेत. यामध्ये अभ्यासक्रमाचे सूक्ष्म विश्‍लेषण, मागील प्रश्‍नपत्रिकांचे विश्‍लेषण आणि अभ्यासासाठी आवश्‍यक योग्य मार्गदर्शन या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. 

प्रश्‍नपत्रिकांचे विश्‍लेषण करताना मागील किमान पाच वर्षांच्या प्रश्‍नपत्रिकांचे बारकाईने विश्‍लेषण करावे. प्रश्‍नपत्रिकांचे विश्‍लेषण केल्यामुळे अभ्यासाची दिशा निश्‍चित व स्पष्ट होते. यानंतर अभ्यासाचे धोरण व नियोजन आखून त्याची अंमलबजावणी करावी. 

पूर्वपरीक्षेच्या तयारीसाठी कालावधी 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्वपरीक्षेच्या तयारीसाठी किमान चार महिन्यांचा कालावधी आवश्‍यक असतो. उपलब्ध वेळेपैकी साधारणपणे 60 टक्के वेळ सामान्य अध्ययनाला व 40 टक्के वेळ नागरी सेवा कल चाचणीस द्यावा. वेळेमध्ये अभ्यास पूर्ण होण्यासाठी शिवनेरी फाउंडेशनने व्हिडिओ लेक्‍चर्सच्या स्वरूपात संपूर्ण अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेला आहे. पेन ड्राइव्ह व मेमरी कार्डसचाही उत्तम व प्रभावी वापर करता येईल. यामधून प्रत्येक घटक किमान तीन वेळा समजावून घेणे आवश्‍यक ठरणार आहे, या दृष्टिकोनातून अभ्यासक्रमाचे तीन टप्पे तयार करावेत. 
पहिल्या टप्प्यात प्रत्येक घटकावरील व्याख्याने संकल्पनांसह समजावून घ्यावीत. विषयवार व्हिडिओ लेक्‍चर्स ऐकताना त्यातील संकल्पना, सिद्धांत, युक्तिवाद यांच्या अचूक आकलनास महत्त्व देणे गरजेचे ठरते. प्रथमच व्हिडिओ लेक्‍चर्स ऐकताना विद्यार्थ्याने त्या घटकांतील संकल्पना व्यवस्थित समजून घ्यावी. उदा. जगामध्ये अर्थव्यवस्थेचे प्रकार कोणकोणते आहेत? वेगवेगळ्या देशांमध्ये कोणकोणत्या अर्थव्यवस्थांचा अवलंब केला जातो? भारतामधील अर्थव्यवस्थेचा प्रकार कोणता आहे? जगातील इतर अर्थव्यवस्थांचे प्रकार व भारतामधील अर्थव्यवस्था यांमधील नेमका फरक कोणता व का आहे? उत्पन्नांचे प्रकार, महसुली तूट, अर्थसंकल्पीय तूट म्हणजे काय? राज्यघटनेत मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे म्हणजे काय? इत्यादी. 
प्रत्येक विषयातील मूलभूत सिद्धांत, संकल्पना नीट लक्षात आल्यास त्याचा इतर प्रश्‍न सोडवण्यासाठी निश्‍चितपणे फायदा होणार आहे व या संकल्पना वारंवार समजावून घेता येणार आहेत. पहिल्या टप्प्यावरील अभ्यास सविस्तर सखोल असावा. प्रत्येक संदर्भ समजावून घेताना त्यातील माहितीप्रधान, आकडेवारीचा, तांत्रिक भाग विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिला आहे. तो विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवून त्याच्या मायक्रोनोट्‌स काढाव्यात. महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्या समोर व्हिडिओ लेक्‍चर्स व डिजिटल नोट असल्याने पूर्वपरीक्षेसाठी नोट्‌स काढताना कमीतकमी व अत्यावश्‍यक भागाच्याच नोट्‌स काढाव्यात. 

