यशवंतरावांच्या भूमीत पुन्हा एकदा क्रांती घडवू 

यशवंतरावांच्या भूमीत पुन्हा एकदा क्रांती घडवू 

सातारा - कर्जमुक्ती संघर्ष यात्रेच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाणांच्या ऐतिहासिक भूमीत रणसंग्राम उभा करण्याचा निर्णय आज जिल्ह्यातील सर्व विरोधी नेत्यांनी घेतला. साताऱ्यातील सांगता सभेपर्यंत निर्णय न झाल्यास फडणवीस सरकारला सळो की पळो करून सोडण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचे सर्वानुमते ठरले. दरम्यान, या बैठकीस खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक अनुपस्थित होते. त्यामुळे त्यांची भूमिका काय राहणार, याबाबत बैठकीनंतर दबक्‍या आवाजात चर्चा सुरू होती. 

तिसऱ्या टप्प्यातील संघर्ष यात्रेच्या नियोजनाची येथे आज सर्वपक्षीय बैठक झाली. यावेळी आमदार शशिकांत शिंदे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील, बाळासाहेब पाटील, दीपक चव्हाण, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार आनंदराव पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष ऍड. विजयराव कणसे, रजनी पवार, समिंद्रा जाधव, तसेच "रिपाइं', "शेकाप', कवाडे गट, समाजवादी पक्ष आदी पक्षांचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

शेतकऱ्यांचा आक्रोश जनतेच्या माध्यमातून सरकारला दाखविण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन उठाव करण्याचा निर्णय घेण्यात आला. शेतकरी कुटुंबातील प्रत्येक सदस्याने या यात्रेत सहभागी होऊन आपली ताकद दाखविण्याचे ठरले. शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला असून व्यापारी व भांडवलदारांचे हित पाहणारे भाजपचे सरकार आहे. या सरकारविरोधात जनतेत असंतोष आहे. या असंतोषाचे रूपांतर आंदोलनात करावे, असे आवाहन दीपक चव्हाण यांनी केले. आपल्या चुकीने भाजप सत्तेवर आले. शेतकरी देशोधडीला लावणारी धोरणे हे सरकार राबवत आहे, अशी टीका ऍड. कणसे यांनी केली. 

शशिकांत शिंदे म्हणाले, ""कर्जमाफीसाठी आम्ही पहिल्या अधिवेशनापासून आग्रही भूमिका मांडली आहे. या भूमिकेला भाजप सरकारचा विरोध आहे. त्यातूनच त्यांनी 19 आमदारांचे निलंबन केले. आता संघर्ष यात्रेचा तिसरा टप्पा पश्‍चिम महाराष्ट्रात होत आहे. शेतकऱ्यांच्या मनातील रोष बाहेर येत असून सत्ताधाऱ्यांच्या फसव्या प्रवृत्तीला दूर करण्यासाठी हा संघर्ष आहे. आपापसांतील मतभेद बाजूला ठेऊन सर्वांनी या प्रवृत्तींचा विरोध करावा. भाजप सरकार पश्‍चिम महाराष्ट्रावर जाणीवपूर्वक राग व्यक्‍त करत आहे. निधीच्या माध्यमातून जिल्ह्यावर अन्याय होत आहे. यशवंतराव चव्हाणांच्या या अभेद्य बालेकिल्ल्यात क्रांतीची लाट निर्माण करून या प्रवृत्तीला बाजूला करावे. आपल्या आंदोलनाची खिल्ली उडविली जात आहे. पण, या आंदोलनाच्या धसक्‍यानेच नाही म्हणणारे फडणवीस सरकार कर्जमाफीच्या मुद्यावर आले आहे. साताऱ्यातील सांगता सभेनंतर निर्णय न झाल्यास या सरकारला सळो की पळो करून सोडण्याची ताकद दाखवावी लागेल.'' आनंदराव पाटील म्हणाले, ""दोन्ही कॉंग्रेससह इतर विरोधी पक्षातील नेत्यांनी एकत्र येऊन संघर्ष यात्रा यशस्वी करण्यासाठी एकजूट निर्माण करावी. आपापसातील मतभेद विसरून संघर्ष यात्रेच्या माध्यमातून सरकारला कर्जमाफीचा निर्णय घेण्यास भाग पाडू.'' सुनील माने यांनी आभार मानले. 

संघर्ष यात्रा तिसरा टप्पा... गुरुवारी साताऱ्यात 
25 एप्रिल : कोल्हापूर, 26 एप्रिल : सांगली, 27 एप्रिल : सातारा (सकाळी कऱ्हाडमध्ये यशवंतराव चव्हाण समाधीस अभिवादन करून यात्रा सुरू होईल. त्यानंतर दहिवडीत सभा, सभेनंतर दहिवडी-सातारा रस्त्यावर (निढळमार्गे) वाटेत सर्व प्रमुख गावांत यात्रेचे स्वागत होईल. सायंकाळी पाच वाजता साताऱ्यातील गांधी मैदानावर सांगता सभा होईल.) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com