कोणता झेंडा घेऊ हाती...

संतोष धायबर
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

दैनंदिन व्यवहारामध्ये प्रत्येकजण व्यस्त असल्यामुळे 'पेड प्रचारक' मिळणे थोडे अवघड होऊन बसले आहे. कोणता उमेदवार जास्त पैसे देईल व आपली व्यवस्थित 'ठेप' ठेवले त्या उमेदवाराकडे जायचे. एवढेच त्या प्रचारकाला माहित असते. संध्याकाळी घरी जाताना 'पेड प्रचारका'ला पाचशे ते हजार किंवा त्यापेक्षाही जास्ते पैसे मिळतात.

राज्यात महानगर पालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकांच्या प्रचाराला वेग आला आहे. उमेदवारांच्या प्रचारादरम्यान 'पेड प्रचारक' मतदारांचा जोरदार प्रचार करताना दिसत असले तरी जो उमेदवार जास्त पैसे देईल त्याचा प्रचार करायाचा हे सूत्र वापरले जाते. कधी-कधी तर कोणता झेंडा घेऊ हाती... अशी वेळ 'पेड प्रचारकावर' येताना दिसते.

राज्यातील विविध भागांमध्ये प्रचाराचा जोर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. प्रचारादरम्यान आपल्या पाठीमागे गर्दी दिसावी यासाठी उमेदवार 'पेड प्रचारक' घेताना दिसतात. गोर-गरिब जनतेलाही पैसे मिळत असल्याने ते प्रचारात सहभागी होतात. (कारण पैसे मिळविण्याची एवढीच संधी असते.) पक्ष कोणता अथवा उमेदवार कोण? याच्याशी भाबड्या प्रचारकाला काही देणे-घेणे नसते. उमेदवाराच्या 'कट्टर' कार्यकर्त्याने घोषणा दिली की विजय असो... किंवा ठरलेली वाक्य बोलायचे एवढेच माहित असते. आपल्या प्रचारामुळे निवडणून येणारा उमेदवार पुढे आपल्याला ओळख देईल अथवा नाही. आपले काम करेल किंवा नाही, हे काही माहित नसते. परंतु, दिवसभर प्रचार केल्यामुळे संध्याकाळी घरी जाताना आपल्या हातात 'रोख' स्वरूपात पैसे पडणार एवढेच माहित असते. 

दैनंदिन व्यवहारामध्ये प्रत्येकजण व्यस्त असल्यामुळे 'पेड प्रचारक' मिळणे थोडे अवघड होऊन बसले आहे. कोणता उमेदवार जास्त पैसे देईल व आपली व्यवस्थित 'ठेप' ठेवले त्या उमेदवाराकडे जायचे. एवढेच त्या प्रचारकाला माहित असते. संध्याकाळी घरी जाताना 'पेड प्रचारका'ला पाचशे ते हजार किंवा त्यापेक्षाही जास्ते पैसे मिळतात. (महागाईमुळे प्रचारकाचेही दर वाढले आहेत.) एखाद्या उमेदवाराने जास्त रक्कम दिली तर दुसऱया दिवशी दुसरा झेंडा. हे सुत्र ठरलेले. यामुळे 'पेड प्रचारक' मिळविताना उमेदवारांची दमछाक होऊ लागली आहे. 

प्रचारादरम्यान चविष्ट चिकन दम बिर्याणी... लज्जतदार व्हेज बिर्याणी, जिभेवर चव रेंगाळत ठेवणाऱ्या "दालचा'पासून ते तांबड्या-पांढऱ्या रश्‍शापर्यंतच्या खाद्यपदार्थांवर कार्यकर्ते ताव मारताना दिसतात. प्रचाराची धुरा खांद्यावर घेऊन भाऊ, ताईच्या नावाचा जयघोष करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या श्रमपरिहारासाठी खास मद्यपानाची व्यवस्थाही होत आहे. काही 'गब्बर' उमेदवारांकडून कार्यकर्त्यांबरोबरच मतदारांसाठी जेवणावळी घातल्या जात आहेत. काहींनी कार्यकर्त्यांची बडदास्त ठेवण्यासाठी भरपूर 'रेशन' भरून आचारी मागविले आहेत. उमेदवारांनी रात्रंदिवस एक करण्यास सुरवात केली आहे. या प्रचाराच्या रणधुमाळीत हक्काच्या व 'पेड' कार्यकर्त्यांच्या पोटापाण्याची तारांबळ होऊ नये म्हणून काही उमेदवारांनी खाण्यापिण्यामध्ये कुठलीही कमतरता न ठेवण्याचे आदेश आपले नियोजनकर्ते व खजिनदारांना दिले आहेत. सकाळी चहा, नाश्‍ता, दुपार व रात्रीचे जेवण असे खास मिष्ठान्नाचे 'पॅकेज' कार्यकर्त्यांना मिळत आहे. थोडक्यात, प्रचारादरम्यान 'पेड प्रचारका'ची ठेप ठेवावीच लागत आहे.

निवडणूकीचे वारे जोरदार वाहू लागल्यामुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे. हॉटेल, ढाबे, मद्याची दुकाने 'हाऊसफूल' दिसतात. निवडून येणाऱया उमेदवारांना खरंच गोरगरिब जनतेची एवढी काळजी असेल अथवा सामाजिक कार्य करण्याची 'विशेष' आवड असेल तर अशीच सद्भुद्दी पुढेही देवो, ही ईश्वरचणी प्रार्थना. 'पेड प्रचारकां'च्या जोरावर निवडून गेलेले पुढील पाच वर्षे गोरगरिब जनतेला चेहराही दाखवत नाहीत, कामाचे तर सोडाच, हे प्रत्येकजण अनुभवतो. यामुळेच की काय, 'आमचा नगरसेवक हरवला आहे....' असा फ्लेक्स लावण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. सक्षम उमेदवाराला 'पेड प्रचारका'ची गरज भासत नाही. परंतु, खरंच, असे उमेदवार आहेत का? हे शांत डोक्याने आठवावे लागेल. 

प्रचारादरम्यान नको-नको ती गाणी लावली जातात. खरंच, कर्णकर्कश आवाजातील गाणी कोणाला आवडत असावीत? केवळ नागरिकांचे लक्ष वेधून घेणे, एवढेच काय ते दिसून येते. प्रचारावर एवढा मोठा खर्च करणे गरिब उमेदवाराला शक्य आहे का? हा एक मोठा विषय. निवडणूक आयोगाने यामध्ये लक्ष घालून बदल घडवायला हवेत. मतादर विविध विषयांवर कट्ट्यावर बोलत असते. परंतु, ते विषय कधीच पुढे येत नाहीत अथवा त्यांच्याकडे कोणी लक्षही देत नाही. पण... भविष्यात बदल करण्याची नक्कीच आवश्यकता भासू लागली आहे. निवडणूक आयोगाने बदल केले तरच भविष्यात 'पेड प्रचारका'ची गरज भासणार नाही. याबाबत तुम्हालाही विविध अनुभव येत असतील. परंतु, ते केवळ आपल्या जवळच राहात आहेत, असे वाटत असेल तर प्रतिक्रियांच्या माध्यमातून जरूर मांडा. जगासमोर येऊद्यात...

Web Title: Santosh Dhaybar writes about political workers