दुसरा टप्पा 
दुसरा टप्पा म्हणजे पहिली उजळणी असते. या वेळी व्हिडिओ लेक्‍चर्स ऐकताना अभ्यासाच्या मजबुतीकरणास महत्त्व द्यावे. पहिल्या उजळणीत त्या-त्या घटकाचे आकलन अधिक बिनचूक, स्पष्ट आहे का, हे तपासावे. या टप्प्यात प्रश्‍नांचा सराव सुरू करावा. पूर्वपरीक्षेत बहुपर्यायी प्रश्‍नांचा सराव आवश्‍यक असतो. यामुळे स्वतःच्या अभ्यासाचे मूल्यमापन होते व आपल्या तयारीतील कच्चे दुवे लक्षात घेऊन त्यावर मात करता येते. त्या- त्या घटकांसंबंधी तर्कशुद्ध विचार करण्याची सवय निर्माण होते. या टप्प्यातही व्हिडिओ लेक्‍चर्समुळे अभ्यासाच्या तयारीचा वेग व गुणवत्तेमध्ये वाढ होण्यास सुरवात होईल. 

तिसरा टप्पा 
हा उजळणीचा अखेरचा टप्पा असेल. या टप्प्यात माहितीप्रधान भागाबद्दलची व्याख्याने वारंवार ऐकणे आवश्‍यक ठरणार आहे. या टप्प्यात प्रश्‍नांचा सराव अधिकाधिक करावा. अभ्यासाच्या वेळेपैकी 50 टक्के वेळ प्रश्‍नांच्या सरावासाठी द्यावा. 

व्हिडिओ लेक्‍चर्ससाठी दैनंदिन नियोजन 
सामान्य अध्ययनासाठी (सुमारे सहा तास) 
सद्यःघटना (2 ते 2.30 तास). 

नागरी कल चाचणीतील एक घटक (3 ते 3.30 तास) अशी विभागणी करावी. 
प्रत्येक विषयासाठी वेगळी वही करून आपल्याला समजलेले मुद्दे नमूद करावेत. 
अशी विभागणी केल्यास अभ्यासाचे ओझे आपोआपच कमी होत जाईल. 

या अभ्यासपद्धतीचा अवलंब केल्यास सामान्य अध्ययनाचे शिखर यशस्वीरीत्या गाठता येईल. व्याख्यानांमुळे तुम्हास एखादा विषय सहज सोप्या पद्धतीने आकलन होऊ शकतो. अर्थव्यवस्थेच्या सद्य:स्थितीवर एखादे व्याख्यान आहे, या विषयातील वक्ते त्यांच्या क्षेत्रात नामवंत असतात. विषय सोपा करून सांगण्याची त्यांच्यामध्ये हातोटी असते. यामुळे अभ्यासक्रमामधील संकल्पना सोप्या पद्धतीने समजावून घेण्यास मदत होणार आहे. या व्याख्यानांचा हमखास फायदा होऊ शकतो. तुमचे मुख्य लक्ष्य प्राथमिक साधनांवर हवे, त्यानुसारच तुम्ही कोणत्या घटकास किती वेळ द्यायचा हे ठरवावे. 

राज्यातील पाच हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करायचेय 
शिवनेरी फाउंडेशनने महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या परीक्षांचा अभ्यासक्रम प्रत्येक घटकानुसार विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिला आहे. प्रत्येक परीक्षेच्या स्वरूपानुसार संपूर्ण राज्यामधून फक्त पाच हजार विद्यार्थ्यांची नोंदणी करून त्यांची संपूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे. साहजिकच सध्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक परीक्षेच्या प्रकारानुसार आवश्‍यकतेप्रमाणे वेगवेगळे पेनड्राइव्ह संगणकासाठी, तसेच विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाचा लाभ मोबाईलद्वारेही मेमरी कार्डसच्या रूपाने करून घेता येणार आहे. या तंत्रज्ञानाद्वारे विद्यार्थ्याला संपूर्ण अभ्यासक्रम एकत्रितपणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानाद्वारे विद्यार्थ्याला कमी वेळेमध्ये संपूर्ण अभ्यासक्रमाची पुनःपुन्हा उजळणी करता येणार आहे. याशिवाय आवश्‍यक असणाऱ्या सद्यःघटना विद्यार्थ्याला त्यांच्या "व्हॉट्‌सऍप'वर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. अभ्यास करताना एखादी शंका असल्यास विद्यार्थ्याने संबंधित प्रश्‍न शिवनेरी ऍकॅडमीच्या ई-मेल वर पाठविल्यास 24 तासांच्या आत संबंधित प्रश्‍नाचे उत्तर विद्यार्थ्यास व्हॉट्‌सऍप किंवा ई-मेलवर पाठविले जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्याला एकाच ठिकाणी राहूनही परिपूर्ण अभ्यास करता येणार आहे. त्यातून 100 गुण मिळवणारा विद्यार्थी या सहजसुलभ तंत्रज्ञानाची मदत घेऊन 180 ते 200 गुणांपर्यंत पोचू शकेल. 

वृत्तपत्र विक्रेता ते पोलिस उपनिरीक्षक! 
मनात प्रबळ इच्छाशक्ती आणि परिश्रमाची तयारी असल्यास कुठलेही ध्येय गाठणे कठीण नसते. दिघोरी मोठी (ता. लाखांदूर, जि. भंडारा) या गावातील राजेश वसंता उंदिरवाडे (वय 30) या युवकाचा वृत्तपत्र विक्रेता, गृहरक्षक दलाचा जवान, पोलिस शिपाई असा प्रवास पोलिस उपनिरीक्षक पदापर्यंत पोचला. राज्य लोकसेवा आयोगाच्या 2016 मध्ये झालेल्या परीक्षेत पोलिस उपनिरीक्षक पदासाठी त्याने परीक्षा दिली. त्यात तो पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाला. राजेश सध्या बेळगाव (कोरची, जि. गडचिरोली) येथे कार्यरत आहे. राजेशच्या घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम. घरात आई, वडील, दोन बहिणी, भाऊ असे सहा सदस्य. घरी शेती नसल्यामुळे मोलमजुरीचे काम करून उदरनिर्वाह चालवायचा. बारावीत विज्ञान शाखेत शिकवणी नसल्याने तो नापास झाला. घरात हातभार लावण्यासाठी तो दररोज वृत्तपत्र वाटायचा. त्याने कला शाखेतून बारावी केले. त्याची 2009 मध्ये पितृछत्र हरविल्यामुळे जबाबदारी वाढली. पोलिस होण्याची इच्छा होती. त्यासाठी तयारी म्हणून त्याने दीड वर्ष होमगार्ड जवान म्हणून काम केले. तो 2010 मध्ये पोलिस भरतीत पात्र ठरला. अतिसंवेदनशील जांबियागट्टा (ता. एटापल्ली, जि. गडचिरोली) येथे राजेशची नियुक्ती झाली. गावात वाचण्यासाठी साधे वृत्तपत्र उपलब्ध होत नव्हते. अशा वातावरणात स्पर्धा परीक्षेची तयारी करणे म्हणजे अग्निदिव्य होते. दरम्यान, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून राजेशने पदवी प्राप्त केली. या ठिकाणी कार्यरत असणारे तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक सूरज बनसोडे व प्रवीण लटले यांची साथ मिळाल्याने राजेशनेही "एमपीएससी'ची तयारी सुरू केली. अभ्यासासाठी स्वतःची पुस्तके नव्हती. कुटुंबीयांसाठी गावी पैसे पाठवावे लागत. आर्थिक परिस्थिती कमकुवत होती. परंतु, मनात तीव्र इच्छाशक्ती असलेल्या राजेशला दोन्ही अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. त्यानेही नेटाने अभ्यास करत ध्येय पूर्ण केले.

या गोष्टी विसरू नका

आधीचे लेख आणि बातम्या :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com